

खरीप हंगामात भाताच्या शेतात खेकडा हा प्राणी आढळतो. तो आपल्या सर्वांच्या परिचयाचा असलातरी भात शेतीचे तो नेमके कसे नुकसान करतो हेच अनेक जणांना ठाऊक नाही.
खेकड्यामुळे भाताचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खूपच नुकसान होते. मान्सूनचा पाऊस सुरू होताच खेकडे त्यांच्या बिळातून बाहेर पडतात आणि भाताची कोवळ रोपे जमिनीलगत कापून बिळांमध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. खेकडे दिवसा बिळांमध्ये राहतात आणि रात्री भाताची रोपे कातरतात. परिणामी भाताच्या रोपांची संख्या कमी होऊन प्रती हेक्टरी उत्पादनात फारच घट येते. त्यामुळे काही वेळा बांधालगत भाताची पुन्हा लावण करावी लागते. तसेच भात लावणीनंतर दीड महिन्यांपर्यंत खेकड्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय खेकडे भातखाचराच्या बांधास मोठ्या प्रमाणात छिद्रे पाडतात. परिणामी भात पिकाच्या वाढीस अत्यावश्यक असलेले पाणी भात खाचरामध्ये साचून राहत नाही. परिणामी बांधाची वरचेवर दुरुस्ती करणे भाग पडते आणि बांधबंदिस्तीचा खर्च वाढतो.
खेकड्याच्या नियंत्रणासाठी पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेच रॉकेलमिश्रित पाण्यात त्यांना टाकून त्यांचा नाश करता येतो. तसेेच विषारी आमिषांचा वापर करूनही खेकड्यांचे नियंत्रण प्रभावीपणे करता येते. बेडूक हा खेकड्यांचा नैसर्गिक शत्रू आहे. भात खाचरामध्ये बेडकांचे जतन केल्यास खेकड्यांपासून होणारे नुकसान कमी करता येते.
खरेतर भात खाचरामध्ये आढळणार्या खेेकडा, चिंबोरी आणि मुठ्या या तीनही जाती खाद्य म्हणून उत्तम आहेत. म्हणून पावसाळा सुरू होताच बांधावरील खेकडे पकडून खाण्यासाठी वापर करणे किंवा पकडून त्यांची विक्री करणे दुहेरी फायद्याचे आहे. यामुळे खेकड्यांच्या नियंत्राबरोबरच आर्थिक फायदाही होतो.
– जयदीप नार्वेकर