सिंहायन आत्मचरित्र : पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा

Dr.Yogesh Pratapsinh Jadhav
Dr.Yogesh Pratapsinh Jadhav
Published on
Updated on

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध (प्रकरण ४५  )करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

मुलगा असा निघावा, की त्याच्या कर्तृत्वाचे झेंडे स्वर्ग, भूमी आणि पाताळ असे सर्वत्र फडकावेत. थोडक्यात म्हणजे अफाट आणि अचाट कर्तृत्व करणारा मुलगा पोटाला यावा. योगेशकडे पाहताना मला या काव्यपंक्‍तीची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. केवळ माझा मुलगा म्हणून नव्हे, तर नव्या युगाचा आणि नव्या मनूचा एक नवमतवादी तरुण म्हणून मी जेव्हा योगेशकडे पाहतो, तेव्हा मला त्याचा अभिमान वाटतो.

'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,' अशी जरी उक्‍ती असली, तरी मुलाचे पाय बहुतांशी पित्याच्या पावलांवरच पडतात, असं माझं मत आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं.तर मला शिकारीचा छंद. बंदूक चालवण्यात मी तरबेज. मी निशाणा लावला अन् शिकार हातून गेली, असं कधीच झालं ना. माझ्यातला नेमबाजीचा हा गुण योगेशनंही बरोबर उचललेला आहे.'My father didn't tell me how to live; he lived and let me watch him do it.' 'आयुष्य कसं जगायचं हे माझ्या वडिलांनी मला स्वतः कधीच शिकवलं नाही. बस! ते त्यांचं आयुष्य जगत गेले आणि मी त्यांचं निरीक्षण करून शिकत गेलो!'

Dr.Yogesh Pratapsinh Jadhav
Dr.Yogesh Pratapsinh Jadhav

सुप्रसिद्ध अमेरिकन साहित्यिक 'क्‍लॅरन्स बडिंग्टन केलँड' यांचं हे विधान योगेशला तंतोतंत लागू पडतं, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. योगेश सेंट झेव्हियर्समध्ये शिकत असतानाची गोष्ट. कोल्हापुरातील एक निष्णात नेमबाज जयसिंगराव कुसाळे यांनी दुधाळी पॅव्हेलियन इथं 'रायफल शूटिंग रेंज' सुरू केलं होतं. तिथं माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड हे रायफल शूटिंग प्रॅक्टिससाठी जात असत. योगेशला नेमबाजीची जन्मजात हौस होती. त्यामुळे एके दिवशी योगेशही या शूटिंग रेंजवर गेला होता. त्यानं अचूक नेमबाजी करीत 'बुल्स आय'चा वेध घेतला. ते पाहून उदयसिंगराव चकित झाले. त्यांनी लगेच मला फोन लावला. 'योगेशला नेमबाजीत चांगली गती आहे. त्याला चांगलं ट्रेनिंग दिलं, तर तो एक उत्तम नेमबाज म्हणून नावारूपाला येईल,' असं त्यांनी मला मोठ्या कौतुकानं सांगितलं.
उदयसिंगरावांनी मोठ्या आपुलकीनं आपला बॅज योगेशला दिला. ते स्वतः उत्कृष्ट नेमबाज होते. त्यामुळे त्यांनी योगेशमधील स्पार्क अचूक ओळखला. मलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि योगेशला नेमबाजीचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग द्यायचा मी निर्णय घेतला. जयसिंगराव कुसाळे हे आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षकही. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनेक पदकं पटकावलेली. मी योगेशला त्यांच्याकडेच ट्रेनिंगसाठी पाठवलं. त्यामुळे अल्पावधीतच योगेश नेमबाजीत चांगलाच तरबेज झाला.

त्यांनी अवघ्या महिनाभरातच त्याला तयार केलं होतं, हे विशेष. त्यानंतर लगेचच अहमदाबाद येथे झालेल्या देश पातळीवरच्या नेमबाजी स्पर्धेत योगेशनं भाग घेतला. आम्ही गाडी काढली आणि मी, योगेश आणि जयसिंगराव कुसाळे अहमदाबादला गेलो. तेव्हा आमचे पाहुणे बी. आर. पाटील हे अहमदाबादचे डीएसपी होते. त्यांनी आमची सोय तिथल्या गेस्ट हाऊसला केली. मग मी आणि कुसाळे योगेशची फायनल मॅच पाहायला गेलो आणि आम्ही थक्‍क झालो! अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय जी. व्ही. मावळंकर नेमबाजी स्पर्धेत, मिलिटरी रायफल रेंजवर योगेशनं, 'एअर रायफल पीप साईट'मध्ये नवा विक्रम नोंदवून प्रतिष्ठेचं सुवर्णपदक पटकावलं! वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पहिल्याच स्पर्धेत योगेशनं मिळवलेलं यश हे केवळ अलौकिक असंच होतं. माझा आणि जाधव परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला. 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा' या उक्‍तीचा मला तिथेच पहिल्यांदा प्रत्यय आला. योगेशनं त्या उक्‍तीप्रमाणंच आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं.

'यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्‍तः न विशिष्यते॥'

'मनानं इंद्रियांचं नियमन करून जो आसक्‍त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो, त्याची योग्यता विशेष होय,' असं गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि योगेशकडे तर हे गुण उपजतच आले होते. सध्या आपल्या हातात असलेलं कर्म म्हणजे नेमबाजी आणि त्यामध्ये अटकेपार झेंडा रोवणं हेच आपलं ध्येय आहे, हे त्याला चांगलं ठाऊक होतं. म्हणूनच ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्‍त 'माशाचा' डोळा दिसत होता, त्याप्रमाणे योगेशलाही फक्‍त त्याचं 'टार्गेट' दिसलं होतं आणि त्यानं झेंडा रोवला! कारण -हे सुवर्णपदक जिंकत असताना योगेशनं नवा विक्रम प्रस्थापित केला होता, हे विशेष होय. दिल्‍ली येथील राष्ट्रीय रायफल संघटनेच्या मान्यतेनं, अहमदाबाद रायफल संघटनेतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेस 10 ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला होता. आपल्या कौशल्याचं पहिल्यांदाच प्रदर्शन करणार्‍या योगेशनं, एअर रायफल पीप साईट सब ज्युनियर गटात 400 पैकी 326 गुणांची कमाई केली होती. हा नवा राष्ट्रीय विक्रम होता. कारण त्याच्या आदल्याच वर्षी दिल्‍लीत 34 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेतही त्याच गटात नोंदवला गेलेला विक्रम होता 309 गुणांचा. तो विक्रम योगेशनं मोडला होता! नेमबाजीसाठीच्या निर्धारित 90 मिनिटांऐवजी केवळ 45 मिनिटांत नेमबाजी पूर्ण करत त्यानं नवा विक्रम नोंदवून सुखद आश्‍चर्याचा धक्‍का दिला. आपल्या या नेत्रदीपक कामगिरीद्वारे योगेशनं तेथील सर्व स्पर्धक, नेमबाज, जाणकार आणि तज्ज्ञाचं लक्ष वेधून घेतलं.
या स्पर्धेतील या गटात देशातील 150 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये चौहान नावाच्या स्पर्धकानं 308 गुणांसह द्वितीय, तर पश्‍चिम बंगालच्या जॉर्ज कोशी यानं 255 गुण मिळवून तो तृतीय क्रमांकावर राहिला. अहमदाबाद इथे प्रथमच पार पडलेल्या राष्ट्रीय जी. व्ही. मावळंकर नेमबाजी स्पर्धेत, विविध राज्यांतील आणि विविध गटांतील एकूण 630 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

केंद्रीय राखीव पोलिस दल, लष्कर, नौदल, सीमा सुरक्षा दल, इंडो तिबेट सीमा पोलिस; तसेच पंजाब, बिहार, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय छात्र सेना यातील स्पर्धकांनीही या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. योगेशनं रेकॉर्ड मोडून गोल्डमेडल मिळवलं, याचा मला आश्‍चर्याचा जबरदस्त धक्‍काच बसला होता. परंतु, त्यानं मलाच नाही, तर सर्वांनाच धक्‍का दिला होता. त्यात कधी 326 गुण पटकावले, ते भल्याभल्यांच्या लक्षात आलं नाही आणि म्हणूनच 'टाइम्स ऑफ इंडिया' या राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकानं या स्पर्धेचं वृत्तांकन करताना, 'योगेश स्टील्स द शो' अशा मथळ्याखाली बातमी देऊन योगेशचा जणू गौरवच केला होता. तसेच अहमदाबादेतील इंग्रजी आणि गुजराती वर्तमानपत्रांनीदेखील योगेशच्या फोटोसहित बातमी छापली होती.

