पुणे : वीज पडली आणि दुष्काळी माळरानावर पाणी उसळले
सुपे/उंडवडी (पुणे); पुढारी वृत्तसेवा : ईश्वराची करणी आणि नारळात पाणी असे म्हटले जाते; मात्र विजेची करणी आणि जमिनीतून उसळले पाणी असे म्हटले तर वावगे ठरू नये. दुष्काळी भागातील शेतकर्यांना 300 ते 600 फूट बोअरवेल खोदूनही पाणी लागत नाही.
असे असताना विजेच्या कृपेने क्षणार्धात पाणी लागणे ही अलौकिक किमयाच म्हणावी लागेल. ही किमया बारामती तालुक्यातील कारखेल गावच्या हद्दीत कोरेश्वर मंदिराच्या उत्तरेला शुक्रवारी (दि. 9) ओसाड माळरानावर घडली आहे.
मंगळवारी सायंकाळच्यादरम्यान आकाशात कडाडणारी वीज (सौदामिनी) या माळरानावर पडली आणि शनिवारी (दि. 10) त्या ठिकाणी अक्षरशः पाणी उसळल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बघता बघता ही वार्ता परिसरात पसरल्याने ही अद्भुत किमया ज्या ठिकाणी घडली तेथे उसळणारे पाणी पाहण्यासाठी कारखेल व परिसरातील गावातील लोकांनी गर्दी केली होती. कोळोली व कारखेल गावाच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृश विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला.
दुसर्या दिवशी शनिवारी किसन तांबे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी व रामदास गवळी आपली गुरे चारण्यासाठी कारखेलनजीकच्या कोरेश्वर मंदिराच्या उत्तर दिशेला माळरानावर गेले होते. त्यांना अचानक पाणी उसळताना दिसले. या पाण्याने तलावानजीकच्या शेताच्या तालीतील संपूर्ण भाग व्यापला होता. पाणी कमी होण्याऐवजी वाढतच होते. ही वार्ता या दोघांनी कारखेल ग्रामस्थांना दिली. यामुळे वीज पडून लागलेले जिवंत पाणी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
यावेळी कारखेलचे सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच राजहंस भापकर, पोलिस पाटील सचिन पाटील, नानासाहेब भापकर, कोरेश्वर मंदिराचे महाराज ह. भ. प. लक्ष्मण यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.

