बेपत्ता महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार

बेपत्ता महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार
Published on
Updated on

दक्षिण सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल, अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला… तीच मृत समजून तिच्यावर ओळख पटवत अंत्यसंस्कारही करण्यात आले. पण दुसर्‍याच दिवशी चौकशीत संबंधित महिला जिवंत असल्याचे दिसून आले. ती भंडारकवठेत आढळून आली. एकूणच चित्रपट कथानकाप्रमाणे मंगळवारी हा प्रकार समोर आला. त्यामुळे पुन्हा मृतदेह सापडलेला आणि जिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे, ती कोण? तिचा खुनी कोण हा प्रश्‍न पुन्हा पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.

वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत कबणस येथील काशिनाथ शंकर माळी यांच्या पत्नी हरविली होती. त्याची तक्रार माळी यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार त्यांचा शोधाशोधही सुरू होता.

दरम्यान, बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह माळरानावर अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्‍त केला होता.

एकीकडे खुनाचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे बेपत्ता महिलेसंदर्भात माहिती घेवून कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्जेराव पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांच्या पथकास जिल्हयात व लगतच्या जिल्हयात बेपत्ता असणार्‍यांसंदर्भात माहिती घेवून गुन्ह्याची उकल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

यावेळी काशीनाथ माळी व त्यांचा मेहुणा यांना बोरामणीजवळ बेवारस अवस्थेत महिलेचा मृतादेह आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते पोलिस ठाण्याकडे धावले. पोलिसांनी याबाबत संबंधितांना बोलावून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे असलेल्या अनोळखी स्त्रीचा मृतदेह दाखविला. यावेळी काशीनाथ, त्याचा भाऊ तसेच नातेवाईकांनी अनोळखी मृतदेह ओळखला. हा मृतदेह काशीनाथच्या बेपत्ता पत्नीचाच असल्याची प्रतिज्ञापत्राद्वारे ओळख पटविली. त्यानुसार प्रशासनाने मृतदेह संबंधितांच्या ताब्यात दिला. त्यानुसार संबंधितांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारही केले.

मात्र पुन्हा या घटनेत अचानक पुन्हा ट्विस्ट आले. गुन्हे शाखेच्या पथकास तांत्रिक विश्लेषणावरून असे आढळून आले की, वळसंग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील महिला ही जिवंत आहे. ती मौजे भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर येथील पत्राशेडमध्ये मागील काही दिवसापासून भाड्याने राहवयास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी भंडारकवठे येथे जावून पत्राशेडमध्ये शोध घेतला. त्यावेळी तेथे बेपत्ता महिला चक्क जिवंत आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेस वळसंग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अर्थात बेपत्ता व खून झाला समजून अंत्यसंस्कार केलेली महिला जिवंत निघाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे. पण पुन्हा बेवारस मृतदेह सापडलेली आणि जिचा गळा आवळून खून झाला ती महिला कोण? तिचा ठावठिकाणा आणि तिचा खून कशावरून झाला हे सर्व प्रश्‍न पुन्हा उपस्थित होत आहेत. आता त्याचा छडा लावून गुन्ह्याचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

पतीने माहिती लपविल्याने घोळ

वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रामदास मालचे म्हणाले, कणबस येथील बेपत्ता महिलेचे शिरवळ येथील इसमाबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती तिच्या पतीने लपवून ठेवली होती. अधिक चौकशीअंती त्या महिलेचे शिरवळ येथील एका व्यक्‍तीबरोबर संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आम्ही संबंधित व्यक्‍तीस शिरवळ येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

त्यावेळी त्याने बेपत्ता महिलेशी त्याचे नुकतेच फोनवर बोलणे झाल्याचे कबूल केले. त्यानुसारच संबंधित महिला भंडारकवठे येथे असल्याची माहिती मिळाली. महिलेच्या पतीने जर पूर्ण माहिती दिली असती तर हा प्रसंग टळला असता. पण त्याने दिशाभूल करण्यासाठीच हा प्रकार केल्याचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news