त्या दिवशी ही बातमी दूरदर्शनवरही झळकली आणि योगेश एका दिवसात लाईम लाईटमध्ये आला. योगेशकडे 'फायनर बू' या जर्मन कंपनीची एअर रायफल होती. तोवर केवळ एक महिना रोज सकाळ-संध्याकाळी कठोर सराव करून योगेशनं राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश प्राप्‍त केलं होतं. योगेशचे प्रशिक्षक जयसिंगराव कुसाळे यांची छाती आनंदानं फुगून येणं रास्तच होतं. त्याच्या यशाचे कौतुक करताना ते म्हणाले, "योगेशनं थोड्या कालावधीत समर्पित भावनेनं भरपूर कष्ट घेतले. त्याची जिद्द, चिकाटी आणि कामावरची निष्ठा तसेच लक्ष्यावर लक्ष केंद्रित करण्याची त्याची क्षमता, या चार गुणांमुळे त्यानं यश खेचून आणलं आणि सगळ्यात महत्त्वाची असते ती आपल्या गुरुवरची श्रद्धा! योगेशनं माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेवली, त्यामुळेच माझ्याकडे जे जे सर्वोत्कृष्ट होतं, ते ते सगळं मी त्याच्या पदरात टाकलं! म्हणूनच आज केवळ वयाच्या 13 व्या वर्षी नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविण्यासारखी कौतुकास्पद कामगिरी बजावू शकला."

शूटिंग रेंजवर सराव करताना चि. योगेश.
शूटिंग रेंजवर सराव करताना चि. योगेश.

पुत्राच्या उज्ज्वल भविष्याकडे डोळे लावून बसलेल्या पित्याला आणखी काय हवं होतं! माझी मान अभिमानानं उंचावली नसती, तरच नवल! माझा योगेश तरुणांसाठी 'यूथ आयकॉन' ठरला होता! ही गोष्ट माझ्यासाठी पृथ्वीमोलाची होती. 25 ऑक्टोबर, 1991. सुवर्णपदक जिंकल्यावर योगेशचं पहिलं पाऊल कोल्हापुरात पडलं. महालक्ष्मी एक्स्प्रेसनं त्याचं आगमन होताच, कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं त्याचं मोठ्या उत्साहात आणि जल्‍लोषात भव्य स्वागत करण्यात आलं. कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमी जनतेनं त्याचा उत्स्फूर्तपणे सत्कार केला. एवढ्या लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर विक्रमवीर ठरलेला कोल्हापूरचा सुपुत्र म्हणून लोकांना त्याची मोठी अपूर्वाई वाटत होती. थोडक्यात म्हणजे, कोल्हापूरकरांसाठी योगेश 'यूथ आयकॉन' बनला होता! त्यानंतर योगेशचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. परंतु, आबांची मायभूमी असलेल्या गगनबावड्यात त्याचा जो सत्कार झाला, तो पाहायला आबा असायला हवे होते. निश्‍चितच नातवाच्या पराक्रमानं ते धन्य धन्य झाले असते. गगनबावड्यात झालेला सत्कार म्हणजे घरचा सत्कार. या सत्कारानं योगेशच्या भावी वाटचालीला थोरामोठ्यांचे आशीर्वादच लाभले.

एकतर, हा सत्कार झाला तोच मुळी प. पू. गगनगिरी महाराज यांच्या हस्ते. गगनगिरी महाराज आणि आबांचा दीर्घकाळापासूनचा स्नेहसंबंध. एक सद‍्गृहस्थ तर दुसरे संन्याशी. तरीही दोघांचं मैत्र अध्यात्मापलीकडचं. आबा जेव्हा जेव्हा गगनबावड्याला जात, तेव्हा तेव्हा वर गगनगडावर जाऊन महाराजांची हमखास भेट घेत. पुढे पायांच्या दुखण्यामुळे आबांना गगनगडावर जाणं अशक्य झालं, तर गगनगिरी महाराजच खास घोड्यावर बसून आबांना भेटायला खाली गगनबावड्यात येत. असं हे जगावेगळं मैत्र. त्यामुळे आबांच्या नातवाचा सत्कार गगनगिरी महाराजांच्या हस्ते व्हावा ही जणू नियतीलाच इच्छा होती. योगेशचं तोंडभरून कौतुक करताना, महाराजांना किती बोलू आणि किती नको, असं झालं होतं. "योगेशनं नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून गगनबावड्याचं नाव अख्ख्या भारतात गाजवलं आहे." या शब्दांत त्यांनी योगेशची प्रशंसा केली. तर, श्रीमंत माधवराव भैयासाहेब पंडित तथा बावडेकर सरकार म्हणाले, "घरच्याच माणसांनी आपल्या मुलाचं कौतुक करावं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी, तसा हा आजचा आगळावेगळा सत्कार आहे." यावेळी चांदीची गणेशमूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन योगेशचा महाराजांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. आपल्या लेकाचं कौतुक डोळे भरून पाहायला सौ. गीतादेवीही हजर होत्या. या समारंभाचं औचित्य साधून ग्रामस्थांनी माझा आणि सौ. गीतादेवींचाही हृद्य सत्कार केला. या घरच्या कौतुकानं योगेशचं मन मोहरून गेलं.

