

पालघर ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील कॉन्कर अॅकॅडमी संस्थेतील 39 विद्यार्थ्यांच्या चमूमधील तीन आणि एक स्थानिक मुलगा असे चार जण केळवे समुद्र किनार्यावर गुरुवारी दुपारी बुडाले.
पालघर जिल्ह्यातील सुरक्षित मानल्या जाणार्या केळवे किनार्यावर पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच चार जणांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे दु:खाचे सावट पडले आहे. या दुर्घटनेनंतर केळवे किनार्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणखी जीवरक्षक नेमण्याची मागणी होत आहे.
राज्यात 'अनलॉक' सुरू झाल्यामुळे केळवे किनार्यावर 'पर्यटन पुन्हा सुरू झाले आहे. गुरुवारी दुपारी 2.35 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहणारा अथर्व मुकेश नाकरे (13 वर्षे, रा. देवीचा पाडा) लाटांच्या तडाख्यात सापडला. मुलगा बुडत असल्याचे दिसल्यावर नाशिकहून आलेले कृष्णा शेलार, दीपक वडाकाते, ओम विसपुते, अभिलेख देवरे (सर्व 17 वर्षे) यांनी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र, उसळत्या लाटांचा अंदाज न आल्यामुळे अथर्वसह चौघेही समुद्रात बुडाले.
या दुर्घटनेतून नाशिकचा अभिलेख देवरे (17 वर्षे) बचावला. दगावलेल्यांपैकी अथर्व नाकरे हा केळवे येथील आदर्श विद्यामंदिरात आठवीत शिकत होता, तर कृष्णा शेलार, दीपक वडकाते व ओम विसपुते हे तिघेही नाशिकमधील ब्रह्मा व्हॅली स्कूलचे 11 वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते.