

भारत-पाक युद्धावरील 1997 मध्ये आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा तुफान गाजला होता. राजस्थानच्या थर वाळवंटातील लोंगेवाला येथे झालेल्या या घनघोर लढाईत भारताच्या छोट्या तुकडीने पाकिस्तानी रणगाड्यांच्या बटालियनला धूळ चारली होती. सिनेमातील ही लढाई प्रत्यक्षात लढलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाईक भैरोसिंग राठोड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी…
'बॉर्डर' सिनेमातील कुराण आणण्याचा प्रसंग आठवतोय का? सीमेवर सुरू असलेल्या धुमश्चक्रीमध्ये तेथील घरांमधून लोकांना वाचविण्याचं काम सुरू असतं. भारताचा सैनिक असलेला सुनील शेट्टी सीमेवरील एका जळत्या घरातून मुस्लिम कुटुंबाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यावेळी आपलं कुराण घरात राहिल्याचं त्या कुटुंबाच्या लक्षात येतं. सुनील शेट्टी जळत्या घरात उडी मारतो. फडताळावरचं कुराण बाहेर आणतो. त्याला नमस्कार करून त्या कुटुंबाकडे सोपवतो. हे द़ृश्य सिनेमातलं असलं, तरी 1971 च्या भारत-पाक युद्धावेळी प्रत्यक्ष घडलं होतं. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) नाईक भैरोसिंग राठोड यांची भूमिका सुनील शेट्टीनं या सिनेमात साकारलीय. वयाच्या 81 व्या वर्षापर्यंत तंदुरुस्त असलेल्या आणि आसपासच्या तरुणांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन देणार्या भैरोसिंग राठोड यांच्या निधनाची बातमीनं देशभर दुःख व्यक्त केलं गेलं.
युद्धकथा हा कोणत्याही सर्वसाधारण माणसाला भारावून टाकणारा साहित्य प्रकार. युद्धातील शौर्याच्या, कारुण्याच्या आणि पराक्रमाच्या कहाण्या आजवर जगभरातील सर्वच माणसांच्या अंगावर रोमांच उभं करतात. 1971 चे भारत-पाकिस्तानमधील युद्ध तर अनेक अर्थानं महत्त्वाचं होतं. या लढाईत बांगला देश पाकिस्तानपासून मुक्त झाला आणि भारतानं पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. या लढाईतला आणखी एक महत्त्वाचा अध्याय होता, तो लोंगेवाला चौकीवर झालेल्या लढाईचा.
युद्ध हे अशा अनेक लढायांच्या कहाण्यांचं महाकथानक असतं. ते घडल्यावर 'युद्धस्य कथा रम्यः' असं सांगत अनेक कहाण्या सांगितल्या जातात; पण प्रत्यक्षात ते घडतं ते जीवघेणं आणि पिढ्यान्पिढ्या सलणारं असतं. लोंगेवालाच्या या लढाईचं वर्णनही असंच आहे. या रोमहर्षक कहाणीचा आधार घेत 1997 मध्ये दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी 'बॉर्डर' या सिनेमाची निर्मिती केली. या गोष्टीचे खरे हीरो होते ते नाईक भैरोसिंग राठोड. राठोड हे जैसलमेरच्या थर वाळवंटातील लोंगेवाला पोस्टवर तैनात होते. वाळवंटातील अवघड जागी ते 'बीएसएफ'च्या सहा ते सात जवानांच्या छोट्या तुकडीचे नेतृत्व करत होते. या तुकडीच्या मदतीसाठी लष्कराच्या 23 पंजाब रेजिमेंटच्या 120 जवानांची कंपनी होती; पण या कंपनीची मदत मिळेपर्यंत राठोड यांनी आपल्या मोजक्या शिलेदारांसोबत पाकिस्तानची अख्खी टँक रेजिमेंट ज्या पद्धतीने रोखली, त्यामुळे युद्धाच्या इतिहासात राठोड अजरामर झाले. ही गोष्ट आहे 5 डिसेंबर 1971 च्या रात्रीची. वाळवंटातील सीमेवर नाईक भैरोसिंग राठोड त्यांच्या लोंगेवाला येथील पोस्टवर ड्युटी करत होते. तोपर्यंत खबर पोहोचते की, पाकिस्तानमधून हालचाल होतेय. तिकडलं सैन्य इकडे घुसण्याच्या तयारीत आहे. या बातमीसोबतच 23 पंजाब रेजिमेंट त्यांच्या ताब्यात असलेल्या गंगानगर पोस्टवर सतर्क झाली होती.