त्यानंतर योगेशचा कोल्हापुरात ठिकठिकाणी सत्कार झाला. त्याच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. परंतु, कळसावर झेंडा लागला, तो त्याला मिळालेल्या एका फार मोठ्या पुरस्कारानं! योगेशला जेव्हा इचलकरंजीतील शंकरराव कुलकर्णी यांच्या 'फाय फाऊंडेशन'चा पुरस्कार जाहीर झाला, तो क्षण तर आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. कारण पुरस्कार फारच प्रतिष्ठेचा मानला जाई. यापूर्वी देशातील अनेक नामवंतांना तो देण्यात आलेला होता. वानगीदाखल नावं सांगायचीच झाली तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव, मलिका साराभाई, ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर आणि शिवाजी सावंत यांसारख्या मान्यवरांना या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं.

25 जानेवारी, 1992 रोजी योगेशला हा पुरस्कार जाहीर झाला. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते समारंभपूर्वक तो योगेशला देण्यात आला. त्यानंतरही योगेशनं असनसोल (पश्‍चिम बंगाल), चेन्‍नई येथील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भाग घेऊन रौप्यपदक आणि ब्राँझपदकांची कमाई केली. खरं तर, नेमबाजीनं त्याला झपाटूनच टाकलं होतं. जणू त्याला वेडच लागलं होतं. आता त्याचं लक्ष ऑलिम्पिककडे लागलं होतं…! पण ….? ऑलिम्पिकच्या ट्रेनिंगसाठी भारतातील जी दहा मुलं निवडण्यात आली होती, त्यामध्ये योगेशचाही समावेश होता. दिल्ली येथे ऑलिम्पिक कोच डेव्हिड लायमन यांनी त्यांना ट्रेनिंगही दिलं होतं. योगेशला स्वतःचं गुणवत्ता मेडल बक्षीस देतानाच, 'हा मुलगा ऑलिम्पिकपर्यंत नक्‍कीच जाईल,' असा आत्मविश्‍वास बोलून दाखवला होता. यानंतर योगेशचा बराचसा वेळ शूटिंग रेंजवर जाऊ लागला व साहजिकच त्याचं अभ्यासाकडं थोडं दुर्लक्ष होऊ लागलं. ही गोष्ट योगेशच्या आई गीतादेवींना आवडली नाही. त्यांचं म्हणणं असं होतं, की 'त्याला दररोज तीन-तीन चार-चार तास उभं राहून प्रॅक्टिस करावं लागतं. अशा परिस्थितीत तो अभ्यास कधी करणार? आणि त्याच्या अ‍ॅकॅडमिक करिअरचं काय होणार?'
याबाबतीत आमच्यात वैचारिक मतभेद झाले, तरी त्यांची भीती अनाठायी मुळीच नव्हती. एक आई म्हणून त्यांना आपल्या लेकराच्या भल्याची चिंता लागून राहिली होती आणि त्यात गैर काही नव्हतं. या द्वंद्वात अखेर विजय त्याच्या आईचाच झाला आणि तसा तो होणं क्रमप्राप्‍तही होतं. योगेशच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भाग घेण्याला खीळ बसली. योगेशही इतका समजदार मुलगा होता, की त्यानं आपल्या मनाला लगेच मुरड घातली आणि रायफल खाली ठेवून अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं! आणि त्याच्या आईचा विश्‍वास त्यानं सार्थ ठरवला.

