

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे, तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्घ शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना देण्यात येणार आहे. येत्या 24 एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती ज्येष्ठ गायिका व लतादीदींच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी दिली. 1 लाख रुपये रोख आणि प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी हा पुरस्कार प्रदान येणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधीपासून त्यांचे आणि लतादीदींचे जिव्हाळ्याचे संबंध होते, ते दीदींना बहीणच मानत होते. त्यांच्या भेटीत दीदींनी तुम्ही पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती, ते पंतप्रधानपदी विरामजान झाल्यावर हा स्नेह दृढ झाला, त्यामुळे दीदींच्या नावाचा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर करताना आम्हाला आनंद होत असल्याचे उषा मंगेशकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.
राहुल देशपांडे यांचे आजोबा गायक वसंतराव देशपांडे आमच्या बाबांचे शार्गीद होते, असे उषा मंगेशकर म्हणाल्या. चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीसाठी देण्यात येणार्या पुरस्कारासाठी या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हा पुरस्कार प्रसिध्द अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी आणि हेलन तसेच कपूर कुटुंबातील शम्मी कपूर आणि ऋषी कपूर यांना मिळाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, संज्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नूतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांना जाहीर झाला आहे.