बोरिवलीत नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : बोरिवली पश्चिमेकडील वॉर्ड क्र. 16 मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात बोलावून भाजपा वॉर्ड अध्यक्षाने एका महिला समाजसेविकेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून बोरिवली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला बोरिवली येथील रहिवासी असून तिला समाजसेवेची आवड असल्याने तिने 2020 साली नगरसेविका खेडेकर यांच्या कार्यालयात जाऊन आरोपी प्रतीक साळवी याची भेट घेतली होती. दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांकही दिले. त्यानंतर साळवीने सदर महिलेला 15 ऑगस्ट, 2021 रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास खेडेकर यांच्या वझीरा नाका येथील संपर्क कार्यालयात बोलावत तिचा विनयभंग केला.
याची तक्रार तिने खासदार गोपाळ शेट्टी तसेच आमदार सुनील राणेंकडे केली, तेव्हा नगरसेविका खेडेकर यांनी तिला कार्यालयात बोलावून घेतले आणि तक्रार का केलीस? असा जाब विचारला. तिने खेडेकर यांना घडला प्रकार सांगितला.
साळवीच्या अश्लील वर्तनाबाबत तिने नगरसेविका आसावरी पाटील, बोरिवली विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा निवळे, अश्विनी देसाई यांनाही कल्पना दिली. निवळे यांनी तिच्याच श्रीमुखात भडकविले तर खेडेकर, पाटील व देसाई यांनी तिला मारहाण करत ऑफिसबाहेर धक्के देत शिवीगाळ केली, असा आरोप या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.
कुठेही न्याय मिळत नसल्याने अखेर तिने सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांची भेट घेतली. घोलप यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कानावर सदर प्रकार घातला. घडल्या प्रकाराची गंभीर दखल ना. पाटील यांनी घेतली. बोरिवली पोलिसाना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आरोपी साळवी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला बोरिवली पोलिसांनी अद्यापही अटक केली नसून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