दिवसेंदिवस त्याची घोडदौड वेगानं वाढतच गेली आणि पुढे त्यानं 'पुढारी'च्या विस्तारीकरणात लक्ष घालून यशाचे झेंडे फडकावले, हे सर्वश्रुतच आहे. याचा अर्थ एकच, की उद्यमशील मुलगा कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवतोच.
"It's not about ideas, It's about making ideas happen." ही आंग्ल उक्‍ती योगेशच्या कार्यप्रणालीला तंतोतंत लागू पडते. कार्यप्रवण पिढ्यांकडून कोणत्याही घराण्याचा विकासच होत असतो, यात संशय नाही. पण दुर्दैवानं पुढची पिढी जर कर्तृत्वशून्य आणि दुबळी निघाली, तर जागतिक पातळीवर नामांकित असलेली कुटुंबं आणि औद्योगिक घराणीही कशी लयाला जातात, हे आपल्याला पावलोपावली पाहायला मिळतं. याबाबतीत 'पुढारी' मात्र भाग्यशाली निघाला. आबांनी 'पुढारी'चं रोपटं लावलं. त्याला खतपाणी घालून त्याचा पाया मजबूत केला. त्यावर मी 'पुढारी'चा चौफेर विस्तार करून कळस चढवला. परंतु, माझ्या कर्तृत्वाला सदोदितच समाजसेवेची झालर लाभली. किंबहुना पत्रकारिता आणि समाजसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असंच मी मानत आलो.

'गगनापरी जगावे, मेघापरी मरावे
तीरावरी नदीच्या, गवतातुनी उरावे'

कुसुमाग्रजांच्या 'शलाका'मधील या काव्यपंक्‍ती मानवी जीवनाची सार्थकता सांगतात आणि हाच विचार घेऊन मी सामाजिक आसमंतात भरारी घेत राहिलो. आता 'पुढारी'ची धुरा योगेशच्या खांद्यावर मी दिलेली आहे आणि अत्यंत दमदारपणे पावलं टाकीत तो 'पुढारी'च्या उत्कर्षामध्ये आपलं योगदान देत आहे. खरं तर, हा परिपाक आम्ही पिढी दरपिढी घेत असलेल्या कष्टाचा आणि स्वीकारत आलेल्या आव्हानांचा आहे, असं म्हटलं तर ते मानभावीपणाचं मुळीच होणार नाही.

"The toughest thing about success is that you have got to keep on being a success."

जगप्रसिद्ध संगीतकार आयर्विन बर्लिन यांचा हा सक्सेस मंत्र योगेशनंही शब्दशः अंगीकारला आहे. मग डिजिटल असो वा एफएम रेडिओ, अशा अनेक माध्यमांतून 'पुढारी'चा डंका आज चहुमुलुखी वाजतो आहे. या कामात योगेशला त्याची सुविद्य पत्नी स्मितादेवी यांचीही साथ मिळते आहे, हे विशेष होय.

मुंबई विद्यापीठाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते
मुंबई विद्यापीठाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते

शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यानं नेमबाजीत होऊ घातलेल्या करिअरला ब्रेक दिला आणि आपलं संपूर्ण लक्ष शिक्षणावरच केंद्रित केलं. त्यानं बी.कॉम. करून पुढे एम.बी.ए.ही केलं. मी पुण्यातून पत्रकारितेचे प्राथमिक धडे गिरवले होते. त्यामुळं योगेशनंही पुण्यालाच प्राधान्य दिलं. पुणे विद्यापीठातून त्यानं पत्रकारितेची पदवी प्राप्‍त केली. एवढ्यावरच न थांबता त्यानं मुंबई विद्यापीठातून पीएच.डी.ही केली! हे सर्व करीत असतानाच तो 'पुढारी'च्या कामकाजातही लक्ष घालू लागला. नवनव्या कल्पना अंमलात आणू लागला.

'पुढारी'चा व्याप सांभाळताना सार्वजनिक कार्यासाठीही मी भरपूर वेळ देत असे. अनेक सामाजिक प्रश्‍नात पुढाकार घेत असे. आता माझ्याबरोबर योगेशही सार्वजनिक कार्यात सहभागी होऊ लागला. मग गणेशोत्सव असो वा शाहू जयंती किंवा शिवजयंती असो, अशा सोहळ्यांतून त्यालाही उद्घाटक म्हणून बोलावलं जाऊ लागलं. अनेक कार्यक्रमांत तो प्रमुख पाहुणा म्हणून जाऊ लागला. कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात तो हळूहळू चमकू लागला. त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. जाधव घराण्यातील तिसरी पिढी सार्वजनिक जीवनात उरतली…!

