पुणे : वसंत ऋतू म्हणजे चैत्र-वैशाख नव्हे..!

पुणे : वसंत ऋतू म्हणजे चैत्र-वैशाख नव्हे..!
Published on
Updated on

पुणे ; सुनील माळी : 'चैत्रात झाडांना नवपालवी फुटते…' 'वसंत म्हणजे चैत्र-वैशाख…' ही वाक्ये मराठी माणूस पिढ्यान्पिढ्या घोकत आला असला, तरी उत्तर भारतातील कालिदासासारख्या संस्कृत कवींच्या वर्णनावरून केलेल्या या धारणा महाराष्ट्रात चुकीच्या ठरतात आणि आपल्या राज्यात फेब्रुवारी ते एप्रिल हाच वसंत ऋतू असल्याचे, तसेच त्यामुळेच सरत आलेल्या खर्‍या वसंतात फुललेली वृक्षसंपदा सध्या पाहायला मिळत आहे.

चैत्रात वसंत ऋतू असल्याचे अनेक संदर्भ संस्कृत काव्यांमध्ये असले, तरी ती काव्ये उत्तर भारतातील निसर्गस्थितीनुसार रचली आहेत आणि त्या भागात वसंताचे आगमन हे महाराष्ट्राच्या तुलनेने नंतर होत असल्याने ती त्या भागात योग्य ठरतात. महाराष्ट्रात मात्र वसंत फेब—ुवारी महिन्यात सुरू होतो, त्यामुळेच त्याच्या खुणा फेब—ुवारीपासून पाहायला मिळतात. तशा त्या यावर्षीच्या वसंतातही पाहायला मिळाल्या. यासंदर्भातील तपशीलवार माहिती वनस्पतिशास्त्रातील तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी दै. 'पुढारी'ला दिली. कालिदासाच्या 'ऋतुसंहार' काव्यात

'आदीप्तवन्हिसद‍ृशैर्मरूता वधूतै: सर्वत्र किं शुक वनै कुसुमावनम—ै: सद्यो सवंतसमये हि समचितेयं रक्‍तांशुका वन वधूरिव भाति भूमि:' असा उल्‍लेख आहे. याचा अर्थ 'अग्‍नीसारख्या लाल पुष्पसंभारांनी पळसाची झाडे आच्छादली आहेत, त्यामुळे भूमी लाल वस्त्र परिधान केलेल्या एखाद्या नववधूसारखी शोभून दिसत आहे.' आपला देश खंडप्राय असल्याने या वर्णनानुसारची स्थिती उत्तरेत एप्रिल-मेमध्ये दिसते, तर महाराष्ट्रात फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये असते.

भौगोलिकद‍ृष्ट्या 21 मार्च हा वसंत संपात असल्याने त्याच्या आधीचा आणि नंतरचा एक महिना वसंत ऋतूचा काळ समजता येतो. महाराष्ट्रात 16 फेब्रुवारी ते 15 एप्रिल हा काळ वसंत ऋतूचा मानता येईल. यंदा 1 एप्रिलला चैत्रमासारंभ असून, पारंपरिक कल्पनांनुसार तेव्हा वसंत सुरू होईल; पण महाराष्ट्रातील निसर्गाप्रमाणे वसंत केवळ पंधरा दिवसांचाच राहिलेला असेल.

'मी पंधरवड्यापूर्वी कोयनानगरच्या जंगलात फेरफटका मारला, तर वसंतोत्सव भरात असल्याचे दिसले,' असे प्रा. महाजन सांगतात. कडुनिंबापासून सर्व झाडांना आता पालवी आली आहे. काटेसावर फुलला आहे. खरे तर वसंताआधीच शिशिरात फुललेल्या पळसाला आता शेंगाही लागल्या आहेत. फुलांनी बहरलेला शिवण-वारस-सोनचाफा रंगोत्सव साजरा करत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिकांनीही संस्कृतमधील वसंत ऋतूच्या माहितीवर विसंबून लिहिलेले साहित्य प्रत्यक्षात महाराष्ट्रातील निसर्गाशी विसंगत असल्याचे दिसते. प्रसिद्ध लेखिका विदुषी दुर्गा भागवत तसेच महाराष्ट्राचे वाल्मीकी असलेल्या ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्यावरून तसे म्हणता येते. 'ऋतुचक्र' या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात त्या म्हणतात, 'श्रावणाची साखळी असते तशीच वसंताची.

फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यायलेले… बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे… तरीपण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, कुसुमाकर आहे.' चैत्राला असा कुसुमाकर म्हणून गौरवल्यावर भागवत यांच्या ध्यानात येते की, हा पुष्पसोहळा तर फाल्गुनातच साजरा होतो. म्हणूनच त्या पुढे लिहितात… 'नवपल्‍लवांनी गर्द झाकलेल्या, फुलांनी डवरून गेलेल्या वृक्ष-लतांचे दर्शन तर फाल्गुनातच घडते,

मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ?…' हा त्यांचा गोंधळ होतो तो उत्तरेतील वसंत आणि महाराष्ट्रातील वसंत यातील फरक लक्षात न आल्यामुळे. गदिमांनीही 'गुलमोहर फुललाय म्हणजे वसंताची चाहूल' असे लिहिले आहे. वास्तविक, गुलमोहर, बहावा फुलतो तो ग्रीष्म ऋतूमध्ये. म्हणजे इंग्लिश महिन्यांमधल्या साधारणत: 16 एप्रिलपासून ते 15 जूनपर्यंतच्या कालखंडात. बहाव्याशी साधर्म्य असलेली सोनसावर वसंतात फुलते. तिलाच बर्‍याचदा बहावा समजले जाते; वास्तविक आता मार्चअखेरीस सोनसावरीच्या फुलण्याचा शेवटही झाला आहे.
(सर्व छायाचित्रे : डॉ. पराग महाजन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news