महापुराने कोल्हापूरच्या अर्थचक्राला धक्‍का!

महापुराने कोल्हापूरच्या अर्थचक्राला धक्‍का!
Published on
Updated on

कोल्हापूर : 2019 मध्ये आलेला महापूर… त्यानंतर गेली दोन वर्षे कोरोना महामारीचा शिरकाव आणि यंदा पुन्हा एकदा महापूर..! गेली तीन वर्षे कोल्हापूरकर नैसर्गिक आपत्तींशी झुंजत आहेत. महापुराने संपूर्ण जिल्हा ठप्प झाला आहे.

त्याअगोदर कोरोना निर्बंधांमुळे उलाढाल जवळपास ठप्पच आहे. तेव्हापासून जिल्ह्याचे अर्थचक्र अक्षरश: कोलमडले आहे. आता महापुराने शेकडो घरांची पडझड झाली आहे. हजारो छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

घरातील, तसेच दुकानांतील अन्‍नधान्य आणि इतर लाखो रुपयांच्या वस्तू खराब झाल्या आहेत. शेतीसह पूरक उद्योगांनाही फटका बसल्याने सुमारे पाच ते दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महापूर आणि कोरोनामुळे कोल्हापूरच्या अर्थचक्राला बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने कोल्हापूरला सढळ हाताने मदत करण्याची आवश्यकता आहे.

शेतीचे तब्बल ९०० कोटींचे नुकसान?

कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील 58 हजार 290 हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. सध्या पाणी उतरत असले, तरी त्याचा पीकवाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर पिकाच्या क्षेत्रात भुस्खलन, पीक वाहून जाणे, शेतांचे बांध कोसळणे यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील पिकांचे 900 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात 22 ते 25 जुलैअखेर मुसळधार पाऊस झाला. या जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला होता. महापुराचे पाणी नदीच्या पात्रापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावरील पिकाच्या जमिनीत घुसले होते.

त्यामुळे उसाच्या शेतीला त्याचा मोठा फटका बसला आहे. भात, सोयाबीन, भुईमूग व भाजीपाला ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

कृषी विभागाने नजर अंदाजानुसार किती हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे, याचा अंदाज बांधला आहे. शेतातील पुराचे पाणी कमी झाल्यानंतर किती हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे, हे कळणार आहे.

शेतकर्‍यांना पिकाची नुकसान भरपाई देत असताना शासनाने नियम आणि निकष ठरविले आहेत. त्यानुसार ही भरपाई हेक्टरमध्ये दिली जाते. या महापुरामुळे जिल्ह्यातील 58 हजार 290 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानीची शासनाकडून 66 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरात 78 हजार हेक्टरवरील पिके महापुरात बुडाली होती. त्यावेळी शेती पिकाचे 1300 कोटींचे नुकसान झाले होते.

त्यावेळी शासनाकडून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 80 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. यावरून सध्या आलेल्या महापुरात शेती पिकाच्या नुकसानीची 66 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळू शकेल, असा अंदाज आहे.

नुकसान ३०० कोटी; मिळाले ५० कोटी

कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने शहरातील व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे केले; पण प्रत्यक्षात मदत करताना हात आखडते घेतले. व्यापार्‍यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले 350 कोटी रुपयांचे; पण मिळाले अवघे 50 कोटी. यावेळी महापुराची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे पंचनाम्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यापारी संघटना करत आहेत.

जिल्ह्यातील व्यापार्‍यांना 2019 मध्ये आलेल्या महापुराने जोराचा फटका बसला. शहरात शाहूपुरी, तसेच शुक्रवार पेठ, महावीर कॉलेज परिसरातील दुकाने आठ ते दहा दिवस पाण्याखाली होती. पूर ओसरल्यानंतर जेव्हा व्यापारी दुकानात गेले तेव्हा दुकानातील साहित्य खराब झाले होते.

व्यापार्‍यांच्या डोक्यावर अगोदरच कर्ज आहे. त्यात महापूर यामुळे व्यापारी डबघाईला आला होता. चेंबर ऑफ कॉमर्सने तेव्हा व्यापार्‍यांची माहिती घेऊन एकूण नुकसानीचा आकडा 350 कोटी रुपये असल्याचे सांगितले.

महसूल विभागानेही पंचनामे केले तेव्हा नुकसानीची रक्‍कम 300 कोटी रुपयांच्या आसपास आली; पण शासनाने त्यावेळी 15 हजार व 50 हजार अशी नुकसानीची रक्‍कम दिली.

1 लाख रुपयांच्यावर ज्यांचे नुकसान झाले, त्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली; पण सरसकट सर्वांना ही मदत मिळाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news