

मुंबई : पुढारी डेस्क : सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात आहे. संपूर्ण डिसेंबर महिना लग्नमुहूर्तांसाठी उत्तम होता. जानेवारीतही लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. त्यामुळे लग्नाच्या प्लॅनिंगसाठी वधू आणि वराकडची मंडळी तयारीला लागली असतील. त्यांच्या डोक्यांतून अनेक भन्नाट कल्पना समोर येतील. विवाह समारंभ पूर्वीही थाटामाटात व्हायचे. परंतु, पारंपरिक चौकट मोडून आता आयुष्यभर स्मरणात राहील अशा पद्धतीने सप्तपदी करण्याच्या 'हटके थीम्स' राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बीच वेडिंग. या संकल्पनेला मोठ्या संख्येने वर आणि वधू पसंती देत आहेत.
फेसाळणार्या लाटांची गाज, मंगलमय वातावरण, डोलणारी नारळी-पोफळीची झाडे आणि मंगलाष्टकं… अशा मन भारावून टाकणार्या वातावरणात आता लग्न सोहळे पार पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे. वर आणि वधूकडची मंडळी तसेच मित्रमंडळी यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा भव्य सोहळा वेडिंग अल्बम आणि व्हीडिओच्या माध्यमातून कायमचा स्मरणात जतन केला जात आहे. जर लग्नघटिका समीप आली असेल आणि लग्न सोहळा कुठे घ्यायचा या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर महाराष्ट्रात बीच वेडिंगसाठी एकापेक्षा एक ठिकाणे उपलब्ध आहेत.
बीच वेडिंगसाठी सार्वजनिक ठिकाणी लग्न सोहळा करायचा असेल तर कमी खर्च येईल परंतु, परवानगीसाठी धावाधाव करावी लागेल. किनारा परिसरात अशी अनेक कमी दरातील रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
बीच वेडींग ही संकल्पना आता भारतातच नाही तर जगभरात गाजत असल्याचे महाराष्ट्राच्या पर्यटन संचनालयाचे सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी सांगितले. कोकण किनारपट्टीला लाभलेले निसर्ग सौंदर्य लक्षात घेऊनच कोकण किनारपट्टी डेस्टीनेशन बीच वेडिंगसाठी सज्ज करत असल्याचे ते म्हणाले.