बटेर पालन व्यवसायातून मिळवा भरघोस उत्पन्न, जाणून घ्या अधिक

बटेर पालन व्यवसायातून मिळवा भरघोस उत्पन्न, जाणून घ्या अधिक
Published on
Updated on

– विनायक सरदेसाई

कुक्कुटपालनाप्रमाणेच आता बटेर पालनाला जगभर मागणी वाढते आहे. गेम बर्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या बटेरमध्ये विविध जाती असून त्यांच्या पालनाच्या व्यवसाय करुन आर्थिक समृद्धी साधता येईल.

पुरातन काळापासून बटेर (क्वेल) हे चविष्ट आणि उत्तम खाण्यासाठी पक्षी आहेत. बटेर पक्षांना प्रथम पाळीव करून वाढविण्याचा प्रकार इ. स. 1595 मध्ये जपानमध्ये आढळून आला. इसवी सन 1870 च्या सुमारास अमेरिकेत हे पक्षी 'गेम बर्ड' म्हणून ठेवले जात. अनेक देशात आणि काही बेटांवर रानटी बटेर आढळतात. सद्य:स्थितीत अनेक उत्तम प्रकारच्या बटेर जाती जगात उपलब्ध आहेत. त्यामध्ये बॉब व्हाईट, कोमनरेन, न्युझीलंड, हरेल क्वीन, जापनीज, मादागास्कर इत्यादींचा समावेश आहे. अतिशय रूचकर मांस असलेल्या बटेर पक्षीपालनाचा व्यवसाय हा कोंबडी आणि बदक पालनानंतर सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जगभर प्रसिद्ध होत आहे. कोंबडीपालन व्यवसायासाठी लागणार्‍या भांडवलापेक्षा कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. युरोप, अमेरिका, जपान, हाँगकाँग, सिंगापूर, फिलीपाईन्स इत्यादी देशामध्ये बटेेर पक्षांचे मांस, अंडी आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांना खूप मागणी आहे.

बटेरच्या एका दिवसाच्या पिल्लूचे वजन 7 ते 8 ग्रॅम असते. म्हणून जरी एक दिवसाचे उत्कृष्ट प्रतीची पिल्ले उत्पादन करणे हा या व्यवसायातील महत्त्वाचा भाग असला तरी एक दिवसाची पिल्ले बाजारात मिळत नाहीत. तीन आठवडे वयाची पिल्ले पक्षी पालनासाठी विकली जातात. त्यामुळे व्यावसायिकाने स्वत:च पिलांचे उत्पादन करणे फायदेशीर ठरते. बटेर पक्षात अंडी उबविण्याचा कालावधी 18 दिवसांचा असतो. शून्य ते 14 दिवसांच्या कालावधीला सेटर कालावधी आणि 15 ते 18 दिवसांच्या कालावधीला हॅचर कालावधी असे म्हणतात.

बटेर पक्षांच्या घराची रचना पिंजरा पद्धत किंवा गोंदी पद्धत अशी असते. बटेर पक्षांची वाढ ही 0 ते 3 आठवडे पिल्लांच्या संगोपनाचा कालावधी, 4 ते 5 आठवडे – वाढीचा कालावधी आणि 6 आठवडे आणि पुढे-अंडी देण्याचा कालावधी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. बटेर मादी ही 6 व्या आठवड्याच्या शेवटी अंडी उत्पादनास सुरुवात करते. आठव्या आठवड्यात अंडी उत्पादन 50 टक्केपर्यंत, 10 व्या आठवड्यात 40 टक्केपर्यंत आणि 15 आठवड्यात अंडी उत्पादनाची सर्वोच्च पातळी गाठली जाते. मांस उत्पादनासाठी बटेर पक्षी 6 आठवडे वाढवून विकायचे असतात. त्यावेळेस त्यांचे वजन साधारणत 160 ग्रॅम असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news