

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेचे सहावे उमेदवार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे यांची महाडिक यांनी रविवारी भेट घेतली. जिल्ह्यातील उर्वरित आमदारांची देखील आपण भेट घेणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले. दरम्यान, महाडिक यांच्या भेटीचा आ. पी. एन. पाटील यांनी इन्कार केला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आहेत. या दोघांमध्ये लढत होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न सुरू होते. परंतु भाजप राज्यसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम राहिल्यामुळे या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दि. 10 जून रोजी मतदान असल्यामुळे हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवारांनी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. महाडिक यांनी जिल्ह्यातील आमदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे.
यासंदर्भात महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उमेदवार असल्यामुळे सर्व मतदारांना भेटणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वच आमदार मतदारांना आपण भेटत आहोत. यापुढेही मतदानाच्या दिवसापर्यंत भेटणार आहोत. जिल्ह्यातील सर्व आमदारांची भेट घेऊन त्यांना देखील आपण विनंती करणार आहे. सोमवारी (दि. 6) आ. प्रकाश आवाडे यांची आपण भेट घेणार आहोत. वेळेच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यातील अन्य उमेदवारांच्या भेटीचे नियोजन करण्यात येईल.