बुद्धिबळातील दुसरा ‘आनंद’!

बुद्धिबळातील दुसरा ‘आनंद’!
Published on
Updated on

डी. गुकेशने टोरँटोतील कँडिडेटस् स्पर्धा जिंकली आणि खर्‍या अर्थाने भारताला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसरा 'आनंद' गवसला. 17 वर्षीय गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर ही स्पर्धा जिंकणारा केवळ दुसराच भारतीय! अर्थात, यापलीकडेही गुकेशला खूप काही साध्य करायचेय आणि ते साध्य होईल, त्याने यंदा वर्षअखेरीस जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच!

डी. गुकेश कँडिडेटस् स्पर्धेसाठी भारतातून टोरँटोकडे निघाला, त्यावेळी त्याला जेतेपदाच्या दावेदारीत कोणीही गणलेले नव्हते. मॅग्नस कार्लसन तर अगदी जाहीरपणे म्हणाला होता, 'गुकेश कँडिडेटस् स्पर्धा जिंकेल, अशी मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्या मते, तो काही सामने जरूर जिंकेल; पण काही सामने अतिशय वाईट पद्धतीने हरेल. तो अगदीच खराब कामगिरी करणार नाही; पण अगदीच अव्वलही खेळणार नाही. अशा बड्या स्पर्धेत जोरदार मुसंडी मारण्यासाठी तो सज्ज आहे, असे मला तरी दिसत नाही!'

कार्लसनची ही सर्व गणिते डी. गुकेशने अक्षरश: धुळीस मिळवली. तसे पाहता, कार्लसन गुकेशबद्दल जे म्हणाला, त्यात वादग्रस्त काहीच नव्हते. कार्लसन त्यावेळी वस्तुस्थिती अशी असू शकते, हे गणित मांडत होता. समोर दोनवेळचा आव्हानवीर इयान नेपोम्नियाची, आपली पाचवी कँडिडेटस् स्पर्धा खेळणारा फॅबिआनो कारूआना आणि तिसर्‍यांदा या स्पर्धेत खेळणारा हिकारू नाकामुरा सर्वस्व पणाला लावणार, हे सुनिश्चित असताना गुकेशला प्रबळ दावेदारात मोजण्याची चूक कोणीच करणे शक्य नव्हते. कार्लसननेदेखील हीच चूक केली. त्याने गुकेशला कमी लेखले आणि टोरँटोत मागील सोमवारी परिस्थिती अशी उद्भवली की, गुकेशने कार्लसनचे शब्द जसेच्या तसे कार्लसनच्याच घशात घातले!

थोडेसे सूक्ष्म निरीक्षण केल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे, जागतिक दर्जावर अव्वल कामगिरी करणारा कोणताही खेळाडू असो, त्याच्यात एखादी ना एखादी स्वत:ची खासियत निश्चितच असते. गुकेशही त्याला अपवाद नाही आणि गुकेशची खासियत म्हणजे, शांत चित्ताने, संयमाने फक्त अन् फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणे! एकाग्रतेची ही साधना फळली नसती तरच नवल होते!

कँडिडेटस् स्पर्धेपूर्वी गुकेश जर्मनीतील फ्री स्टाईल चेस चॅलेंज इव्हेंटमध्ये गेला होता, त्यावेळचा किस्सा मजेदार आहे. गुकेशची त्यावेळी कार्लसनशी भेट झाली. गुकेशने काही वेळ कार्लसनशी औपचारिक गप्पाही मारल्या. गुकेश त्याबद्दल बोलताना म्हणतो, 'मी कार्लसनचा कोणताही सल्ला मागितला नव्हता. आम्ही त्या इव्हेंटबद्दल बोलत होतो आणि त्यावेळी कँडिडेटस् स्पर्धेचा विषय आला. त्यानंतर ही संधी साधत मी त्याला काही लागोपाठ प्रश्न विचारले आणि प्रत्युत्तरात तो म्हणाला होता, मला अशा प्रदीर्घ काळ चालणार्‍या स्पर्धांबाबत काळजी वाटते. कारण, हा कालावधी अतिशय आव्हानात्मक असतो. व्यक्तिश: मी अशा स्पर्धांच्या प्रारंभिक टप्प्यात आपली फारशी ऊर्जा खर्च होणार नाही, याकडे लक्ष देतो. कारण, ऊर्जा असेल तरच निर्णायक टप्प्यात आपला निभाव लागणार. 2013 मध्ये मी हेच केले होते!'

कार्लसनचे हे अनुभवाचे बोल जणू गुकेशच्या काळजावर कोरले गेले होते. त्याने पहिल्या टप्प्यात आपली ऊर्जा फारशी खर्च होणार नाही, याकडे लक्ष दिले आणि याचीच फलनिष्पत्ती म्हणजे निर्णायक टप्प्यात गुकेशचा खेळ अपेक्षेहूनही अधिक बहरत गेला! गुकेशचे वेगळेपण म्हणजे त्याने या कँडिडेटस् स्पर्धेत आततायी धोके घेणे शिताफीने टाळले अन् यामुळेच सातव्या फेरीत अलिरेझा फिरोझाविरुद्ध पराभव पत्करल्यानंतरही, एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुढील फेरीसाठी तो ताज्या दमाने, नव्या रणनीतीवर भर देण्यात यशस्वी ठरला. गुकेश याबद्दल बोलताना म्हणतो, 'माझ्यासाठी सातव्या फेरीनंतरचा विश्रांतीचा तो एक दिवस खूप मोलाचा ठरला. मनोधैर्य उंचावलेले होते. त्यामुळे योग्यवेळी, योग्य ठिकाणी मुसंडी मारेन, हा विश्वास होता. तो सरतेशेवटी सार्थ ठरला!'

