

पुढारी ऑनलाईन : कर्णधार बदलून नव्या आव्हानाला सामोरे जात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्युप्लेसिस याच्यावर असणार आहे. संघाने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केले होते.
ए. बी. डिव्हीलियर्स निवृत्त झाल्यामुळे आणि देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल दुसर्या संघात गेल्यामुळे झालेले नुकसान भरून काढताना संघाने काही चांगल्या खेळाडूंची जाणीवपूर्वक खरेदी केली. विराटला आपल्या हाताखाली मॅनेज करू शकेल असा कर्णधार त्यांना हवा होता, त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या फाफ ड्युप्लेसिसला त्यांनी पसंती दिली.
विराटने फाफच्या निवडीबद्दल सोशल मीडियावर केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, आम्हाला अनुभवी कर्णधार हवा होता. फाफने दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीसह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व केले असल्यामुळे क्रिकेट जगतात त्याच्याविषयी आदर आहे. त्याचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. तो संघाला नक्कीच पुढे घेऊन जाईल.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड, श्रीलंकन स्पीनर वानिंदू हसरंगा, आणि विंडीजचा शेरफेन रूदरफोर्ड यांच्या समावेशामुळे संघाला बळकटी आली आहे. आरसीबीचा संघ कागदावर नेहमीच मजबूत असतो. तरीही 14 वर्षांत त्याच्या नावापुढे एकही टायटल लागलेले नाही. 2009, 2011 आणि 2016 यावर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विराट कोहलीवर आता कर्णधारपदाचे ओझे नसल्याने तो मुक्तपणे खेळू शकतो. याचा फायदा आरसीबी संघाला होईल.
ताकद : वेगवान गोलंदाजी
आरसीबीच्या नवीन संघावर नजर टाकली तर त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजाचा चांगला ताफा आहे. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये कर्णधार फाफ ड्युप्लेसिस याच्याकडे अनेक पर्याय आहेत. हेजलवूड आणि मोहम्मद सिराज हे नव्या चेंडूने गोलंदाजी करतील, तर गेल्या वेळेचा पर्पल कॅप विजेता हर्षल पटेल आपल्या घातक स्लो कटरने फलंदाजांना त्रास देऊ शकतो. जेसन बेहरनहॉर्फ, सिद्धार्थ कौल आणि इंग्लंडचा डेव्हिड विली हेसुद्धा सामना फिरवू शकतात.
कमजोरी : डिव्हीलियर्सची उणीव भासू शकते
'मिस्टर 360 डिग्री' नावाने ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हीलियर्स निवृत्त झाल्याने मधल्या फळीत त्याची उणीव संघाला जाणवू शकते. जर विराट यावेळीही फिका पडला तर ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि फाफ ड्युप्लेसिसवर दबाव वाढेल. संघात फिरकी गोलंदाजीही कमजोर आहे.