महाराष्ट्राच्या उभारणीत डॉ. जाधव यांचे मोलाचे योगदान : आ. पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्राच्या उभारणीत डॉ. जाधव यांचे मोलाचे योगदान : आ. पृथ्वीराज चव्हाण
Published on
Updated on

कराड : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यलढ्यात, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या उभारणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यांनाच आजवर 'स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर पुरस्कार' दिला आहे. त्याच मालिकेत दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत डॉ. जाधव यांचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे काढले. स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने डॉ. जाधव यांना उंडाळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

उंडाळे (ता. कराड) येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 48 व्या स्मृतिदिनानिमित्त 39 वे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा पार पडला. आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांना 'स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, स्मारक समितीचे विश्वस्त व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील, साहेबराव गायकवाड, हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, स्मारक समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्राला दिशा

दै. 'पुढारी'चे अग्रलेख नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. 'पुढारी'च्या अग्रलेखांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे आणि पुढेही देत राहतील, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गौरव केला. रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव दै. 'पुढारी'ने साजरा केला आहे. स्व. राजीव गांधी, स्व. लता मंगेशकर आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमांना आपली उपस्थिती लावली आहे. हा दै. 'पुढारी'चा आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सन्मान आहे, असेही आ. चव्हाण म्हणाले.

जाधव यांचे मोलाचे योगदान

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे खूप मोठे काम आहे. कारगिल युद्धानंतर सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात सैनिकांसाठी भव्य हॉस्पिटलची उभारणी केली, हे डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे जिवंत काम आहे. आजही या हॉस्पिटलमध्ये सैनिकांवर उपचार केले जात आहेत. त्यांचे जीव वाचविले जात आहेत. कोल्हापूर खंडपीठ, ऊस दर, दूध दर या प्रश्नांवर डॉ. प्रतापसिंह जाधव नेहमी अग्रणी राहिले. महाराष्ट्राचा विचार घडविण्याचे काम दै. 'पुढारी'ने केले. त्यामुळे 'पुढारी' नंबर एकचे वर्तमानपत्र राहिले आहे. त्यामुळे डॉ. प्रतापसिंह जाधव यांना दिला गेलेला हा पुरस्कार अगदी योग्य व्यक्तीला दिला गेल्याचे मी मानतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

राजकारण हे समाजकारणासाठी हवे

वास्तविक, राजकारण हे समाजकारणासाठी करायचे असते, याचा विसर राज्यकर्त्यांनी कधीही पडू द्यायचा नसतो. किंबहुना, राजकारणात जाऊनच समाजकार्य करता येते, असे नाही. राजकारणात न जाताही मोठ्या समाजकार्याची उभारणी केली जाते; पण दुर्दैवाने आपल्या देशात याचाच विसर अनेक राजकारण्यांना पडतो आणि समाजकारणाचे राजकारण आणि सहकाराचा स्वाहाकार कधी होतो, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही, असे उद्गार डॉ. जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.

राजकारणाचे व्यवसायीकरण

ते म्हणाले, राजकारणाचाच व्यवसाय आज बहुसंख्य राजकारणी करताना दिसतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील नेते सोडले, तर आता ज्यांच्याकडे तरुण पिढीने 'आदर्श नेता' म्हणून बघावे असे नेते, राजकारणी आता दिसतात का? हा खरा प्रश्न आहे.

जे सत्तेवर असतात ते विरोधकांवर हजारो कोटींच्या गफल्याचा आरोप करतात, तर जे सत्तेवर नाहीत, ते सत्ताधार्‍यांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करतात. सर्वसामान्य माणसाला हे आकडेसुद्धा मोजता येणार नाहीत, एवढे ते मोठे असतात. आजच्या राजकारणाची दुर्दशा अशी आहे. हे काय चाललंय? केवढी ही समाजाची अधोगती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

लोकशाहीचे आधारस्तंभ

अशा भ्रष्ट राजकारण्यांवर वर्तमानपत्रांनी अंकुश ठेवायचा असतो. म्हणून तर त्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जाते. मला सांगायला आनंद आणि सार्थ अभिमान वाटतो की, दै. 'पुढारी'चा जन्मच चळवळ म्हणून झालेला आहे. 'पुढारी'चा सर्व इतिहास म्हणजे देशाच्या इतिहासातील सुवर्णाची पाने आहेत. समाजात एक भूमिका घेऊन आम्ही उभे राहिलो. सामाजिक समतेची ही भूमिका होती. जिथे जिथे अन्याय, अत्याचार होतो, तिथे तिथे धावून जाणे ही भूमिका होती. महान क्रांतिकारकांच्या बलिदानातून, अपार त्यागातून आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक प्रयत्नांतून देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याचे आणि लोकशाहीच्या बळकटीकरणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे ते म्हणाले. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, ध्येयवादी पत्रकारितेची आज गरज आहे, असेही ते म्हणाले.

