

जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फोर सीटर इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. सकृतदर्शनी ही कार एखाद्या गोल्फ कारसारखी दिसते.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाचे प्रदूषण या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ही वीज आणि सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार विकसित केली आहे. ज्यावेळी सूर्यप्रकाश नसतो त्यावेळी ही कार विजेच्या सहाय्याने धावू शकते.
अलवरमधील लक्ष्मीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या एका टीमने 75 हजार रुपये खर्च करून ही कार बनवली आहे. या कारचे वैशिष्ट म्हणजे ती विजेच्या सहाय्याने चार्ज होण्याबरोबरच सौरऊर्जेवरही चालू शकते. ती एकदा फुल्ल चार्ज झाल्यावर 100 ते 110 किलोमीटरचे अंतर कापू शकते.
प्रोजेक्टचे टीम लीडर अंकित कुमार यांनी सांगितले की सात विद्यार्थ्यांनी मिळून ही कार बनवली आहे. त्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. या विद्यार्थ्यांचे गाईड सोनू मनधेरना यांनी सांगितले की सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती अफाट वाढलेल्या आहेत.
एक वेळ अशी येईल की पृथ्वीवरील जीवाश्म इंधन संपून जाईल. त्यामुळे भविष्यात लोक सौरऊर्जा आणि विजेच्या सहाय्याने चालणारी वाहनेच वापरू लागतील. सध्या अशा इलेक्ट्रिक वाहनांची अनेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू आहे. अशी वाहने पर्यावरणपूरकही असतात हे विशेष.