मध्य रेल्वेच्या 37 एकरवर अतिक्रमण

मध्य रेल्वेच्या 37 एकरवर अतिक्रमण
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुमारे 37 एकर जमिनीवर अनधिकृत झोपडपट्टी वसलेली आहे. या जागेवर 13 हजार 839 झोपड्या वसलेल्या आहेत. या झोपड्या हटविण्यासाठी मध्य रेल्वेने बुधवारपासून नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.परंतु स्थानिक राजकीय नेत्यांनी त्यास विरोध केल्याने रुळांशेजारील झोपड्या हटणार की नाही, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय रेल्वेला रेल्वे रुळांशेजारील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भारतीय रेल्वेने रुळांशेजारील झोपड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील रुळांशेजारील झोपड्यांना सात दिवसात जागा रिकामी करण्याची नोटीस बाजवली.रेल्वेचे हे पाऊल धक्कादायक आणि अन्यायकारक असल्याचे सांगत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याला विरोध केला आहे.

रेल्वे बोर्ड सदस्य (पायाभूत सुविधा) संजीव मित्तल यांनी देशातील रेल्वे झोनला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, 17 डिसेंबर2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणले आहे की, इस्टेट अधिकारी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करत नाहीत. रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आरपीएफचा वापर केला जाऊ शकतो. रेल्वेच्या मालमत्तेवर अनधिकृत कब्जा करणार्‍यांवर तत्काळ दिवाणी/फौजदारी कारवाई सुरू करावी.रेल्वेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई न केल्यास अधिकार्‍यांवर योग्य कारवाई केली पाहिजे.

रेल्वेने केलेल्या कारवाईचा अहवाल पुढील तारखेपूर्वी (28 जानेवारी 2022) सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.सोशल मीडियावरील जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीवर उत्तर देताना वरिष्ठ विभागीय रेल्वे अभियंते यांनी अनेक ठिकाणी रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण झल्याने रेल्वे कायदा, 1989 मध्ये नमूद केलेल्या तरतुदींनुसार नोटिसा बजावण्यात आल्याचे म्हटले आहे.

मुंबईतील रुळांशेजारील अतिक्रमणांची यादी

* सॅन्डहर्स्ट रोड- इंदिरा नगर,एकता नगर,चोले नगर
* भायखळा- संजय गांधी नगर
* परळ रेल्वे वसाहत- स्वामी समर्थ रहिवासी संघ, एल्फिन्स्टन झोपडपट्टी रहिवासी संघ
* माटुंगा रेल्वे वसाहत- आझाद नगर,मेघवाडी,आंबेडकर नगर,गणेश नगर
* कुर्ला मेन लाईन- सावळे नगर,क्रांती नगर,कुर्ला कारशेड, गावदेवी, मोहन नगर, बंजारा बस्ती
* कुर्ला-ट्रॉम्बे लाईन- राजीव गांधी नगर, सुमन नगर
* घाटकोपर- नित्यानंद नगर
* विक्रोळी-सम्यक नगर
* डोंबिवली- संतोषी माता नगर
* ठाकुर्ली -12 बंगलो
* कल्याण- लोकग्राम पाटलीपुत्र, वालधुनी विभाग, आणेवाडी
* मानखुर्द- महात्मा फुले नगर, भारत नगर, महाराष्ट्र नगर
* कसारा-कसारा गाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news