अंतिम क्षणापर्यंत सामाजिक ऋण फेडत राहणार

सामाजिक कार्याबद्दल मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दै. 'पुढारी'च्या ग्रंथालयात हे पुरस्कार ठेवले आहेत. मी जेव्हा ग्रंथालयात जातो, तेव्हा अजूनही बरीच कामे करायची आहेत, अशी साद हे पुरस्कार घालतात. सामाजिक जबाबदारीतून आपण मागे हटणार नाही, असे सांगत अंतिम क्षणापर्यंत सामाजिक ऋण फेडत राहणार, अशी ग्वाही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी यावेळी दिली.

स्वातंत्र्यलढ्यात सातारा जिल्हा आघाडीवर होता. प्रतिसरकारचा जाज्वल्य इतिहास विसरता येणार नाही. सातारा जिल्हा राजकीय व सामाजिकद़ृष्ट्या जागरूक असून, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा पाया भक्कम केला. थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांनी त्यांना साथ दिली. महात्मा गांधीजींचे समर्थक म्हणून सर्वांना सोबत घेत लढा उभारला. स्व. दादांच्या पश्चात स्व. विलासराव पाटील यांनी समाजकार्याचा वारसा विस्तारला, असे उद्गार त्यांनी काढले.

दोन माणसांत चर्चा सुरू असते 'पुढारी'त आलंय, म्हणजे खरंच हाय. आमच्या घरात पाच पेपर येतात. पहिल्यांदा 'पुढारी'च वाचतो. सातार्‍यातील सर्व माहिती त्यात असते. याशिवाय संपर्ण अंकही वाचनीय असतो, असे सांगत खासदार श्रीनिवास पाटील यांनी दैनिक 'पुढारी'सह डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.

निराधार मुलांच्या वसतिगृहाला एक लाख

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा 'स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्काराची रक्कम व तेवढीच स्वतःजवळील रक्कम असे सुमारे एक लाख रुपये कोळे (ता. कराड) येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे निराधार मुलांसाठी चालविल्या जाणार्‍या 'जिजाऊ वसतिगृहास' देत असल्याचे कार्यक्रमस्थळीच डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी जाहीर केले.

उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. याअगोदर मिळालेल्या सर्व पुरस्कारांची रक्कम दै. 'पुढारी'ने उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलला दिली आहे. मात्र, अनाथ मुलांचे संगोपन करणार्‍या जिजाऊ संस्थेस या पुरस्काराची रक्कम देत आहे, असे ते म्हणाले.

सामाजिक चळवळींशी जोडलेली नाळ कायम

डॉ. प्रतापसिंह जाधव अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. जरी ते पत्रकार असले, तरी सामाजिक चळवळींशी ते कायम बांधले गेले. सामाजिक प्रश्नांवर आंदोलन असेल, तर त्या ठिकाणी डॉ. प्रतापसिंह जाधव आपल्या वाणीच्या, लेखणीच्या माध्यमातून एक संघटकाची भूमिका घेऊन आवर्जून त्यामध्ये भाग घेत असत. शाहू शताब्दी, शिवछत्रपतींचा त्रिशताब्दीचा कार्यक्रम, अंबाबाई मंदिर सुधारणा या सर्व उपक्रमांमध्ये डॉ. जाधव यांनी पुढाकार घेतला होता. शिवाजी विद्यापीठात ललित कला विभाग सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा शब्दांत आ. चव्हाण यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा गौरव केला.

महाराष्ट्राचे कंठमणी : मानपत्र गौरव

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी दै. 'पुढारी'ने व पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आजवर विविध क्षेत्रांतील केलेल्या कार्याचा सन्मान करत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

मानपत्रातील प्रमुख मुद्द्यांवर टाकलेला प्रकाशझोत. प्रबोधनाचे अग्रदूत 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या वैचारिक धनाचा समृद्ध वारसा 1969 पासून आपल्याकडे आला. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ अखंडपणे पत्रकारितेचे हे शिवधनुष्य आपण समर्थपणे पेलले आहे.

