

तृणधान्य पिकांच्या उत्पादनात गहू व भात पिकांनंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकांत सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते.
अन्नधान्याव्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अॅसिटिक व लॅटिक अॅसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लास्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्झीन तसेच बूट पॉलिश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरिता होतो.
मका हे उष्ण, समशितोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्यवाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान (20 ते 25 अंश सेल्सिअस) आहे. अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनावेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. तेव्हा या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा.
मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्यकता असते. लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचर्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. विशेषतः, नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते; परंतु अधिक आम्ल (सामू 4.5 पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त (सामू 8.5 पेक्षा अधिक) जमिनीत हे पीक घेऊ नये, तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी.
जमिनीची खोल (15 ते 20 सें.मी.) नांगरट करावी. कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी एकरी 4 ते 5 टन (10 ते 12 गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही.
उशिरा पक्व होणारे वाण : संकरित-पीएचएम 1 व 3, सीड टेक 1314, बायो 9681, एचएम 11, क्यूपीएम 7
संमिश्र-प्रभात, शतक 9905
मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण : संकरित-डीएचएम 119 व 117, एचएम 10, 4 व 8, पीएचएम 4
संमिश्र-करवीर, मांजरी, नवज्योत
लवकर पक्व होणारे वाण : संकरित-जेएच 3459, पुसा हायब्रीड 1, जेके 2492
संमिश्र-पंचगंगा, प्रकाश, किरण
अतिलवकर पक्व होणारे वाण : संकरित- विवेक 9, 21, 27, विवेक क्यूपीएम 7
खरीप हंगामात 15 जून ते 15 जुलै, रब्बी हंगामातील लागवड 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी.
एकरी 6 ते 8 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2 ते 2.5 ग्रॅम थायरम चोळावे. रासायनिक बीज प्रक्रियेनंतर 1 तासाने प्रतिकिलो बियाण्याला अॅझोटोबॅक्टर 25 ग्रॅम प्रक्रिया करावी. उशिरा व मध्यम येणार्या वाणांसाठी 75 ु 20 से.मी. व लवकर येणार्या वाणांसाठी 60 ु 20 से.मी. अंतरावर टोकण पद्धतीने 4-5 से.मी. खोलीवर पेरणी करावी. जमिनीच्या प्रकारानुसार सरी वरंबा अथवा सपाट वाफ्यांवर पेरणी करावी.
पेरणी संपताच वाफशावर अॅट्राझीन (50 टक्के) तणनाशक 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे. तणनाशक फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्यकता वाटल्यास एखादी खुरपणी करावी. मका उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी.
पेरणीच्या वेळी 16 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 16 किलो स्फुरद, 10 ते 12 किलो झिंक सल्फेट द्यावे. पेरणीनंतर 30 व 45 दिवसांनी प्रत्येकी 16 किलो नत्र द्यावे.
पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था – कालावधीमध्ये रोप अवस्था (25 ते 30 दिवस पेरणीनंतर), फुलोर्यात असताना (40 ते 60 दिवस पेरणीनंतर), दाणे भरण्याच्या वेळी (70 ते 80 दिवस पेरणीनंतर) पाणी द्यावे. पीक फुलोर्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे म्हणजे कणसे भरण्यास मदत होते.
पर्ण करपा : या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
खोडकीड
अळी सुरुवातीला पानावर उपजीविका करून नंतर पोंग्यातून आत शिरते. रोपाच्या आतील भागावर उपजीविका करते. परिणामी, सुरळी वाळते. कीड पोंग्यातून आत शिरत असल्याने पानांवर एका सरळ रेषेत बारीक छिद्रे दिसून येतात. प्रादुर्भाव रोपावस्था तसेच पीक फुलोर्यात असताना होतो.
वाळलेल्या सुरळ्या अळ्यांसह उपटून जाळून टाकाव्यात.
शेत स्वच्छ ठेवावे.
प्रकाश सापळा वापरावा.
इतर पर्यायी कीड वाढणार्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीची अंडी असलेली 3 कार्ड प्रतिएकरी लावावीत.
अॅझाडिरेक्टिन (1500 पीपीएम) 5 मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे उगवणीनंतर 15 दिवसांनी फवारावे.
डायामिथोएट (30 ईसी) 1.2 मि.लि. प्रतिलिटर पाण्यातून फवारावे.
प्रथमत:, मक्याच्या स्त्री केसरावर उपजीविका करते. त्यानंतर ती कणसात प्रवेश करते व दाण्यांवर उपजीविका करते. कीड दाणे खात असल्याने उत्पादन घटते. विष्ठेमुळे कणसात बुरशीची वाढ होते. कणसांची गुणवत्ता खालावते.
पिकांचे आणि इतर पर्यायी कीड वाढणार्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीची अंडी असलेले 3 कार्ड प्रतिएकरी लावावेत.
एचएएनपीव्ही 200 एलई प्रतिएकरी वापरावे.
अळी आपली उपजीविका पानांवर करते. सुरुवातीच्या अवस्था कोवळ्या पानांवर उपजीविका करतात. नंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करतात. दुसर्या व तिसर्या अवस्थेतील अळी काहीवेळा पानांच्या कडापासून आतल्या भागापर्यंत खातात. नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने पीकवाढीचा भाग खातात, जेणेकरून तुरा बाहेर येत नाही. कोवळी कणसे खातात.
शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.
एकरी 15 कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही. पिकाच्या सुरुवातीच्या 30 दिवसांपर्यंत पोंग्यात वाळू व चुना 9:1 या प्रमाणात टाकावे.
एकरी 10 पक्षीथांबे लावावेत.
– पिकाचे आणि इतर पर्यायी कीड वाढणार्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
– अंड्यांवर उपजीविका करण्यार्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी 50,000 अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत.
नोमुरिया रायली 3 ग्रॅम किंवा मेटारायझिअम निसोप्ली 5 ग्रॅम यापैकी एका बुरशीजन्य कीटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अळीच्या वाढीच्या लवकरच्या (1 ते 3) अवस्था – झाडिरेक्टिन (1500 पीपीएम) 5 मि.लि. थायमेथोक्झाम (12.6 टक्के) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (9.5 टक्के झेडसी) 0.5 मि.लि. किंवा स्पिनोटोराम (11.7 एससी) 0.9 मि.लि. किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (18.5 एससी) 0.4 मि.लि.
मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यानंतर कणसाची कापणी करावी आणि मळणी यंत्रावर मळणी करावी.
उत्पादन : खरीप-30-32 क्विंटल/एकर, रब्बी-38-40 क्विंटल/एकर.
– डॉ. दादासाहेब खोगरे,
विषय विशेषज्ञ, सांगली