भैरोसिंग या लढाईबद्दल सांगायचे ते त्यांच्या शब्दात असं होतं, आम्ही तर सीमेवर वावरणारी माणसं होतो. त्यामुळे सीमेवरील प्रत्येक कानाकोपर्याची आम्हाला चोख माहिती होती. आम्ही 23 पंजाब रेजिमेंटसोबत सीमेवर रेकीही केली होती. दोन दिवस रेकी झाल्यावर तिसर्या दिवशी मी पोस्टवर परत आलो. पेट्रोलिंग पार्टी फक्त पुढे होती. या पेट्रोलिंग पार्टीचा कंमांडर होता, कॅप्टन धर्मवीर. ('बॉर्डर' सिनेमात धर्मवीर यांची भूमिका अक्षय खन्ना यांनी बजावली होती.) रात्री साडेबारा-एकच्या सुमारास आम्हाला वायरलेसवरून मेसेज मिळाला की, पाकिस्तानच्या सैन्याने सीमा ओलांडली आहे. मोठा आवाज येतो आहे. त्यांची रणगाड्यांची रेजिमेंट भारताच्या दिशेने येत आहे. मी निरोप मिळताच, खुणेच्या शिट्ट्या वाजविल्या आणि सारी पोस्ट सतर्क झाली. पहाटे चार वाजता पाकिस्तानचे सैन्य टप्प्यात आले होते. रणगाडे होते, गाड्या होत्या आणि सैन्यही खूप होते.
पाकिस्तानी सैन्याचा आकार पाहता आम्ही त्यांच्यापुढे कमकुवत होतो. आम्ही संख्येनेही कमी होतो आणि शस्त्रेही पुरेशी नव्हती. आम्ही मदत पाठविण्यासाठी निरोप पाठविला. तिकडून उलटा निरोप मिळाला की, सूर्योदय होईपर्यंत मदत करणे शक्य नाही; अन्यथा आपलंच मोठं नुकसान होईल. त्यामुळे आता आहे त्या ताकदीनिशी पोस्ट लढवणं एवढंच आमच्या हातात होतं.
आम्ही किती आहोत, याचा अंदाज पाकिस्तानला येणार नाही, अशा पद्धतीने पोस्ट लढवली. तांबडं फुटू लागलं तसं पाकिस्तानच्या सैन्यानंही 'अॅडव्हान्स मुव्हमेंट' म्हणजे पुढे चाल करायला सुरुवात केली. आतापर्यंत आम्ही लपूनछपून भिडत होतो. जेव्हा ते आत घुसले तेव्हा आम्ही आमच्याकडून हल्ला वाढवला. माझ्याकडे एलएमजी गन होती. तिच्या जीवावर आम्ही भिडत होतो. समोर पेरलेेल्या सुरुंगांमुळे त्यांचे रणगाडे फार पुढे आले नाहीत; पण त्यांच्याकडून होणारी फायरिंग तुफान होती. तिचा मारा एवढा होता की, आमच्या पोस्टची एक खोली कोसळली; पण तनोट देवीवर आमची श्रद्धा होती. तिच्या आशीर्वादामुळे आम्ही न घाबरता लढत राहिलो. आमच्यातील काही जणांना वीरगती प्राप्त झाली. उरलेल्या चार-पाच सैनिकांसह आम्ही ती पोस्ट तब्बल चार तास लढवली. तेवढ्यात पाठून मदत आली आणि मग आम्ही पाकला चारी मुंड्या चीत केलं.
