मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ वसतिगृहे सज्ज, मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ वसतिगृहे सज्ज, मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (सारथी) कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले असून पुण्यातील मुख्यालयाच्या बांधकामास 43 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांचा लवकरच शुभारंभ करण्यात येईल. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात 14 ठिकाणी वसतिगृहे तयार असून ती लवकर सुरू करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी झालेल्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते.

'सारथी'मार्फत स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग, संस्थेसाठी मनुष्यबळ पुरविणे, तारादूत प्रकल्प सुरू करणे, टॅलेंट सर्च परीक्षा व इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या नवीन योजना सुरू करणे इत्यादी विषय मार्गी लागतील. सारथी संस्थेच्या मागणीनुसार, संस्थेसाठी सध्या 150 कोटी रुपये निधी देण्यात आला असून मागणीप्रमाणे निधी देण्यात येणार आहे.

तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांसाठीही निधी देण्यात येत असून धोरणात्मक निर्णय घेऊन नवीन योजनांचा समावेश करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असल्याचा दावाही त्यांनी केला. मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात 23 ठिकाणी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 14 ठिकाणी वसतिगृहांसाठी इमारती तयार असून त्याचे लवकरच संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतिगृहांचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात जागा उपलब्धतेसाठी महसूलमंत्री हे विभागीय आयुक्‍त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.

मृतांच्या वारसांना नोकरी

या आंदोलनात मृत झालेल्या 43 जणांच्या वारसांपैकी 8 वारसांना एसटी महामंडळात रुजू करून घेण्यात आले असून 6 जण हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुजू होणार आहेत. उर्वरित वारसांना नियुक्‍ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तसेच आतापर्यंत 17 मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात आली आहे. उर्वरितांपैकी 34 जणांची माहिती प्राप्त झाली असून त्यांना लवकरच मदत देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्यासंदर्भात आराखडा

न्यायालयाचे कामकाज आता प्रत्यक्ष उपस्थितीत सुरू झाल्यामुळे कोपर्डी खटल्याची सुनावणी लवकरात लवकर घेण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. तसेच इतर मागास वर्गाप्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच त्यावर निर्णय होईल.

एसईबीसी, ईएसबीसी प्रवर्गातून परीक्षा दिलेल्या, परंतु नियुक्त्या रखडलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला असून या नियुक्त्या देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news