

कोल्हापूर; अनिल देशमुख : जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाच्या साईट्सच्या (स्थळे) हद्दी निश्चित केल्या जाणार आहेत. या स्थळांची मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हद्दी निश्चित झाल्यानंतर या परिसरातील बांधकामांबाबत असलेली संभ—मावस्था दूर होणार आहे.
जिल्ह्यात पन्हाळा किल्ला, पन्हाळा तालुक्यातील पोहाळे येथील लेणी, शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर आणि कोल्हापूर शहरातील ब—ह्मपुरी टेकडी ही चार ठिकाणे केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. पन्हाळा किल्ला आणि खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर वगळता पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या ठिकाणांचा म्हणावा तसा विकासही झालेला नाही.
पुरातत्त्व वास्तूजवळ किती अंतरावर बांधकाम करता येत नाही, याबाबत केंद्र सरकारचा कायदा आहे. कोल्हापुरातील पंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाबाबत असाच अंतराचा प्रश्न निर्माण झाला होता. खिद्रापूरच्या मंदिरामुळेही गावातील नागरिकांना अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील या वास्तूंच्या हद्दीच निश्चित नसल्याने अंतराचा प्रश्न कायम आहे.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाने सर्वच पुरातत्त्व वास्तू, ठिकाणांच्या हद्दी निश्चित करण्यासाठी 'स्मारक पोर्टल' सुरू केले आहे. त्यानुसार पुरातत्त्व विभागाच्या मुंबई येथील कार्यालयाने जिल्हाधिकार्यांना याबाबत पत्र पाठविले होते. त्यानुसार संबंधित तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महसूल विभाग आणि पुरातत्त्व विभाग संयुक्तपणे या जागेची मोजणी करून अधिकृत हद्द निश्चित करणार आहे. ही हद्द निश्चित झाल्यानंतर या ठिकाणांशेजारी होणार्या नव्या बांधकामांबाबतची समस्या दूर होण्यास मदत होईल.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पाठविलेल्या पत्रानुसार संबंधित तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चार ठिकाणांची मोजणी करून हद्द निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच ती पूर्ण होईल.
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी