प्रचाराची रणधुमाळी : प्रचारासाठी भाजप, काँग्रेसने बूक केले 9 जेट, 6 हेलिकॉप्टर्स

प्रचाराची रणधुमाळी : प्रचारासाठी भाजप, काँग्रेसने बूक केले 9 जेट, 6 हेलिकॉप्टर्स
Published on
Updated on

अहमदाबाद वृत्तसंस्था :  हिमाचल प्रदेशची निवडणूक आटोपल्यानंतर गुजरात विधानसभेची रणधुमाळी आता रंगणार असून, त्यासाठी मैदानातील तिन्ही प्रमुख पक्ष सरसावले आहेत. राज्यात प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी जास्तीत जास्त सभा सर्वच प्रमुख नेते घेणार असून, त्यासाठी तब्ब्ल 9 जेट विमाने आणि 6 हेलिकॉप्टर्स भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्षाने बूक केली आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच भाजप, काँग्रेस आणि 'आप' या तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला होताच. त्यातच आधी हिमाचल प्रदेशात निवडणूक होत असल्याने बड्या नेत्यांना तिकडेही ये-जा करावी लागत होती. आता शनिवारी हिमाचलचे मतदान पार पडल्यानंतर प्रचाराचा खरा धुरळा गुजरातमध्ये पाहता येणार आहे.

राज्यात जास्तीत जास्त सभा, रोड शो, बैठका घेऊन राज्य पिंजून काढण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. त्यासाठी वेगवान दळणवळण हवे असल्याने हवाई सुविधेवर हे पक्ष खर्च करत आहेत. अहमदाबाद, दिल्ली आणि मुंबई येथील खासगी विमान कंपन्यांकडे भाजप आणि काँग्रेसने जेट विमाने, टर्बोक्रॉप इंजिन असलेली विमाने, तसेच हेलिकॉप्टर तब्बल 25 दिवसांसाठी बूक करून ठेवले आहेत. एकूण 9 विमाने व 6 हेलिकॉप्टरचे बुकिंग निश्चित झाले असून, ऐनवेळी त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

अबब..! काय हे भाडे?

ही जेट व हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून, त्यांचा खर्चही प्रचंड आहे. प्राप्त माहितीनुसार, जेट विमानाचे दरतासाचे भाडे 2 ते 4 लाख रुपये आहे, तर टर्बोक्रॉप प्रकारातील विमानांचे भाडे प्रतितास 1 लाख 40 हजार हजार रुपये आहे. हेलिकॉप्टरचे भाडे तीन ते पावणेचार लाख रुपये प्रतितास आहे. याशिवाय एका फ्लाईटसाठी विमानतळ शुल्क, लाऊंज शुल्क यापोटी किमान 30 हजार रुपये खर्च येणार आहे. याउपरही राजकीय पक्षांना आणखी विमाने व हेलिकॉप्टर लागल्यास अतिरिक्त शुल्कासह ती उपलब्ध करून घ्यावी लागणार आहेत. एका माहीतगार सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या हवाई फेर्‍यांसाठी एकूण 100 कोटी रुपयांच्या आसपास खर्च येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news