बीटा कॅरोटिन का गरजेचे, कमतरता कोणात जाणवते?

बीटा कॅरोटिन का गरजेचे, कमतरता कोणात जाणवते?
Published on
Updated on

इतर कॅरोटिनाईज्डप्रमाणे बीटा कॅरोटिन हेदेखील एक अँटिऑक्सिडंट आहे. त्याला बीटा कॅरोटिनम, प्रो-व्हिटॅमिन, ट्रान्सबिटा कॅरोटिन असेही म्हणतात. बीटा कॅरोटिन हे फ्री रॅडिकल्सद्वारे शरीराच्या होणार्‍या नुकसानाचे रक्षण करतात. फ्री रॅडिकल्स हे ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेद्वारे शरीराचे नुकसान करतात. काळ जातो तसतशी ही प्रक्रिया अनेक आजारांचे कारण बनते.

बीटा कॅरोटिनमुळे कर्करोग आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजारांची शक्यता कमी होते. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीदेखील ते बरेच उपयुक्त असते. काही संशोधनांनुसार, बीटा कॅरोटिनयुक्त आहारापासून आयर्न आणि झिंक मुबलक प्रमाणात मिळते, असे समोर आले आहे.

बीटा कॅरोटिन हे एक रंगद्रव्य असून ते वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये आढळते. खासकरून रंगीबेरंगी भाज्या व फळांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. याच कारणामुळे फळे आणि भाज्या तजेलदार, पिवळ्या आणि नारंगी छटेमध्ये दिसतात. लाल, नारंगी आणि पिवळी रंगद्रव्ये कॅरोटिनॉईड समूहाचे सदस्य आहेत. बीटा कॅरोटिन हे आपल्या शरीरातील 'अ' जीवनसत्वाची 50 टक्के आवश्यकता पूर्ण करते. फळे, भाज्या आणि कडधान्यामध्ये ते आढळते. बीटा कॅरोटिन हे प्रयोगशाळेतही बनवता येते.

हिरवी, पिवळी, नारंगी रंगाची फळे म्हणजेच द्राक्षे, संत्रे, जर्दाळू आणि गाजर, भोपळा, रताळे यासारख्या भाज्यांमध्ये बीटा कॅरोटिन आढळते. अर्थात याचा अर्थ असा नाही की, हे इतर रंगांच्या भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये आढळत नाही. इतर रंगांच्या भाज्या आणि फळांमध्येही ते आढळते पण कमी प्रमाणात. त्यामध्ये दुसर्‍या फायटो न्युट्रियन्सशी मिसळून त्यांना लाल, गुलाबी किंवा पांढरी आभा मिळते. ब्रोकोली, पालक, फ्लॉवर, हिरवी मिरची, हिरव्या पालेभाज्या यामध्येही ते आढळते. भाज्या आणि फळांचा रंग जेवढा हिरवा असेल तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये बीटा कॅरोटिन आढळते. बीटा कॅरोटिनचे स्रोत हे चरबी आणि कोलेस्टेरॉल फ्री असतात. ताजी फळे आणि भाज्यांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक असते.

डबाबंद खाद्यपदार्थांमध्ये यांचे प्रमाण कमी आढळते. काही बाबतीत शिजवण्याच्या प्रक्रियेत कॅरोटिनाईडची उपलब्धता सुधारते. गाजर आणि पालक हे थोडे वाफवून शिजवले तर यामध्ये असणारे कॅरोटिनाईड्स शरीरात सहजपणे शोषले जाते. अर्थात खूप जास्त शिजविल्याने कॅरोटिनाईड्स नष्ट होतात. कच्च्या गाजरामध्ये ते 100 टक्के असते तर डबाबंद पदार्थांमध्ये ते 73 टक्केच राहते. फळे आणि भाज्या सालासह खावे. कारण सालांमध्येही याचे प्रमाण बरेच असते.

बीटा कॅरोटिन आणि जीवनसत्त्वे – बीटा कॅरोटिन हे शरीराद्वारे 'अ' जीवनसत्वात परिवर्तित होते. 'अ' जीवनसत्त्व हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी, भक्कम रोगप्रतिकारकशक्तीसाठी, आरोग्यपूर्ण त्वचा आणि म्युकस मेम्ब्रेनसाठी (श्लेष्म पटल) आवश्यक आहे. अधिक प्रमाणात 'अ' जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास त्याचा प्रभाव विषारी होऊ शकतो.