योगेशची वृत्ती अभ्यासू. 'पुढारी'च्या कामकाजात लक्ष घालूनही आणि सामाजिक जीवनातला वावर अखंडितपणे चालू असतानाही, योगेशनं मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली, ही गोष्ट आम्हा घरच्यांनाही थक्‍क करणारीच होती. 'भारतातील प्रसार माध्यमांपुढील आव्हाने आणि संधी' या विषयावर त्यानं लिहिलेल्या प्रबंधाबद्दल त्याला पीएच.डी. प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे देशातील या विषयावरची उल्‍लेखनीय संशोधनाबद्दल देण्यात आलेली ही पहिलीच डॉक्टरेट होती. या कामी योगेशला मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या प्रमुखांचं मार्गदर्शन लाभलं. या प्रबंधासाठी त्यानं प्रिंट मीडियापासून, इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडिओ मीडिया तसेच इंटरनेट मीडिया, आऊट डोअर मीडिया, सिनेमा आणि मल्टिप्लेक्स मीडिया, अशा विविध माध्यमांचा सखोल अभ्यास केला. तुलनात्मक चिकित्सा केली. परदेशातून भारतात जी थेट गुंतवणूक होत आहे, त्याचाही त्यानं परामर्श घेतला. मीडिया म्हणजे विषय तसा घरचाच. अगदी जिव्हाळ्याचा. त्यामुळे त्यानं त्याच्या प्रबंधाची अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडणी केली.

2013 सालच्या जानेवारीत मुंबईत तत्कालीन राष्ट्रपती प्रणवकुमार मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्‍न झाला. त्या समारंभात योगेशला डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. नेमबाजीतील सुवर्णपदक विजेता ते मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट, योगेशचा हा प्रवास थक्‍क करणाराच होता. त्यानं जेव्हा नेमबाजीतील सुवर्णपदक पटकावलं, तेव्हा त्याची बातमी करताना 'टाइम्स ऑफ इंडियानं', 'योगेश स्टील्स द शो' अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं होतं. त्याची प्रचिती त्याचा डॉक्टरेटपर्यंतचा प्रवास पाहताना आल्याशिवाय राहात नाही.
'रिसर्च इन कॉमर्स अँड मॅनेजमेंट इन इंडिया एरिया इन मीडिया मॅनेजमेंट इन इंडिया' या क्षेत्रात योगेशनं केलेल्या उल्‍लेखनीय संशोधनाबद्दल त्याला रिसर्च अ‍ॅवॉर्ड देण्यात आलं, हे आणखी एक मोरपीस त्याच्या तुर्‍यात खोवलं गेलं! मुंबई विद्यापीठातर्फे बिग बी तथा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हे रिसर्च अ‍ॅवॉर्ड प्रदान करून योगेशचा सन्मान करण्यात आला. यावेळी योगेशचा गौरव करताना, 'शिक्षणामुळेच संस्कारमूल्ये तयार होतात,' असे विचार अमिताभ यांनी मांडले. योगेशला मिळालेलं हे रिसर्च अ‍ॅवॉर्ड म्हणजे आमच्या जाधव कुटुंबीयांचा आणि 'पुढारी' परिवाराचाच सन्मान होता.

पंतप्रधानांसोबत परदेश दौर्‍यावर जाणं हे मानाचं पान असलं, तरी पत्रकारांसाठी ही अनुभवाची मेजवानीच असते. अशा दौर्‍यातून आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची व्यूहरचना, आपल्या देशाचं धोरण आणि इतर राष्ट्रांचा आपल्याकडे पाहण्याचा द‍ृष्टिकोन यासारख्या बाबी कळून येतात. शिवाय इतर राष्ट्रातील सर्वोच्च नेत्यांना जवळून पाहता येतं, अनुभवता येतं. एक प्रकारे समृद्ध करणाराच हा अनुभव असतो.

पंतप्रधान राजीव गांधी यांनी जेव्हा त्रिदेश दौरा केला, तेव्हा अवघ्या काही दिवसांच्या प्रत्यक्ष परिचयानंतरही त्यांनी मला बरोबर घेतलं होतं. मी त्यांच्या शिष्टमंडळाचा एक महत्त्वाचा घटक होतो. योगेशलाही तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग आणि कवी मनाच्या अटलबिहारी यांनीही आपापल्या परदेश दौर्‍यात सोबत घेतलं होतं. दै.'पुढारी'च्या व्यवस्थापकीय संपादकपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर योगेश पहिल्यांदा सन 2001 मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत चार दिवसांच्या मलेशिया दौर्‍यावर गेला होता. त्यानंतर 2013 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत पाच दिवसांसाठी तो रशिया आणि चीनला जाऊन आला.

मुस्लिम बहुसंख्याक असलेल्या मलेशियानं काश्मीर प्रश्‍नात नेहमीच भारताला पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद महाथीर होते. 13 मे, 2001 रोजी योगेश दिल्‍लीहून मलेशियाला गेला. वाजपेयींच्या शिष्टमंडळात तत्कालीन माहिती खात्याचे मंत्री प्रमोद महाजन आणि वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री ओमर अब्दुल्‍ला यांच्यासह सत्तर जणांचा समावेश होता. ज्येष्ठ पत्रकार, 'एशियन एज'चे संपादक एम. जे. अकबर, 'पंजाब केसरी'चे संपादक अश्‍विनीकुमार मीना, 'पायोनियर'चे संपादक चंदन मिश्रा, 'ऑर्गनायझर'चे संपादक शेषाद्री चारी तसेच 'टाइम्स ऑफ इंडिया'चे प्रियरंजनदास आणि 'हिंदुस्थान टाइम्स'चे पंकज व्होरा असे दिग्गज पत्रकार या दौर्‍यात सहभागी झाले होते. त्यामध्ये योगेश हा सर्वात तरुण पत्रकार होता.

या दौर्‍यात उभय देशांमध्ये माहिती तंत्रज्ञान, व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासंबंधित काही महत्त्वाचे करार झाले. त्यामध्ये भारतानं मलेशियात रेल्वे मार्ग बांधून देण्याचा 4800 कोटींचा करार हा सर्वात महत्त्वाचा होता. तसेच भारताच्या प्रक्षेपक वाहनाद्वारे मलेशियाचे उपग्रह अवकाशात पाठविण्याचा करारही त्यावेळी करण्यात आला.बदलती जागतिक परिस्थिती आणि नव्या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा चीन आणि रशियाचा दौराही अत्यंत महत्त्वाचाच होता. 20 ते 24 ऑक्टोबर 2013 या दरम्यान हा दौरा झाला. भारत, रशिया आणि चीन हे जागतिक राजकारणातले महत्त्वाचे देश. रशिया आणि चीन हे अर्थातच कम्युनिस्ट. रशियानं काळाची पावलं ओळखून साम्यवादाला मुरड घातली; पण चीन मात्र साम्यवादापासून तसूभरही ढळला नाही. मात्र, चीनच्या साम्यवादाची परिभाषा काळानुरूप बदलली. मनमोहन सिंग यांच्या दौर्‍यामुळे भारत-चीन आणि भारत-रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी मिळण्यास मदत झाली. या दौर्‍यामुळे रशिया आणि चीनचा इतिहास, त्यांचा भूगोल, त्यांची संस्कृती, तिथलं हवामान, त्यांचे जागतिक हितसंबंध या सर्व बाबींचा योगेशला सखोल अभ्यास करता आला. तसेच चीनचे पंतप्रधान ली केमियांग आणि अध्यक्ष जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासमवेत मनमोहन सिंग यांच्या ज्या चर्चा आणि बैठका झाल्या, त्यातून पत्रकाराला लागणारा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा समृद्ध करणारा अनुभव योगेशला मिळाला.

इचलकरंजी येथील प्रतिष्ठित 'फाय फौंडेशन'चा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी मनोगत व्यक्‍त करताना चि. योगेश.
इचलकरंजी येथील प्रतिष्ठित 'फाय फौंडेशन'चा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी मनोगत व्यक्‍त करताना चि. योगेश.

जून 2018 मध्ये योगेश यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी सन्मानपूर्वक निवड करण्यात आली. जाधव घराण्यासाठी हा मोठा भाग्याचा आणि ऐतिहासिक प्रसंग होता. आबा आमदार होते. मी राजकारणापासून अलिप्‍त राहिलो. परंतु, आबांची ती गुणसूत्रं आमच्या तिसर्‍या पिढीत आली आणि योगेश यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला! खरं तर, मला कितीतरी वेळा राजकारण प्रवेशाची आणि वेगवेगळ्या पदांची ऑफर आली होती. विशेषतः यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी तर मला थेट प्रस्ताव दिले होते. मात्र, निर्भीड पत्रकारिता सोडून राजकीय पद भूषविण्यास मला रस नव्हता. तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना संधी देण्याच्या धोरणातूनच योगेश यांची निवड केली होती. त्यांच्या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असला, तरी या पदाचं स्वरूप मात्र राजकारणापासून पूर्णपणे अलिप्‍त असंच होतं. राज्यात एकूण तीन वैधानिक विकास मंडळं असून, त्यावर राज्यपालांचं नियंत्रण असतं. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रात पुणे, नाशिक, आणि कोकण हे तीन महसुली विभाग येतात. एकूण सोळा जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. पश्‍चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या विभागातील विकासाला चालना मिळावी आणि सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास व्हावा, याची जबाबदारी योगेशवर सोपविण्यात आली होती.

