

मुंबई : नरेश कदम : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची 'नफरत तोडो भारत जोडो' या यात्रेचा महाराष्ट्रातील अंतिम टप्पा सुरू आहे. या यात्रेला मराठवाडा आणि विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला असून या यात्रेच्या निमित्ताने का होईना काँग्रेसचे नेते घराबाहेर पडलेले दिसले हे भारत जोडोचे पहिले फलित… या यात्रेच्या निमित्ताने मिळालेल्या ऊर्जेचा राज्याच्या काँग्रेस नेत्यांनी पक्षवाढीसाठी उपयोग केला, तर ते दुसरे आणि खरे फलित ठरेल….
कन्याकुमारीपासून निघालेल्या राहुल गांधी यांच्या यात्रेने ७ नोव्हेंबरला देगलूर नांदेडमध्ये प्रवेश केला. या यात्रेला कसा प्रतिसाद मिळेल, याबद्दल राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मनात शंका होती. परंतु नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसजनांना हुरूप आला. वृत्तवाहिन्यांनी सुरुवातीला या यात्रेची फारशी दखल घेतली नव्हती. परंतु राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आणि ठिणगी पडली.
सावरकरांवरील टीकेच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेची चर्चा होऊ लागली. काँग्रेसजनांच्या फडात हवा शिरली. या टीकेला सत्तारुढ भाजपकडून उत्तर देण्यात आले आणि राज्यातील राजकारण राहुल यांच्या यात्रेभोवती फिरू लागले. यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाची कोंडी करण्याची संधी साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि मग उद्धव यांनाही सावरासारख करावी लागली.
राहुल गांधी हे हाफ टाईम राजकारणी आहेत, अशी टीका त्यांच्यावर होत असते. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी आपली ही प्रतिमा बदलण्यास सुरुवात केली आहे. सोनिया गांधी यांनी जसा काँग्रेसला सत्तेवर आणण्याचा करिष्मा केला होता, तसा करिष्मा राहुल गांधी यांना अजून जमलेला नाही. काँग्रेसजनांचा या करिष्म्यावर विश्वास असला तरी राज्यातील काँग्रेस नेत्यांचा राहुल गांधी यांच्यावर फारसा विश्वास नाही. मात्र भारत जोडोच्या निमित्ताने राहुल यांची बदलणाऱ्या प्रतिमेने काँग्रेसच्या नेत्यांच्या राहुल गांधींकडे पाहण्याच्या नजराही बदलल्या. याचा उपयोग राज्यातील काँग्रेसचे नेते पक्षात नवा प्राण ओतण्यासाठी किती करतात, हा खरा प्रश्न आहे. यात्रा आली आणि गेली… असे झाले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. केंद्रीय नेत्यांच्या धाकामुळे यात्रेचे योग्य आयोजन केले. नेत्यांनी राहुल यांच्यासोबत आपले आणि आपल्या राजकीय उत्तराधिकारी असलेल्या मुला-मुलींचे फोटो समाजमाध्यमांवर झळकावले. एकीकडे घराणेशाहीविरोधात भाजप टीका करत आहे. त्यामुळे भाजपचा घराणेशाहीचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली. बिगर गांधी कुटुंबातील नेता अध्यक्ष झाला आहे. पण महाराष्ट्रात मात्र काँग्रेसचे बडे नेते आपल्या उत्तराधिकारी यांना राहुल गांधी यांच्या सोबत चमकविण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील काँग्रेस मोठी करायची की आपली घराणे हाच प्रदेश काँग्रेसमधील मोठा पेच आहे.
या यात्रेमुळे मिळालेल्या ऊर्जेचा वापर पक्षाच्या वाढीसाठी नेत्यांनी केला पाहिजे, असे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राज्यात काँग्रेस विरोधी पक्षात असूनही आतापर्यंत कोणतेही मोठे आंदोलन काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना उभे करता आलेले नाही. मुळात सर्वच काँग्रेस नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. राज्यात भिंगरीसारखा फिरेल, असा नेता नाही. जे आहेत त्यांच्याकडे राज्यव्यापी संपर्क नाही आणि वक्तृत्वदेखील नाही. असे नेते वातावरणनिर्मिती काय करणार, असा प्रश्न आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा राज्याच्या कोणत्याही मोठ्या शहरातून गेली नाही.
राहुल गांधी यांच्या फिटनेसबद्दल तरुण वर्गात कुतूहल आहे. राहुल हे या यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी सकाळी दररोज व्यायाम करतात. त्यामुळे ते दिवसभर अविरतपणे सगळ्यांना भेटत आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनीही कवायत सुरू केली होती. आता त्यांनाही जनतेत मिसळावे लागेल आणि भारत जोडोच्या निमित्ताने कमावलेला थोडा बहुत फिटनेस टिकवावा लागेल. तरच त्यांचा टिकाव लागेल.
राज्यात ५१ टक्क्यांपेक्षा जास्त शहरीकरण झाले असून शहरी भागात काँग्रेसची पिछेहाट सुरू आहे. ही यात्रा राज्यातील मोठ्या शहरातून गेली असती तर काँग्रेसला अधिक फायदा झाला असता. ग्रामीण भागात या यात्रेची चर्चा नक्कीच आहे. आता राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील दौरे वाढविले तरच २०२४ च्या निवडणुकीसाठी ते भाजपपुढे आव्हान उभे करू शकतील. आता ही यात्रा राज्यात अंतिम टप्प्यात आहे. मराठवाडा आणि विदर्भात या यात्रेने वातावरण निर्माण केले आहे. पण याचा लाभ काँग्रेसचे नेते कसा उठवतात हा प्रश्न आहे…