भिशीचे नवे रूप : डेली एसआयपी

भिशीचे नवे रूप : डेली एसआयपी
Published on
Updated on

म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी डेली एसआयपी योजना सुरू केली आहे. यामध्ये नियमितपणे शे-दोनशे रुपये गुंतवणूक करत राहिल्यास काही वर्षांत लक्षाधीश-कोट्याधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. सध्या निवडक कंपन्यांनी ही योजना सुरू केली आहे.
डेली एसआयपी कोण घेऊ शकतो?

डेली एसआयपी हा अशा व्यक्तींसाठी आहे की, जे मासिक आधारावर कोणतीही बचत करू शकत नाहीत. यामध्ये रस्त्यावरचे फेरीवाले, पान टपरीधारक, चहाची टपरी चालवणारे, चपला दुरुस्त करणारे, टेलर, प्लंबर, बांधकाम मिस्त्री आदींचा समावेश करता येईल. यांची उपजीविका रोजच्या कमाईवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांचे दररोज काही ना काही उत्पन्न असतेच. परंतु, त्यांच्यात गुंतवणुकीबाबत फारशी सजगता नसल्याने ते पैसे गुंतवण्याबाबत विचार करत नाहीत. अशा लोकांसाठी दीर्घकालीनद़ृष्ट्या ही एक चांगली गुंतवणूक योजना ठरू शकते.

फायदा काय?

बाजारातील दररोजच्या चढउताराचा फायदा गुंतवणूकदारांना प्रत्येक दिवशी मिळेल. या म्युच्युअल फंड योजनेत एसआयपीची रक्कम जमा होताच गुंतवणूकदारांना दररोज युनिट मिळतील. या आधारे गुंतवणूकदारांना त्याच्या गुंतवणुकीवर बाजाराचा लाभ मिळेल.
डेली एसआयपीतून किती उत्पन्न?

दररोजच्या आधारावर म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या आधारे गुंतवणूक केल्यास ठराविक काळानंतर आपल्या पदरात पडणारी रक्कम ही आपल्या कल्पनेपलीकडची राहू शकते.

यासाठी एक उदाहरण घेऊ. एखादा व्यक्ती दरोज शंभर रुपये म्युच्युअल फंड योजनेत दहा वर्षांसाठी गुंतवणूक करत असेल, तर त्याला 12 टक्क्याने परतावा मिळेल असे गृहीत धरून त्याने दहा वर्षांत 3,65,000 रुपये गुंतवणूक केल्यास दहा वर्षांनंतर 7 लाख 5 हजार रुपये मिळतील. याप्रमाणे याच परताव्याच्या आधारे पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारास सुमारे 15.35 लाख रुपये मिळतील, तर पंधरा वर्षांत त्याची गुंतवणूक सुमारे 5.47 लाख रुपये असेल.

याप्रमाणे 20 वर्षांसाठी दररोज शंभर रुपये गुंतवले तर तो म्युच्युअल फंडामध्ये 7.30 लाख रुपये टाकेल. पण परताव्यापोटी ही रक्कम 30.48 लाख होईल. तीस वर्षांसाठी त्याने 10 लाख 95 हजार रुपये गुंतवले तर त्याला 1 कोटी 82 हजार रुपये परतावा मिळेल.
म्युच्युअल फंड कंपन्यांनी नव्या योजनेच्या माध्यमातून किरकोळ व्यापारी आणि फेरीवाल्यांना बाजाराचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांच्या प्रचार-प्रसारामुळे एसआयपी हा शब्द सर्वदूर प्रचलित झाला आहे. पण आता यामध्ये एक नवा पैलू जोडला गेला आहे. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवण्याठी म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी सर्वांकडे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे बहुतांश मंडळी, मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक या आधारावर एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत राहतात. परंतु काही जणांना तेही शक्य होत नाही. अशा व्यक्तींना आता दररोजच्या कमाईतून, उत्पन्नातून मिळणार्‍या पैशातील काही वाटा बाजूला काढत गुंतवणूक करता येणे शक्य आहे.

– प्रसाद पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news