

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शिष्टाई केली. पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर थोरात यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. आपली नाराजी ही पक्षांतर्गत बाब आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठीच आपण ही भूमिका घेतली असून त्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांच्या काँग्रेसमध्ये झालेल्या उमेदवारीवरून बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर थोरात यांनी गप्प बसून त्यांना साथ दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी असलेले त्यांचे मतभेद उघड झाले आहेत. थोरात यांच्या राजीनाम्याच्या पवित्र्याने काँग्रेसमध्ये फुटीची चर्चा सुरू झाली होती.
या वादावर तोडगा काढण्यासाठी एच. के. पाटील यांनी थोरात यांची मुंबईत वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या नाराजीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचना पाटील यांनी थोरात यांना केली. यावेळी थोरात यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलण्यात येत असून पटोले मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याची तक्रार केली. पटोले यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षातील अनेक नेते दुखावले असून त्याचा फटका बसण्याची भीतीही थोरात यांनी पाटील यांच्याकडे दाखविली.
थोरात यांच्या नाराजीमुळे त्यांना रायपूर येथे होणार्या काँग्रेसच्या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र, एच. के. पाटील यांनी थोरात यांना रायपूर अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊन तेथे प्रदेश काँग्रेसमधील वादाच्या मुद्द्यावर खर्गे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, असे सांगितले. ही सूचना थोरात यांनी मान्य केली. मात्र, त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. आपला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असून मी व्यक्त केलेल्या भावना या पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि चांगले दिवस आणण्यासाठीच आहेत, असे सांगून थोरात यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच पक्ष सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
गैरसमजातून थोरातांची नाराजी : पाटील
एच. के. पाटील यांनी थोरात यांची नाराजी गैरसमज आणि त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे आहे. त्यावर सविस्तर चर्चा केली असून त्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून हे मतभेद मिटवण्याचे मान्य केले आहे. आपण पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कानावर सर्व बाबी घालू. त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते लवकरच दूर होतील, असे सांगितले. बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना राजीनामा मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पाटील म्हणाले. थोरात यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही. ते पक्षाध्यक्षांना भेटून आपले म्हणणे मांडतील. नाना पटोले यांच्याबाबत थोरात यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यावर निश्चित तोडगा काढला जाईल, असा विश्वास एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. तसेच या बैठकीमध्ये सत्यजित तांबे यांच्या मंडळी बाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
माझी नाराजी पक्षहितासाठीच : थोरात
मी पत्र लिहून पक्षाध्यक्षांकडे व्यक्त केलेली नाराजी ही पक्षाच्या हितासाठीच आहे. माझ्या मनात जे होते ते मी पक्षाला सांगितले आहे. काँग्रेस ताकदवान व्हावी आणि पुढच्या काळात अधिक सक्षम व्हावी हीच त्या मागची भूमिका आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. आपली नाराजी किंवा लिहिलेले पत्र ही काँग्रेस अंतर्गत बाब आहे, त्याला मीडियाने जास्त हवा दिली. मी त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहे. काँग्रेसला मजबूत करून राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविणे हाच आपल्या पत्राचा उद्देश आहे. त्यामुळेच मी मनातली गोष्ट बोलून दाखवली, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.