

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भारताकडून खरेदी केल्या जाणार्या कच्च्या तेलाचे अर्थात इंडियन बास्केट क्रूडचे दर दहा वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले असून यामुळे आगामी काळात सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ अटळ असल्याचे मानले जात आहे. इंडियन बास्केट क्रूडचे भाव शुक्रवारी 121 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारितील पेट्रोलियम व्यवस्थापन आणि विश्लेषण विभागाकडून क्रूड तेलाच्या दरातील चढ-उतारावर लक्ष ठेवले जाते. या विभागाकडून इंडियन बास्केट क्रूडचे दर दहा वर्षांच्या उच्चांकी स्तरावर गेल्याची माहिती देण्यात आली. याआधी 2012 साली वरील स्तरावर इंडियन बास्केट क्रूडचे दर गेले होते.
रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर शुक्रवारी 123 डॉलर्स प्रति बॅरलवर गेले होते. जागतिक बाजारातले हे दर तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर आहेत. कच्च्या तेलाचे दर चढे असले तरी मागील काही काळापासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवलेले आहेत. हे दर आगामी काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतात सध्या पेट्रोलची जी विक्री केली जाते, ती 85 डॉलर्स प्रति बॅरल या मानकानुसार केली जाते. महागाई दरात वाढ होउन सर्वसामान्यांना त्याची झळ बसू नये, यासाठी सरकारकडून काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्कात मोठी कपात करून दिलासा देण्यात आला होता.