पाक-चीनविरुद्ध बलुची

पाक-चीनविरुद्ध बलुची
Published on
Updated on

पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानचा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष 1947 पासूनचाच आहे. पाकच्या दावणीला बांधल्या गेलेल्या या प्रांताचे पाकिस्तानने केवळ शोषणच केले आणि तिथे कोणताही विकास घडवून आणला नाही. आजही तेथील स्थिती भयावह आहे. तेथील लोकांवर पाकिस्तानी शासक, लष्कर व गुप्तचर यंत्रणेकडून जे अनन्वित अत्याचार होत असतात त्याची लक्तरे अनेक वेळा आंतरराष्ट्रीय मंचावरही टांगली जातात. पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपडत असलेल्या बलुचीस्तानला पाकिस्तानने जणूकाही आंदण दिल्यासारखेच चीनच्या हवाली केल्यावर आता बलुची लोकांचा संघर्ष शीगेला पोहोचला आहे. पाक व चीनविरुद्ध त्यांची निकराची लढाईच सुरू झाली असून त्याचेच प्रतिबिंब 26 एप्रिलच्या घटनेत दिसून येते.

या दिवशी कराची युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये 'सुसाईड बॉम्बर' असलेल्या एका महिलेने चिनी लोकांना घेऊन येणार्‍या बसला बॉम्बस्फोट घडवून उडवले. यामध्ये तिच्यासह चारजण ठार झाले. त्यापैकी तिघे चिनी होते. ही 'सुसाईड बॉम्बर' एक उच्चशिक्षित महिला आणि दोन कोवळ्या मुलांची आई होती, हे विशेष! तिचे नाव शेरी बलूच. झूलॉजी विषयातील मास्टर्स डिग्री संपादन केलेली ही तीस वर्षांची महिला एका शाळेत शिक्षिका होती व सध्या 'एमफिल'ची तयारी करीत होती. तिचे वडील एक सरकारी कर्मचारी होते आणि पती एक डेन्टिस्ट आहेत. आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असलेल्या या महिलेने हे आत्मघातकी पाऊल उचलले, त्यावरूनच बलुची लोकांच्या मनात पाकिस्तान व चीनबाबत असलेली चीड दिसून येते. तिच्या पतीने 'तिच्या या असीम त्यागाबद्दल आपल्याला व आपल्या मुलांना अभिमानच वाटतो', असे म्हटले आहे. 2018 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेत तिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली होती. त्याची जमीन चीनच्या प्रकल्पासाठी देण्यात आली होती. त्यावेळेपासूनच शेरीच्या मनात चीनबाबत राग होता व त्यामधूनच तिने हे पाऊल उचलले, असे म्हटले जाते.

शेरी ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची (बीएलए)सदस्य होती. पाकिस्तानपासून बलुुचिस्तानला स्वतंत्र करण्यासाठी या उग्रवादी संघटनेची स्थापना झाली होती व पाकिस्तानने तिला 'दहशतवादी संघटना' घोषित केले आहे. या संघटनेला भारत आणि अफगानिस्तानचा पाठिंबा असल्याचा आरोपही पाकिस्तान सातत्याने करीत आला आहे. अर्थात, दोन्ही देशांनी हे आरोप फेटाळलेले आहेत. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार शेरी या संघटनेच्या 'मजिद ब्रिगेड' मध्ये दोन वर्षांपूर्वी सहभागी झाली होती. तिने स्वतःच या खतरनाक ब्रिगेडमध्ये सहभागी होण्याची आणि आत्मघातकी हल्ला करणार्‍या पथकाचा भाग बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'बीएलए'कडून तिला याबाबत पुनर्विचार करण्यास सुचवले होते; पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली व तिने जे करायचे ते केलेच!

या घटनेतून पाकिस्तानचे अत्याचार आणि चिनी बेरकीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बलुचिस्तानमधील ग्वादर बंदराचा विकास करण्याच्या नावाखाली चीनने हा संपूर्ण प्रांत घशाखाली घालण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. या प्रकल्पात स्थानिक लोकांना रोजगार मिळालेला नसून बाहेरचे लोक आणले गेले आहेत. इतकेच नव्हे, तर ग्वादरमध्ये प्रवेश करण्यासाठी बलुची लोकांना परमिट घ्यावे लागते. दुसर्‍या देशात जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागतो, तसाच हा प्रकार आहे. केवळ बलुचिस्तानचीच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानची जनताच चिन्यांची देशातील उपस्थिती व चीनच्या 'बेल्ट अँड रोड' योजनेने त्रस्त आहे. ग्वादर बंदरही चीन-पाकिस्तानच्या 60 अब्ज डॉलर्सच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे.

या प्रकल्पाच्या प्रारंभी स्थानिक जनतेला जी आमिषे दाखवली होती ती खोटीच ठरली असून तिथे पाणी, विजेच्या टंचाईपासून अन्य अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तेथील लोकांचे जगणेही मुश्कील झाले असल्याने आता बलुची लोकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. शेरी हे केवळ त्याचे एक प्रतीक!

शेरी बलुच या 'सुसाईड बॉम्बर' महिलेने चिनी वाहनावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्याने पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या लोकांचा संघर्ष आता तीव्र झाल्याचेच दिसून आले आहे. पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपडणार्‍या बलुचींना आता चिन्यांचाही सामना करावा लागत आहे.

– सचिन बनछोडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news