एक प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखे की, भारताने क्रीडा क्षेत्रात जी एकापेक्षा एक शिखरे सर केली आहेत, त्यात गुकेशच्या या कँडिडेटस् स्पर्धेतील लक्षवेधी यशाचा आवर्जून समावेश होतो. या वर्षाच्या उत्तरार्धात गुकेश यामुळे विद्यमान जगज्जेता डिंग लिरेनविरुद्ध जगज्जेतेपदाची लढत देणारा सर्वात युवा आव्हानवीर ठरेल. अन्य कोणत्याही खेळात नसेल, असा नियम बुद्धिबळात आहे, तो म्हणजे विद्यमान जगज्जेत्याला पुढील जागतिक स्पर्धेत थेट खेळता येते आणि तिकडे जगज्जेतेपदाचा आव्हानवीर होण्यासाठी मात्र कँडिडेटस् नामक बुद्धिबळ स्पर्धेत कित्येक ग्रँडमास्टर्स अक्षरश: एकमेकांचा कस पाहण्यासाठीच दाखल झालेले असतात!

टोरँटोतील यंदाची कँडिडेटस् स्पर्धाही प्रत्येक ग्रँडमास्टरला अक्षरश: तावूनसुलाखून काढणारी होती. या स्पर्धेतील मागील दोनवेळचा जेता इयान नेपोम्नियाची, द्वितीय मानांकित फॅबिआनो कारूआना व तृतीय मानांकित हिकारू नाकामुरा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून गणले जात होते. अवघ्या बुद्धिबळ विश्वाच्या नजरा या तिघा मास्टर्सवर खिळलेल्या होत्या अन् म्हणूनच अशा प्रतिकूल स्थितीतही डी. गुकेशने मारलेली मुसंडी आणखी वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

एक प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवे की, फक्त गुकेशच नव्हे, तर त्याच्यासारखे अनेक युवा ग्रँडमास्टर्स जागतिकस्तरावर यशाचे दरवाजे ठोठावण्यासाठी सुसज्ज आहेत. ज्या कँडिडेटस् स्पर्धेत गुकेशने यश मिळवले, त्यात एकूण 5 ग्रँडमास्टर्स भारतीय होते, हेदेखील लक्षवेधी. यापैकी गुकेशसह आर. प्रज्ञानंद, विदित गुजराती पुरुष गटातून, तर कोनेरू हंपी, आर. वैशाली महिला गटातून लढले. प्रज्ञानंद व विदितच्या खेळात सातत्याचा अभाव असला, तरी त्यांनी गुणवत्तेची चुणूक देणारे काही संस्मरणीय विजय मिळवले. महिला गटात कोनेरू हंपीने दुसरे, तर वैशालीने चौथे स्थान मिळवत 'हम भी कुछ कम नहीं,' हेच दाखवले.

मुळात, यशाचा हा आलेख चढताच राहावा, यासाठी सत्ताकेंद्राच्या माध्यमातूनही काही ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशात इलाईट स्पर्धांची संख्या वाढणे क्रमप्राप्त आहे. गुकेश कँडिडेटस् स्पर्धेसाठी पात्र ठरला, त्यामागे चेन्नईत अशी एक स्पर्धा घाईघाईने भरवली गेली होती, तेही एक कारण आहे. ती स्पर्धा नसती तर गुकेश कँडिडेटस् खेळू शकला नसता आणि कँडिडेटस् खेळू शकला नसता तर डिंग लिरेनचा पुढील आव्हानवीर बनू शकला नसता.

पाचवेळा विश्वजेतेपदावर गवसणी घालणारा विश्वनाथन आनंद जागतिकस्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्यात यशस्वी ठरला, त्यात त्याने घेतलेल्या अथक परिश्रमासह नीटनेटक्या नियोजनाचाही मोलाचा वाटा होता. भारताला या स्पर्धेत असे अधिकाधिक 'आनंद' मिळायचे असतील, त्यांनी गुकेशप्रमाणे यशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवावा, अशी अपेक्षा असेल तर त्यासाठी देशातील इलाईट स्पर्धांचे प्रमाण निश्चितपणाने वाढायला हवे!

गुकेशच्या वडिलांनी प्रॅक्टिसही सोडली!

डी. गुकेशचे वडील डॉ. रजनीकांत हे व्यवसायाने सर्जन. प्रॅक्टिस अतिशय उत्तम चालणारी; पण गुकेशच्या बुद्धिबळ प्रेमासाठी त्यांनी ही प्रॅक्टिस थांबवण्याचा धोका पत्करला. डॉ. रजनीकांत आपल्या त्या निर्णयाबद्दल बोलताना प्रांजळपणे सांगतात, काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागणार असेल तर त्याचीही अगदी मनापासून तयारी असायला हवी! डी. गुकेशने खर्‍या अर्थाने त्याच्या पालकांचा हा त्याग सार्थ ठरवला आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news