त्यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या पदाला पूर्णपणे न्याय दिला. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि डिव्होशन यामुळे त्याचा या पदाला निश्‍चितच फायदा झाला असणार, यात शंका नाही. योगेशचा स्वभाव चिकित्सक आहे. एखाद्या विषयाचा ते सखोल अभ्यास करतात. पुरेपूर माहिती घेतात. त्यांच्यापुढे चुकीची माहिती ठेवता येत नाही. त्यांचं होमवर्कही पक्‍कं असतं. म्हणूनच त्यांची प्रशासनावर भक्‍कम पक्‍कड आहे. त्यांनी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रात भरीव कार्य केलं आहे, यात संशय नाही.

योगेशनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्याझाल्याच 'पुढारी'ची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असून सध्या ते 'पुढारी'चे समूह संपादक आहेत. त्यांनी डिजिटल पुढारी, एफ.एम. सुरू केलं. शिवाय विस्तारवादी धोरणाचा अवलंब करून ती जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली. इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, ई-पेपर या सर्व गोष्टी ते पाहतात. खरं तर योगेशमुळे माझ्यावर असलेली जबाबदारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मीसुद्धा अशीच आबांच्या खांद्यावरची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली होती आणि काळानुरूप 'पुढारी'मध्ये बदल केले होते. सध्या मात्र या क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत. प्रिंट मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडियाची जोड मिळाल्यामुळे या क्षेत्राचं रूपच पालटून गेलं आहे. हा मीडिया आता अगदी दूरवरच्या खेडेगावातील तरुणाच्या हातापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळेच काळाची पावलं ओळखून योगेशनी आधुनिक तंत्रज्ञानाला साजेसे निर्णय घेऊन इलेक्ट्रॉनिक मीडियातही आपलं स्थान पक्‍कं केलं आहे. अर्थात, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे स्वरूप विविधांगी असून तद्नुषंगिक निर्णय घेऊन त्यावर ते अंमलबजावणीही करीत आहेत. त्यामुळेच 'पुढारी'च्या विस्ताराला अधिकाधिक चालना मिळून तो अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे, यात शंकाच नाही.

1 जानेवारी, 2021 ला माझ्या 'पुढारी'च्या संपदाकपदाची पन्‍नास वर्षे पूर्ण झाली. तसेच माझी वयाची पंचाहत्तर वर्षेही पूर्ण झाल्यामुळे माझा व्याप मला कमी करणं भाग होतं. खांदेपालट अपरिहार्य होती. म्हणून मी 'पुढारी'च्या चेअरमनपदाची धुरा योगेशवर सोपवून मी स्वतः जबाबदारीतून मुक्‍त झालो. योगेश एक अभ्यासू आणि कष्टाळू व्यक्‍तिमत्त्व असल्यामुळे ते चेअरमनपदाची धुरा अत्यंत कार्यक्षमतेनं सांभाळतील आणि कालानुरूप 'पुढारी'मध्ये योग्य ते बदल करून वाचकांच्या इच्छा पूर्ण करतील, असा मला ठाम विश्‍वास आहे.

'होवे है जादः-ए-रह, रिश्तः-ए-गौहर हर गाम।
जिस गुजरगाह में, मैं आबलः पा जाता हूँ।'

गालिबच्या या काव्यपंक्‍तींचा अर्थ आहे, 'ज्या मार्गावरून मी असा फोड आलेल्या पायांनी जात आहे, त्या प्रत्येक गावातील वाट मोत्याची माळ होत आहे.' मला खात्री आहे, योगेश हेही असेच कष्टाळू आहेत. एखाद्या कामात त्यांचं स्वतःला झोकून देणं मी जवळून पाहिलं आहे. अनुभवलं आहे. साहजिकच एखादं उद्दिष्ट साध्य करताना त्यांना कितीही कष्ट पडले, तरीही ते त्याची मोत्यांची माळ करतील आणि 'पुढारी'चा ध्वज मोठ्या डौलानं फडकत ठेवतील, यात मला शंकाच नाही.

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव
मुख्य संपादक, दैनिक पुढारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news