स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंतच्या सर्व घटना, घडामोडींना 'पुढारी'त साक्षेपी स्थान देतानाच, त्या-त्यावेळी आपण समतोल, प्रभावी व परखड अग्रलेखांतून केलेले मार्गदर्शन व भाष्य हे काळाच्या कसोटीवर उतरले. कुशल व्यवस्थापनाने 'पुढारी' हे राज्यपातळीवरील वृत्तपत्र बनवलेत. महाराष्ट्राबरोबर उत्तर कर्नाटक आणि गोव्यातही दै. 'पुढारी'ची चौफेर घोडदौड सुरू आहे. काळाच्या पुढे धावणार्‍या द़ृष्टीने बड्या साखळी वृत्तपत्रांच्या तोडीस तोड असे अत्याधुनिक
माहिती-तंत्रज्ञानाचे क्रांतिपर्व सुरू करण्याचा दै. 'पुढारी'ने अग्रमान मिळवला.

घराण्याची राजकीय व सामाजिक उज्ज्वल परंपरा, आर्थिक सुबत्ता, त्याचबरोबर प्रभावशाली प्रसारमाध्यमाचे जबरदस्त सामर्थ्य ही आजच्या राजकारणातील हुकमी पाने! ती हाती असूनही आपण राजकीय सत्तेच्या प्रलोभनापासून अलिप्त राहिलात. सत्तेच्या राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक मोलाचे मानले. समाज प्रबोधनासाठी जनजागरण करणारा 'पुढारी' खर्‍या अर्थाने लोकविद्यापीठ ठरला आहे. या विद्यापीठाचे आपण कुलपतीच आहात.

'जोतिबा परिसर विकास निधी समिती'चे अध्यक्ष या नात्याने जोतिबा परिसराचा कायापालट केलात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेच्या साहाय्याला धावून गेलात. सीमावासीय बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत झगडत राहिलात. सीमालढ्यातील आपला बाणेदारपणा वाखाणण्यासारखा आहे. आपले हे निरपेक्ष समाजसेवेचे योगदान निर्विवाद मोलाचे आहे.

काळाची गरज व पावले ओळखून, दूरदर्शीपणे आपण दै. 'पुढारी' वाढविला. आपण परोपरीने जोपासलेली सामाजिक बांधिलकीची भावना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना मनोमन उमजल्याने 'पुढारी'च्या सुवर्ण सोहळ्यास ते आवर्जून करवीरनगरीत प्रथमच आले. तसेच 'पुढारी'च्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. ही आपल्या कार्याला मिळालेली पोच पावतीच होय.

नैसर्गिक आपत्ती ओढवल्या तेव्हा तेव्हा आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी आपण धाव घेतली. पूरग्रस्तांच्या डोळ्यांतील आसवे पुसली. भूकंपग्रस्तांना आधार दिला. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या रूपाने देशावर अरिष्ट ओढवले असताना अत्यंत अल्पावधीमध्ये अडीच कोटी रुपयांहून अधिक 'आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड' उभा करून जाज्वल्य देशभक्तीचे दर्शन घडविले. 'पुढारी'च्या नरवीर संपादकांनी केलेल्या या योगदानातून उभे राहणारे हॉस्पिटल हे राष्ट्रीय एकात्मतेचे चिरंतन प्रतीक ठरलेले आहे.

आपण केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने आपणास 'पद्मश्री' हा नागरी सन्मान बहाल केला तसेच मानाचा पांचजन्य नचिकेत पुरस्कार, अहिंसा ट्रस्ट पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रेे पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा रत्नदर्पण पुरस्कार, झांशी येथील स्वामी विवेकानंद पुरस्कार, सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार, आदर्श संपादक पुरस्कार असे अनेक पुरस्कार आपल्याला लाभले आहेत.

'पुढारी' आणि प्रतापसिंह जाधव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनविषयक विधायक द़ृष्टिकोन, सखोल व्यासंग, दुर्दम्य आत्मविश्वास, पुरोगामी विचारधारा, संघटन कौशल्य, अफाट लोकसंग्रह, अचूक व त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, समय सूचकता, अखंड सावधानता, कमालीची जिद्द, जबरदस्त इच्छाशक्ती, निर्भीड विचारसरणी, अमोघ वक्तृत्व, अस्सल मराठी बाणा अशा अनेकविध दुर्मीळ गुणांचे इंद्रधनुष्य आपल्या व्यक्तिमत्त्वात साकारले आहे. यामुळेच आपण महाराष्ट्राचे कंठमणी ठरला आहात. आपण यशवंत, कीर्तिवंत व्हावे, अशा सर्वोत्तम शुभेच्छा, असेही मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news