

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागाचा गट 'क' पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचा संचालक महेश सत्यवान बोटले (रा. कामगार रुग्णालय, वसाहत, मुलुंड, मुंबई) याच्यासह चौघांना सायबर पोलिसांनी अटक केली.
बोटलेबरोबर प्रशांत बडगिरे (रा. योगेश्वरीनगर, अंबाजोगाई, बीड), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (रा. एकात्मता कॉलनी, यशवंतराव चौक, अंबाजोगाई) आणि शाम म्हादू म्हस्के (रा. पंचशील, अंबाजोगाई, बीड) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. निशीद रामहरी गायकवाड, राहुल धनराज लिंघोट, आशुतोष वेदप्रिय शर्मा, विजय विनायक नागरगोजे आणि अतुल प्रभाकर राख यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपर सेटिंग समितीत महेश बोटले याने संवर्ग 'ड' प्रमाणे संवर्ग 'क'चेही पेपर्स एकाच वेळी प्रशांत बडगिरेला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने पेपर वितरित केलेल्या एजंटांचीही माहिती मिळालेली आहे. त्याप्रमाणे काही परीक्षार्थींची कागदपत्रे एजंटांकडून जप्त करण्यात आली आहेत.
एजंटांनी परीक्षार्थींना परीक्षेपूर्वी ज्या ठिकाणी बसवून पेपर पाठ करून घेतला, त्या ठिकाणचाही सीसीटीव्ही फुटेज व जबाब असा पुरावा जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय या संवर्गातील पेपर दुसर्या एका साखळीमार्फत फुटल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्या साखळीतील काही एजंटांना अटक करून अंतिम टप्प्यातील पेपर फोडणार्यांचा शोध सुरू आहे. यामध्ये काही परीक्षार्थीची हॉल तिकिटेदेखील सापडली आहेत. त्या संदर्भाने या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.
प्रामाणिक परीक्षार्थींची फसवणूक
24 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी तीन ते पाचच्या सुमारास आरोग्य विभागातील गट 'क' संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षेचा पेपर आरोपींनी फोडला. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी पैसे स्वीकारून तो परीक्षार्थींना पुरवला. शासनाची व परीक्षेला बसलेल्या प्रामाणिक परीक्षार्थींची फसवणूक करणार्या आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल
पुणे : आरोग्य विभागातील गट 'ड' संवर्गातील पदाच्या पेपरफुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी 20 जणांविरोधात 3 हजार 816 पानी दोषारोपपत्र न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहे. विजय प्रल्हाद मुर्हाडे, अनिल दगडू गायकवाड, सुरेश रमेश जगताप, बबन बाजीराव मुंढे, संदीप शामराव भुतेकर, प्रकाश दिगंबर मिसाळ, उद्धव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंकटराव बडगिरे, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, राजेंद्र पांडुरंग सानप, महेश सत्यवान बोटले, नामदेव विक्रम करांडे, उमेश वसंत मोहिते, अजय नंदू चव्हाण, कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे, संजय शाहुराव सनाप, आनंद भारत डोंगरे, अर्जुन भरत बमनावत ऊर्फ राजपूत अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाला आहे.