

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी महत्त्वाची समजली जाणारी 'गेट' परीक्षा जाहीर करण्यात आली असून, 4, 5 फेब्रुवारी आणि 11, 12 फेब्रुवारीदरम्यान ही परीक्षा होणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या 29 वेगवेगळ्या विषयांमध्ये ही परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
आयआयटी कानपूरद्वारे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन करण्याची संधी मिळते. परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर एक किंवा दोन अशा प्रकारांमध्ये अर्ज करण्याची संधी मिळेल. एरोस्पेस इंजिनिअरिंग, अॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, गणित अशा 29 विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
पेपर एक आणि पेपर दोनसाठी वेगवेगळ्या विषयांचे पर्याय दिले जाणार आहेत. आपल्या क्षेत्रानुसार या विषयांची निवड करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. 30 सप्टेंबरला अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत विलंब शुल्क भरून परीक्षेसाठी अर्ज करणे शक्य होईल. परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती http://gate.iitd.ac.in/ या लिंकवर विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे.
प्रवेश प्रकिया
अर्ज प्रक्रिया : 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर
परीक्षेसाठीचे एकूण विषय : 29
विलंब शुल्कासहित अंतिम मुदत : 7 ऑक्टोबर
परीक्षा पद्धत : कम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी)
परीक्षेचा दिनांक : 4,5 व 11, 12 फेब—ु. 2023
परीक्षेचा निकाल : 16 मार्च