बद्धकोष्ठता आणि फायबर

बद्धकोष्ठता आणि फायबर
Published on
Updated on

बद्धकोष्ठता याची तक्रार हल्‍ली अनेकांच्या बोलण्यात येते. त्यावर औषधे उपलब्ध आहेत; पण फायबरयुक्‍त आहाराच्या सेवनाद्वारे बद्धकोष्ठाचा त्रास कमी करणे शक्य आहे. मग हा नैसर्गिक आणि सहजशक्य उपाय करून बघायला काय हरकत आहे?

अन्‍नपदार्थातून मिळणार्‍या फायबरचे दोन प्रकार असतात. द्रवणीय आणि अद्रवणीय. हे दोन्ही फायबर आरोग्य, पचन आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी आवश्यक असतात. अपचनीय बिया, भाज्यांची आवरणं, फळं आणि धान्यांमध्ये फायबर सापडतं. फायबर हे अपचनीय कार्बोहायड्रेटस्पासून बनतं. त्याचे घटक असतात सेल्युलोज, पेक्टिन, लिगिनन, हेमसिल्युलोज, गम्स, म्युसिलेज आणि ब्रान. द्रवणीय फायबर पाणी खेचून पचनक्रियेदरम्यान जेलमध्ये रूपांतरित होतं.

द्रवणीय फायबर ओटचा कोंडा, बार्ली, नटस्, बिया, चवळी वर्गातली धान्यं, डाळी, मटार आणि काही फळं तसंच भाज्यांमध्ये सापडतं. 'सायलीअम' नावाच्या फायबर सप्लिमेंटमध्येही ते सापडतं. अद्रवणीय फायबर गव्हाचा कोंडा, भाज्या आणि अख्ख्या धान्यांमध्ये सापडतं. या फायबरमुळे घट्टपणा प्राप्‍त होतो आणि ते पोट आणि आतड्यांमधून लवकर बाहेर पडतं.

फायबर हा बद्धकोष्ठता यावरचा रामबाण इलाज आहे. कारण, फायबरचं पचन होत नाही. ते शरीरातल्या टाकाऊ पदार्थांना घट्टपणा मिळवून देतं आणि कोटा साफ ठेवण्यात मदत करतं. अभ्यासाने असं दिसून आलं आहे की भरपूर फायबर असलेला आहार घेतल्याने कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते आणि त्यामुळे हृदरोगांचा धोका टाळण्यास मदत होते. याकामी पेक्टिन हा घटक महत्त्वाचा ठरतो जो जेवणानंतर अन्‍न शोषणाच्या क्रियेचा वेग मंद करतो.

पेक्टिन शरीरातले विषारी घटक तसेच अनावश्यक धातूही काढून टाकतो. हे पेक्टिन सफरचंद, केळी, कोबी, लिंबू वर्गातली फळं, मटार आणि गाजरात तसेच सेल्युलोज या फळं, भाज्या आणि धान्यांच्या बाह्यावरणात असलेल्या अपचनीय कार्बोहायड्रेटमध्ये भरपूर प्रमाणात सापडतं.

पाश्‍चिमात्यांमध्ये आणि भारतीयांत भौगोलिक द‍ृष्टीने मोठा फरक पडतो. पाश्‍चिमात्यांमध्ये सॅलडचा म्हणजे कच्च्या भाज्या, गाजर, टोमॅटो आदींचा आहारात वापर खूप असतो. त्यामुळे शरीरात फायबरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. हेच फायबर जास्तीच्या चरबीला शरीराबाहेर टाकतात. मात्र, आपल्याकडे भाज्या खाण्यास नाक मुरडले जाते. पाश्‍चिमात्य जीवनशैलीत एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चार-पाच वेळा थोडे-थोडे खाल्ले जाते.

आपल्याकडे एकाचवेळी जास्त खाण्यावर भर दिला जातो. पाश्‍चिमात्यांच्या शरीरात मुळातच घातक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते, तर भारतीयांमध्ये जास्त असते. फळे आणि भाज्या तसेच धान्यं व्यवस्थित प्रमाणात खाण्याबाबत जर सतर्क राहिले तर त्यातून मिळणार्‍या फायबरचा उपयोग घातक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी नक्‍की होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news