मराठी साहित्य संमेलन -साहित्यविश्वात आमचा हस्तक्षेप नाही : एकनाथ शिंदे

मराठी साहित्य संमेलन -साहित्यविश्वात आमचा हस्तक्षेप नाही : एकनाथ शिंदे
Published on
Updated on

वर्धा, राजेंद्र उट्टलवार : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेतेच असतात. जगण्याच्या तळमळीतूनच साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणार्‍या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन आणि सूचनांचा राज्य शासन कायम आदर करीत आल्याचे आणि साहित्यविश्वात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी थाटात झाले. याप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आचार्य विनोबा भावे सभामंडपात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर संमेलन होत आहे.

संमेलनाध्यक्ष माजी न्या. नरेंद्र चपळगावकर, शालेय शिक्षण तथा मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, मावळते अध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. हे दोन्ही महान नेते एक उत्तम लेखक होते. या प्रभावळीत लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आदी राजकीय नेते हे उत्तम लेखकही होते. लोकसेवेचे व्रत घेऊन या सर्व नेत्यांनी साहित्यातूनच आपले सामाजिक कार्य पुढे नेले. राजकीय नेतृत्वाचे उगमस्थान साहित्य असल्याचे यातून अधोरेखित होते, त्यामुळे लोकसेवेच्या व्रताला बळ देण्यासाठी साहित्यिकांकडून राज्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा ही चमत्कार घडविणारी आहे. संत साहित्य आणि साहित्याच्या विविध प्रवाहांनी या भाषेला समृद्ध केले आहे. हे संमेलन म्हणजे सुद़ृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विशाल रूप असल्याचे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले.

मराठी भाषा संमेलनाची शतकाकडे होत असलेली वाटचाल ही गौरवाची बाब आहे. लक्षावधी सारस्वत या संमेलनासाठी महाराष्ट्र व देशातून दरवर्षी एकत्र येतात, ही ओढ अद्भुत आहे. राज्याच्या ग्रामीण भागातून उत्तम लेखक व सकस साहित्य निर्माण होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मराठी भाषेची सेवा करणार्‍या महाराष्ट्राबाहेरील संस्थांना संमेलनासाठी तसेच वारकरी संमेलनासाठी राज्य शासनाने प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील बदलांचीही साहित्यिकांनी नोंद घ्यावी : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरी जीवनाबरोबरच ग्रामीण भागातील बदलांची साहित्यिकांनी नोंद घेण्याचे आवाहन करताना समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला. या महामार्गासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे ग्रामीण व नागरी जीवनावर झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटावे, देश-विदेशातील विकासात्मक व प्रेरणादायी साहित्य मराठी भाषेत अनुवादित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संमेलनाध्यक्षांना आता राज्य अतिथींचा दर्जा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे यासंदर्भात मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ध्यात 'लाईट, साऊंड अँड लेेसर शो' सुरू होणार

वर्धा शहराचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या मोठ्या प्रतिमा लावलेल्या ठिकाणी 'लाईट, साऊंड अँड लेसर शो' राज्य शासनामार्फत सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वर्ध्याच्या वैभवात भर घालण्यासाठी सौंदर्यीकरणाची ही मागणी मान्य केली असल्याचे जाहीर केले.

मराठी भाषामंत्री दीपक केसरकर म्हणाले, साहित्यिक हे समाजाची ज्योत आहेत, ही ज्योत तेवत ठेवण्यासाठी राज्य शासन सदैव पाठीशी आहे. मराठी साहित्याच्या विकासासाठी राज्य शासन प्रतिबद्ध असल्याचे सांगत, त्यांनी साहित्य क्षेत्रात राज्य शासन हस्तक्षेप करणार नाही. सातारा जिल्ह्यातील वाई येथे मराठी विश्वकोष भवन आणि मुंबईत मराठी भाषा भवन बांधण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान 50 लाखांहून वाढवून 2 कोटी करण्यात आले. तसेच विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठीचे अनुदान 10 कोटींहून वाढवून 15 कोटी केल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी दत्ता मेघे, डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास, माजी न्या. नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे, प्रदीप दाते आदींची भाषणे झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष माजी न्या. नरेंद्र चपळगावकर आणि मावळते अध्यक्ष भारत सासणे यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमिताने प्रकाशित करण्यात आलेल्या 'दौत लेखनी' या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

यावेळी आयोजन समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वर्धा गौरव गीत, कविवर्य सुरेश भट यांच्या 'लाभले आम्हास भाग्य' हे मराठी अभिमान गीत आणि संमेलन गीताचे सादरीकरण झाले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी; तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news