भाजप-मनसे युती : नव्या गणिताची चाहूल?

Published on
Updated on

अनेक मोठ्या गोष्टींची सुरुवात अगदी किरकोळ स्वरूपात होत असते. जेव्हा आरंभ होतो, तेव्हा गांभीर्याने दखल घेण्यासारखी बाब नाही, असे दुर्लक्षही होत असते; पण कालौघात तीच बाब किंवा घटना इतकी मोठी होऊन जाते की, त्याचा आरंभ कधी व कुठे झाला त्याचा शोध घेत जावे लागते. सध्या महाराष्ट्रात तशीच एक किरकोळ वाटणारी घटना घडलेली आहे आणि तिची फारशी दखल राजकीय वर्तुळात घेतली गेलेली नाही. ती भाजप-मनसे यांची एका पालघर जिल्ह्यातल्या निवडणुकांसाठी झालेली युती. 1988 मध्ये अशीच युती शिवसेना व भाजप यांच्यात झालेली होती आणि पुढल्या काळात त्याच युतीने राज्याची राजकीय समीकरणे बदलून टाकली. आता ती युती नामशेष झालेली असून त्यातलेच दोन पक्ष राज्यातले मुख्य पक्ष बनले आहेत आणि कधीकाळी राज्यात प्रमुख असलेला काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे. तब्बल 53 वर्षांपूर्वी अशीच एक युती मुंबईत प्रजा समाजवादी पक्ष आणि शिवसेना यांच्यात झालेली होती. तेव्हा काँग्रेसखेरीज संयुक्‍त महाराष्ट्र समिती हा मोठा गट होता. ज्यात बहुतांश विरोधी पुरोगामी पक्षांचा अंतर्भाव होता आणि शिवसेना नव्याने रांगू लागलेली होती; पण 1967 च्या ठाणे नगरपालिका निवडणुकीत 'प्रसपा'ने शिवसेनेशी युती केली आणि प्रथमच शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली. ठाण्यात तिचा नगराध्यक्षही निवडून आलेला होता. पुढल्या काळात प्रजा समाजवादी पक्षही शिल्लक राहिला नाही. उलट मागल्या अर्धशतकात शिवसेना राज्यातला एक प्रमुख पक्ष बनला. शिवसेनेला मुंबईत धिंगाणा करणारा तरुणांचा जमाव असेच त्याकाळात मानले जात होते. त्यामुळेच एखादी युती वा आघाडी किंवा घटना तत्काळ झटकून टाकता येत नसते किंवा निरर्थक ठरवता येत नसते. त्यात भविष्याची बीजे पेरलेली असू शकतात. पालघरच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपशी मनसेने मिळवलेला हात म्हणूनच पुढले भविष्य कसे घडवतो, याकडे लक्ष ठेवले पाहिजे. ती युती भविष्यात राज्यव्यापी होऊ शकेल का आणि दरम्यान राज्यातल्या महाविकास आघाडीतले मतभेद विकोपास गेल्यास कोणती परिस्थिती उद्भवेल, याचाही एकत्रित विचार करण्याला पर्याय नाही. नाही तरी, भाजपला शिवसेनेने साथ सोडल्यापासून राज्यात कोणीतरी जोडीला हवा आहे आणि लागोपाठच्या निवडणुकीत अपयश आलेल्या मनसेलाही नव्याने आपल्या पायावर उभे राहायचे आहे. त्याचा आरंभ कुठून आणि कसा करायचा, ही समस्या दोघांपुढे होती; पण ती कोंडी पालघरच्या स्थानिक नेत्यांनी फोडलेली दिसते. तिथल्या मतदानाचे निकाल पुरक व पोषक आल्यास भविष्यात हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या पक्रियेला वेग मिळू शकतो.

यात भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून त्याला प्रादेशिक अस्मितेचा बागुलबुवा करणे परवडणारे नाही, तर मनसे पक्षच मुळात प्रादेशिक म्हणजे मराठी अस्मितेचा पाया घेऊन उभा राहिलेला आहे. साहजिकच निदान मुंबईपुरती तरी दोघांनी एकत्र येण्यात अडचण आहे. यापूर्वी शिवसेनाही प्रादेशिक अस्मितेवर उभी होती आणि तरीही भाजपने हिंदुत्वाचा वसा घेतलेल्या शिवसेनेला त्याच कारणास्तव सोबत घेतले होते. साहजिकच मनसेला सोबत घेताना सेनेसोबतचा अनुभव विचारात घेतला जाऊ शकतो; पण शिवसेनेचा परप्रांतीयांवरचा रोष वा राग विधानसभेच्या सातत्याच्या यशानंतर कमी होत गेला आणि अलीकडल्या काळात पूर्णपणे मावळला म्हटले तरी बिघडणार नाही. तिथूनच मनसेचा आरंभ झालेला आहे. साहजिकच परप्रांतीयांच्या विरोधातली मनसेची प्रतिमा जितकी ताजी आहे, तितकी शिवसेनेबद्दल नाही. त्यामुळेच थेट मनसेला सोबत घेण्याचे भय भाजपला वाटत असावे; पण पालघरचे मतदान त्या भयाला संपवू शकले, तर या दोन पक्षांच्या भविष्यकालीन युतीला खतपाणी घातले जाऊ शकते. कारण, त्या दोघांना एकत्र येण्यासाठी परस्परांची गरजही आहे. शिवसेनेने सोबत सोडल्याने विजयासाठी आवश्यक असलेला टेकू देणारा पक्ष भाजपला हवा आहे, तर मोदीयुगात झालेल्या पडझडीतून सावरण्यासाठी मनसेलाही कुणा समर्थ पक्षाची गरज आहे. हे दोघांनाही कळते; पण पूर्वग्रह वा राजकीय समजुतीमधून बाहेर पडणे सर्वांनाच अवघड असते. म्हणूनच दोन्ही बाजूंची इच्छा व अपेक्षा उघड दिसत असतानाही त्याविषयी प्रश्‍न विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत राहिलेली आहेत. त्यालाच कोंडी म्हणतात. अशी कोंडी पालघरमध्ये फुटली, असे म्हणता येईल. कारण, हा समझोता स्थानिक व प्रासंगिक असल्याचे सांगून आजही दोन्ही पक्षांना हात झटकणे शक्य आहे आणि त्याची फलश्रुती चांगली झाली नाही, तर पुढले पाऊल टाकण्याचे तसे कारणही उरणार नाही. म्हणूनच ही सुरुवात आहे, असे म्हणावे लागते. मनसे हा पक्ष तुलनेने नवा आणि तरुण असला, तरी नेत्यामध्ये झंझावात निर्माण करण्याची क्षमता आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाशी जवळीक करून चटकेही सोसलेला पक्ष आहे. त्यामुळे अत्यंत सावधपणे पुढली पावले टाकत वाटचाल करू बघणार्‍यांनी धाडसी पाऊल टाकावे, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. म्हणूनच याला सुरुवात किंवा चाचपणी संबोधणे योग्य ठरेल. मागल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे अवलोकन केले, तर भाजपला निर्विवाद वर्चस्व स्थापन करण्यासाठी दोन-पाच टक्के मते कमी पडतात आणि आज तरी मनसेपाशी तितकी मते सहज मिळवण्याची ताकद आहे. हे गणित समजले, तर अशी युती कोणता इतिहास घडवू शकेल, त्याचा अंदाज येऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news