बेळगाव : तुम्ही आडमुठे, पण आम्हीही मर्‍हाठे

बेळगाव : पोलिसांचे अडथळे पार करत मराठा मंदिर सभागृहात दाखल झालेली युवा शक्ती.
बेळगाव : पोलिसांचे अडथळे पार करत मराठा मंदिर सभागृहात दाखल झालेली युवा शक्ती.
Published on
Updated on

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकी अत्याचारांनी पेटून उठलेला मराठी माणूस आणि त्याला रोखण्यासाठी शहराच्या सर्व बाजूंनी केेलेली नाकेबंदी… अंगावर काळे कपडे दिसताच चवताळणारे पोलिस आणि माघारी धाडण्यासाठी झालेली मुस्कटदाबी… वर गुन्हे नोंदवण्याची धमकावणी… अशा अन्यायी वर्तणुकीवर मात करत अस्तित्वाच्या लढ्यात मराठी माणसाने केंद्र सरकारचा आणि कर्नाटकी दडपशाहीचा सोमवारी निषेध केला.

मराठी माणसाच्या निर्धारासमोर कर्नाटकी मुस्कटदाबी फिकी पडली. मराठा मंदिराकडे जाणारे सारे मार्ग पोलिसांनी बंद केले, नेत्यांना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी मराठी भाषिकांची निर्धारित निषेध सभा झालीच. या सभेत सीमालढा कोणत्याही अडचणीतून पुढे नेण्याचा निर्धार युवा शक्तीने केला.

पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रचंड मुस्कटदाबीचा विरोध करत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अन्यायाचा निषेध करण्यासाठी मराठा मंदिर येथील सभागृहात धरणे आंदोलन आयोजित केले होते. पण, या आंदोलनात मराठी जनता सहभागी होऊ नये, यासाठी पोलिसांनी शहराच्या सर्व बाजूंनी नाकाबंदी केली होती.

कोरोना महामारीमुळे मूक सायकल फेरी काढण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे समिती नेत्यांनी निषेध सभा घेणारच, असा निर्धार केला होता. मात्र धरणे आंदोलन होवू नये, यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांच्या घरासमोर पहाटे तीन वाजल्यापासूनच बंदोबस्त ठेवून नेत्यांना स्थानबद्ध केले होते. 'साहेबांनी सांगितल्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही', इतकेच ते नेत्यांना सांगत होते.

तथापि, आम्ही दहशतवादी नाही, कोणत्याही स्थितीत आम्ही आंदोलन करणाच आहोत. हवे तर आम्हाला अटक करा, असा निर्धार समिती नेत्यांनी केला.

काळ्यादिनी केंद्र सरकारने आपल्यावर अन्याय केला. त्यामुळे कोणत्याही स्थितीत केंद्र सरकारला याविरोधात जाब विचारायचा आहे, या भावनेतून लोक आंदोलनस्थळी जमत होते. आंदोलन स्थळावर पोलिस साहाय्यक आयुक्त नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली चार सीपीआय आणि दीडशे पोलिसांचा ताफा ठेवण्यात आला होता. तरीही लोक मराठा मंदिरापर्यंत पोचले.

युवा वर्गाचा भरणा

महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या या धरणे आंदोलनात प्रामुख्याने युवा वर्गाने सर्व अडथळे पार करत आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवली. पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून युवा वर्ग आंदोलनात सहभागी होत होता. त्यामुळे आंदोलनाला नवे बळ आल्याचे चित्र दिसून येत होते. तर आंदोलनातही युवा वर्गाने परखडतेने आपले मत व्यक्त करून भावनांना वाट मोकळी करून दिली.

कर्नाटकी हिडीसपणा

एकीकडे मराठी भाषिक काळ्यादिनानिमित्त सुतक पाळत असताना बेळगाव बाहेरुन आलेल्या कन्नडिगांचा शहरात काही ठिकाणी हिडीसपणा दिसून आला. विनाकारण वेगाने वाहने चालवणे, मराठी लोकांविरोधात घोषणाबाजी करणे असे प्रकार आढळून आले. एकीकडे प्रशासन आणि कथीत कन्नड संघटनांनी अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे राज्योत्सव साध्या प्रमाणात करणार, असे जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात पोलिस संरक्षणात अनेक ठिकाणी कर्नाटकी हिडीसपणा दिसून आला. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त करण्यात आला.

सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच मराठा मंदिरकडे येणारे बेळगाव शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. काळे कपडे घालणार्‍यांवर पोलिसांनी दादागिरी सुरू केली. त्यामुळे त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला. पण, अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला. पोलिसांच्या दडपशाहीमुळे लोकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. विजापूर आणि राज्यातील इतर भागातून पोलिसांना बंदोबस्तासाठी आणण्यात आले होते. त्यामुळे मराठी जनतेवर दादागिरी वाढली होती.

* लोक मराठा मंदिरपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी सर्व बाजूंनी रस्ता अडवणूक
* बंदोबस्तासाठी परजिल्ह्यातील पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांची नियुक्ती
* महाराष्ट्रातील नेते येण्याच्या चर्चेमुळे पोलिस सतर्क; रुग्णांचीही अडवणूक
* कार्यकर्त्यांनी पायी गाठले मराठा मंदिर; आंदोलनात चिमुकलेही सहभागी
* दुपारपर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील बस बंद; बाहेरून येणार्‍यांंची कोंडी
* खानापूरमध्ये समितीच्या दोन्ही गटांकडून उपोषण, पण वेगवेगळ्या ठिकाणी
* कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने, कन्नड फलक काढून टाकण्याचा इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news