

मका हे औद्योगिकद़ृष्ट्या महत्त्वाचे पीक आहे. अन्नधान्य, पशुपक्षी खाद्य, चारा याशिवाय रोजच्या वापरासाठी 500 च्यावर मूल्यवर्धित उत्पादने ग्राहकांकरिता कारखाने तयार करतात. यामध्ये कॉर्नतेल, डेक्ट्रोज, स्टार्च, अल्कोहोल, सेंद्रिय आम्ल यांचा समावेश होतो. मूल्यवर्धित उत्पादने तर आता सर्वांना परिचित झालेली आहेत. यासोबत मक्याचे आणखी महत्त्वाचे उपयोग वाढले आहेत.
हायड्रॉल – जेव्हा डेक्ट्रोज साखरेचे स्फटिक वेगळे केले जातात, तेव्हा हे गर्द तपकिरी मळीचे उपउत्पादन मिळते. पदार्थाला गोडी आणण्यासाठी याचा उपयोग करतात.
लॅक्ट्रिक आम्ल – हे मका प्रक्रियेतील उपउत्पादन असून काही अन्नपदार्थ, फळांची जेली, अर्क, पेये, मिठाई, लोणची इत्यादी पदार्थांचा स्वाद आणण्यासाठी याचा उपयोग होतो.
सॅर्बिटॉल – याचा उपयोग अन्नपदार्थांचे फेसाळ मिश्रण करण्यासाठी होतो. डेक्ट्रोजपासून कॅटेनेटिक हायड्रोजनच्या प्रक्रियेने हा तयार होतो. आंबवण्याच्या क्रियेमधून सॅर्बिटॉलपासून 'क' जीवनसत्त्व (अॅस्कॉबिक अॅसिड) तयार करतात.
ग्लुटेन आणि हल्स – वेट मिलिंग प्रक्रियेतून ही उत्पादने तयार होतात. याचा उपयोग अन्नघटक म्हणून होतो. यात प्रथिने आणि अन्नद्रव्ये असतात.
झेन – मक्याच्या चिकट पदार्थांतील हे एक प्रथिन आहे. सॉल्व्हट, एक्ट्रॅक्शन आणि प्रेसिपिटेशन तंत्राने हे वेगळे करतात. औषधांच्या गोळ्यांचे आवरणासाठी याचा उपयोग होतो. तसे त्यांचे औद्योगिक उपयोग बरेच आहेत.
– विश्वास सरदेशमुख