

लंडन, वृत्तसंस्था : आता कॅन्सर, विशेषत: 'ब्रेस्ट कॅन्सर'ने होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य होणार आहे. शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातील कॅन्सरच्या पेशी नेमकेपणाने ओळखणे फार सोपे होणार आहे. लंडन येथील इम्पेरियल महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी त्यासाठी अँडो मायक्रोस्कोप (मायक्रो रोबो) तयार करण्यात यश मिळविले आहे.
मूळच्या भारतीय खुशी व्यास यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पार पडले. हे उपकरण 1 मिलिमीटर आकाराचे आहे. लहान आकारामुळे शस्त्रक्रियेदरम्यान ते शरीरात पाठविता येऊ शकेल. किंबहुना, त्याचे डिझाईनच तशा पद्धतीने करण्यात आले आहे. हा मायक्रोस्कोप शरीरातील कॅन्सरच्या पेशींचे फोटो स्क्रीनवर पाठवतो. ते पाहून कॅन्सरच्या पेशी नेमकेपणाने काढणे आता अत्यंत सोपे होईल. हा मायक्रोस्कोप एक मिलिमीटरच्या शंभराव्या भागाएवढी लहान कॅन्सरग्रस्त पेशी हेरण्यातही तरबेज आहे.
या संशोधनामुळे कॅन्सरच्या पुन्हा करावयाच्या ऑपरेशनपासून बर्याचअंशी मुक्तता मिळेल. कॅन्सर पेशी काढून टाकायच्या, तर अनेकवेळा ऑपरेशन्स करावी लागतात. एकाचवेळी शरीरातील सार्या कॅन्सरग्रस्त पेशी शोधून काढणे शक्य नसते, हे त्यामागचे कारण होय; पण आता ही अडचण दूर होणार आहे.
उपकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये
या उपकरणाचा वापर 'ब्रेस्ट कन्झर्व्हिंग सर्जरी'त केला जाऊ शकेल. ही शस्त्रक्रिया कॅन्सर पेशी काढल्यानंतर 'ब्रेस्ट रिस्ट्रक्चरिंग'साठी केली जाते.
हे उपकरण ट्यूमर्सजवळच्या पेशींची नेमकी स्थिती अत्यंत कमी वेळेत आणि अचूकपणे शोधून काढते. सेकंदात 120 छायाचित्रे घेते. पेशी कॅन्सरग्रस्त आहे की नाही, हे डॉक्टरांना त्यामुळे पटकन कळते.
हे उपकरण वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले जाईल. येत्या 5 वर्षांत ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेसाठी ते जगभर उपलब्ध व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.
– डॉ. खुशी व्यास, शास्त्रज्ञ, इम्पेरियल कॉलेज, लंडन