भैरोसिंग वारंवार ज्या तनोट देवीच्या कृपेचा उल्लेख करत असत, ती तनोट देवी ही सीमा सुरक्षा दलाचं सीमेवरील श्रद्धास्थान आहे. भारत-पाक सीमेपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर जैसलमेर इथं या देवीचं ठाणं आहे. दोन्ही भारत-पाक युद्धांची ही देवी साक्षीदार आहे. युद्धात एवढे बॉम्ब पडले, तरी देवीचं ठाणं सुरक्षित राहिलं. म्हणूनच या देवीला 'बमवाली देवी' असंही ओळखलं जातं. सीमा सुरक्षा दलाचे जवानच या मंदिराची देखभाल करतात. देवीच्या मंदिराच्या आसपास बॉम्ब पडले; पण ते फुटत नाहीत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे असे न फुटलेले 450 बॉम्ब या मंदिरात प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. भारत-पाक युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांचं एक स्मारकही या मंदिर परिसरात आहे.
या मंदिराबद्दलचा आणखी एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. पाकिस्तानचे बि—गेडियर शाहनवाज खान यांना या मंदिराबद्दल कळलं. त्यामुळे त्यांच्या मनात या मंदिराला भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी त्यासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली. अडीच वर्षांनंतर त्यांना ही परवानगी मिळाली. ते दर्शनासाठी आले आणि त्यांनी देवीला चांदीची छत्री भेट दिली. ती आजही देवीच्या मस्तकावर आहे.
या देवीच्या श्रद्धेवर अतुलनीय पराक्रम गाजवत लोंगेवालाची लढाई जिंकणार्या भैरोसिंग राठोड यांचं 19 डिसेंबर रोजी जोधपूर येथील एम्स रुग्णालयात निधन झालंय. 'बॉर्डर' सिनेमात सुनील शेट्टीला वीरमरण आल्याचं दाखवण्यात आलंय; पण प्रत्यक्षात भैरोसिंग या लढाईत सुरक्षित राहिले. त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल 1972 मध्ये सेना मेडल देऊन गौरविण्यात आलं.
सिनेमात त्यांचं युद्धाआधी लग्न झाल्याचं दाखवलंय. लग्नानंतर लगेचच सुनील शेट्टी युद्धासाठी निघतो आणि त्यावेळी 'घर कब आओंगे' हे सुपरहिट गाणं वाजतं. प्रत्यक्षात मात्र भैरोसिंग यांचं लग्न युद्धानंतर झालं. ही सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे सगळं ठीक आहे; पण सिनेमात मी मेलेलं दाखवायला नको होतं, असं ते म्हणायचे. एकदा सुनील शेट्टीला भेटून हे सांगायचं आहे, असंही त्यांच्या मनात होतं; पण ते शेवटपर्यंत राहूनच गेलं.
आजारपणाचे शेवटचे काही महिने वगळता ते आपल्या सोलंकिया गावामध्ये अनेक उपक्रमांमध्ये भाग घेत होते. रोज सकाळी पाच वाजता उठणं, योगासनं-व्यायाम करणं आणि नंतर गावातल्या मैदानावर जाऊन तरुणांना सैन्यात जाण्यासाठी मदत करणं, असा त्यांचा दिनक्रम होता. 1971 च्या लढाईबद्दल त्यांना आजवर अनेक लोकांनी विचारलंय आणि त्यांनीही तेवढ्याच उत्साहानं ते सांगितलंय. शेवटी युद्ध संपून जातं आणि शौर्यकथा मात्र पिढ्यान्पिढ्या टिकतात त्या अशा. भैरोसिंग यांची ही कहाणी अशीच वर्षानुवर्षे सांगितली जाईल.