मात्र आवश्यकता असते तेवढ्याच प्रमाणात बीटा कॅरोटिनपासून 'अ' जीवनसत्त्व शरीर निर्माण करते. याचाच सरळ अर्थ होतो की बीटा कॅरोटिन हे 'अ' जीवनसत्त्वाचे सुरक्षित स्रोत आहे. बीटा कॅरोटिन उपयुक्त असले तरी याचे अधिक प्रमाणात सेवनदेखील घातक ठरू शकते. विशेषकरून धूम्रपान आणि अधिक प्रमाणात मद्य पिणार्‍या लोकांना ते त्रासदायक ठरते. म्हणूनच ते नैसर्गिक रूपात घ्यावे. सप्लिमेंटच्या रूपात नाही.

बीटा कॅरोटिन टॉक्सिसिटी – अधिक प्रमाणात बीटा कॅरोटिनचे सेवन केल्यास आपण आजारी पडत नाही. मात्र त्वचेचा रंग पिवळा किंवा नारंगी होऊ शकतो. त्याचे सेवन कमी केल्यास पुन्हा त्वचेचा रंग सामान्य होतो. अनेक वेगवेगळ्या अभ्यासातून समोर आले आहे की, बीटा कॅरोटिनचे सप्लिमेंट शरीरासाठी हानीकारक असते. धूम्रपान करणारे किंवा अ‍ॅस्बेस्टसच्या अधिक संपर्कात राहणारे लोक जर बीटा कॅरोटिनचे सप्लिमेंट घेत असतील तर त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता वाढते.

बीटा कॅरोटिन हे मद्याशी प्रक्रिया होऊन लिव्हरचे नुकसान करू शकते. तसेच शरीरात याचे प्रमाण जास्त झाल्यास सांध्यांच्या वेदनेची समस्या निर्माण होऊ शकते. बीटा कॅरोटिनचे अधिक प्रमाण कॅरोटिनोडर्मिया या आजारास कारणीभूत ठरू शकते. यामध्ये त्वचेवर चट्टे पडतात. खासकरून हात आणि तळव्यांच्या त्वचेवर. मात्र ही समस्या अस्थायी असते.

बीटा कॅरोटिनची कमतरता कोणात जाणवते?

– भाज्या आणि फळांचे सेवन कमी करणार्‍या लोकांमध्ये, धूम्रपान आणि मद्याचे अधिक सेवन करणार्‍या लोकांमध्ये तसेच टाईप 2 मधुमेहाने पीडित असणार्‍या लोकांनी कितीही प्रमाणात बीटा कॅरोटिनचे सेवन केले तरी त्यांच्या शरीरात याचे प्रमाण कमीच आढळते.

बीटा कॅरोटिनची आवश्यकता का?

– पेशींचा फ्री रॅडिकल्सच्या हानीकारक प्रभावापासून बचाव करण्यासाठी बीटा कॅरोटिन गरजेेचे असते. बीटा कॅरोटिन हे 'अ' जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. तसेच ते प्रतिकारशक्ती मजबूत बनवते. बीटा कॅरोटिन हे प्रजनन क्रिया योग्यप्रकारे कार्य करण्यासाठी उपयोगी पडते. सनबर्नचा धोका कमी करते. महिलांमध्ये मॅनोपॉजनंतर गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करते. वयाचा प्रभाव कमी करते. तसेच मधुमेहातही उपयोगाचे असते. मोतीबिंदू आणि हृदयरोगाची शक्यता ते कमी करते.

ज्या लोकांना स्क्लेरोडर्मा ही त्वचेची समस्या आहे त्यांच्या शरीरात बीटा कॅरोटिनची पातळी कमी आढळते. कुपोषणाने ग्रस्त असणार्‍या महिलांमध्ये प्रसूतिदरम्यान होणारा मृत्यू किंवा इतर आजार रोखण्यासाठी बीटा कॅरोटिनचा वापर केला जातो. अस्थमा, एडस्, अल्झायमर्स, डिप्रेशन, उच्चरक्तदाब, वंध्यत्व, पार्किन्सन, अथ्रायटिस, स्किझोफ्रेनिया आणि त्वचेसंबंधी रोग म्हणजे पांढरे डाग वगैरे आजारांच्या उपचारांमध्ये बीटा कॅरोटिन उपयोगाचे ठरते.

आतापर्यंत कमीतकमी 600 कॅरोटिनाईड्सबाबत माहिती आहे. ज्यामध्ये 50 प्रोव्हिटॅमिन 'ए 'म्हणून संबोधले जाते. रोज 5 फळे आणि भाज्या खाल्ल्यास 5 ते 6 मिलीग्रॅम बीटा कॅरोटिन मिळते. बीटा कॅरोटिन हे चरबीमध्ये विरघळणारे असते. म्हणूनच ते योग्य प्रमाणात शोषले जावे यासाठी आहारात चरबीचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. प्रौढ व्यक्तींना प्रतिदिन 15 ते 50 मिलीग्रॅम बीटा कॅरोटिनची आवश्यकता असते. आवश्यकता असली तरीही स्वतःहून याचे औषध घेऊ नये.

डॉ. संतोष काळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news