

अहमदाबाद; वृत्तसंस्था : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील निर्णायक सामना गुरुवार (दि.9) पासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर असून हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेषत: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या द़ृष्टीने ही लढत टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. ऑस्ट्रेलियन संघ आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा सामना अनिर्णीत राहिला, तरच श्रीलंकेचा पराभव किंवा न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णीत राहणे टीम इंडियाला पुढे नेऊ शकेल.
यष्टिरक्षक फलंदाज के. एस. भरतची फलंदाजीतील खराब कामगिरी लक्षात घेऊन भारतीय संघ व्यवस्थापनाने झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला चौथ्या आणि अंतिम कसोटी सामना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. भरतला गेल्या एक वर्षापासून ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून तयार केले जात होते आणि तो भारत 'अ' संघाचा नियमित सदस्य होता. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांत त्याने 8, 6, 23, 17 आणि 3 धावा केल्या आहेत. तरीदेखील भरतला आणखी संधी देण्याबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघ तिसर्या कसोटीतील धमाकेदार विजयामुळे आत्मविश्वासाने भारलेला आहे. चौथी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि त्याचे सहकारी उत्सुक असणार आहेत. पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचे विमान उंच गेले होते. मात्र, तिसर्या सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाला आपला हिसका दाखवला. त्यामुळे ही निर्णायक कसोटी जिंकण्यासाठी भारताला प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एस. भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया : स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहेनमन, मार्नस लॅबूशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
चौथ्या कसोटीत श्रेयस अय्यरला वगळले जाण्याची शक्यता असून त्याच्या जागी सूर्यकुमार यादवचा समावेश अंतिम अकरांमध्ये होऊ शकतो. सूर्यकुमारला पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती. पण, त्याला अपयाशाचा सामना करावा लागला.
हा निर्णायक कसोटी सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. स्टेडियमच्या बाहेरही मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार्या कसोटी सामन्यासाठी मेट्रोचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. मोदी आणि अल्बनीज हे 9 रोजी सकाळी 8 च्या सुमारास स्टेडियममध्ये पोहोचतील. सामना सुरू होण्याआधी दोन्ही पंतप्रधान संघातील खेळाडूंची भेट घेतील. स्टेडियममध्ये काही काळ सामन्याचा आनंद लुटल्यानंतर मोदी स्टेडियममधून राजभवनकडे रवाना होतील. नंतर दुपारी 2 वाजता ते दिल्लीला जाणार आहेत.
शेवटच्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. इंदूर कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. तिथे उमेश यादवने झकास मारा केला. शमी अनुभवी गोलंदाज असल्यामुळे सिराजच्या जागेवर शमीचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
या मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळवण्यात आला होता. हा सामना केवळ अडीच दिवसांतच संपल्यामुळे इंदूरमधील लाल मातीच्या खेळपट्टीवर जोरदार टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर, अहमदाबादच्या मैदानावर दोन खेळपट्ट्या असून सध्या त्या झाकून ठेवल्या आहेत. म्हणजेच, हा सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार? याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. ही लढत कोणत्या खेळपट्टीवर खेळवली जाईल, हे अगदी ऐनवेळी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, 2021 मध्ये याच मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामने वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळवले गेले. यापैकी एक सामना दोन दिवसांतच संपला होता.
चौथ्या कसोटीत टीम इंडियाला टेस्ट चॅम्पियनच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी विजय मिळवावाच लागेल. मात्र, भारताचा पराभव झाल्यास, तसेच सामना अनिर्णीत राहिला तर श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. जर टीम इंडिया हा सामना जिंकू शकली नाही आणि श्रीलंकेने न्यूझीलंडला 2-0 ने पराभूत केले तर श्रीलंकेला फायनलचे तिकीट मिळेल. मात्र, न्यूझीलंडचा पराभव करणे श्रीलंकेसाठी सोपे नसेल. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समध्ये पोहोचली तर फायनल्समध्ये टीम इंडियाचा सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाशी होईल. लंडनमध्ये 7 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे.