

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पहिल्याच पावसात शहरात दाणादाण उडाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले, झाडपडीच्या 30 पेक्षा अधिक घटना घडल्या, तर रस्त्यांवर सुरू असलेल्या विविध कामांमुळे वाहनचालकांना
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
शहरवासीयांना प्रतीक्षा असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी शहर व परिसरात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे प्रशासनासह नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामे झाल्याचा दावा केला जात असला, तरी रस्त्यांवर सुरू असलेल्या विविध कामांचा फटका नागरिकांना आणि वाहनचालकांना बसला.
या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदाईमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यांवर साचलेले पाणी आणि सुरू असलेल्या कामांमुळे पडलेला राडारोडा यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
मुख्य शहरातील टिळक रस्ता, सिंहगड रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, केळकर रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कात्रज- कोंढवा रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे शहरात जिल्हा पोस्ट कार्यालय, पोलिस आयुक्तालय, भवानी पेठ दूरसंचार निगम कार्यालय, प्रभात रोड, आंबेडकर चौक, औंध, राजभवनजवळ, गुरुवार पेठ- पंचहौद, कोंढवा-शिवनेरीनगर, एनआयबीएम रोड, कात्रज -कोंढवा रोड, नवी पेठ- पत्रकार भवन, राजेंद्रनगर, पर्वती- स्टेट बँक कॉलनी, एसटी कॉलनी- स्वारगेट, कोंढवा-आनंदपुरा हॉस्पिटल आदींसह एकूण 30 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. पोलिस आयुक्तालयाजवळील झाडपडीच्या घटनेत 20 ते 25 दुचाकींचे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पडलेली झाडे दूर करून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे केले.
https://youtu.be/7KwsutS10qQ