

कोल्हापूर ; सागर यादव : 'टाळ वाजे – मृदंग वाजे, वाजे हरीची विणा, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…', 'काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवल पांडुरंग जय जय हरी विठ्ठल…', अशा भक्तिभावाने साजर्या होणार्या आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. कोल्हापूरलाही मोठी वारकरी परंपरा आहे. वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठल मंदिरांनी ही भूमी पावन बनली आहे.
पायात जोडे असणारी 'प्रवासी' विठ्ठल मूर्ती
मिरजकर तिकटी परिसरात विविध देवतांचा 12 व्या शतकातील हेमाडपंथी मंदिर समूह आहे. मंदिर समूहात विठ्ठल, श्रीराम, महादेव, दत्त अशा देवतांची मंदिरे आहेत. यातील विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात विठ्ठल व त्यांच्या दोन पत्नी रुक्मिणी व राई यांच्या मूर्ती आहेत. या तिन्ही मूर्तीच्या पायात वहाणा आहेत. यामुळे या विठ्ठलाला 'प्रवासी' विठ्ठल, असेही म्हणतात. प्रतिपंढरपूर-नंदवाळ ते कोल्हापुरातील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर आणि येथून पुढे पंढरपूरपर्यंत हा विठ्ठल प्रवास करत असल्याची आख्यायिका आहे. यामुळे या विठ्ठलाला प्रवासी विठ्ठल नाव पडले आहे.
भक्त पुंडलिकाचे शिल्प आणि शिलालेख
मंदिर परिसरातच पंढरीच्या विठुरायाची वारी करून थकलेल्या आई-वडिलांचे पाय दाबून त्यांची सेवा करणार्या भक्त पुंडलिकाचे शिल्प लक्षवेधी आहे. याशिवाय मंदिराच्या दारातच संस्कृत भाषेतील शिलालेख आहेत. कालौघात आईल पेंटच्या वापरामुळे शिलालेखावरील अक्षरे मुजून गेली आहेत. केवळ दोनच ओळी पुसटशा दिसतात. असाच शिलालेख पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही पाहायला मिळतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मूर्ती व मंदिर शास्त्राचे अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी सांगितले.
प्रतिपंढरपूर नंदवाळ
कोल्हापूर शहरापासून 11 कि.मी. अंतरावर असणार्या नंदवाळ (ता. करवीर) गावची ओळख 'प्रतिपंढरपूर' अशी आहे. नंदवाळ गावचा प्राचीन उल्लेख 'नंदग्राम' असा आहे. गावातील हेमाडपंथी दगडी मंदिरात विठ्ठल रोज रात्री वस्तीस असतो, अशी आख्यायिका आहे. करवीर माहात्म्य ग्रंथामधील सतराव्या अध्यायात 32 युगे विठ्ठल, असे येथील विठ्ठलाला म्हटले आहे. तर पंढरीचा पांडुरंग विठ्ठलाला नामदेवांनी त्यांच्या आरतीमध्ये 28 युगे म्हटले आहे. त्यामुळे चार युगे आधीपासूनच विठ्ठलाचे नंदवाळमध्ये वास्तव्य होते, अशी आख्यायिका आहे. यामुळेच पंढरपूरप्रमाणेच नंदवाळ येथेही दिंडी-रिंगण सोहळा असे सर्व उत्सव साजरे होतात.
शतकोत्तर भाविक विठोबा
गुरुवार पेठ उत्तरेश्वर परिसरातील भाविक विठोबा मंदिर हे कोल्हापूर शहरातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. लोकराजा राजर्षी शाहूकाळात या परिसरात वड-पिंपळाच्या झाडात विठोबाचे लहानसे मंदिर होते. पंचगंगा नदीत स्नान केल्यानंतर लोक या झाडाखाली येऊन बसायचे. काही लोक येथे भांगही ओढायचे. यामुळे या विठ्ठलाचे नामकरण 'भांग्या विठोबा' असे झाले होते. कालांतराने याचे नामकरण 'भाविक विठोबा' असे झाले. याच विठ्ठल मंदिरावरून या परिसरात इसवी सन 1914 साली भाविक विठोबा तालीम मंडळाची स्थापना झाली. तालमीची ओळख असणारे श्री भाविक विठ्ठल समाज मंदिर अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. मराठाकालीन बांधकाम शैलीचे हे मंदिर 10 लाकडी खांब व तीन फुटांच्या दगड-मातीच्या भिंतींमुळे आजही भक्कम स्थितीत आहे.