

पणजी ; पिनाक कल्लोळी : जैवविविधतेचे जागतिक वारसास्थळ असणार्या पश्चिम घाटात आंबोली येथे ट्रॅपडोर कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. पर्यावरण अभ्यासक हेमंत ओगले यांच्या कामाची दखल घेत नव्या प्रजातीचे नामकरण कॉनोथीले ओगलेई असे करण्यात आले आहे.
स्वप्नील पवार, अक्षय खांडेकर, राजेश सानप आणि अनुराधा जोगळेकर या चौघांनी कॉनोथीले ओगलेईचा शोध लावला आहे. ओगलेई ही कॉनोथीले या पोटजातीमधील भारतामधून शोधण्यात आलेली पहिली नर प्रजाती आहे. तर पश्चिम घाटातील या प्रजातीचा कोळी दुसर्यांदा सापडला आहे. यातील अक्षय खांडेकर हे सांगली आणि स्वप्नील पवार हे कोल्हापूर येथील आहेत. तर राजेश सानप, अनुराधा जोगळेकर हे नाशिक येथील आहेत.
जगभरात कॉनोथीले पोटजातीमध्ये जवळपास 34 प्रजातींची नोंद आहे. यातील केवळ सहा प्रजाती भारतामध्ये आढळून येतात. अक्षय खांडेकर आणि स्वप्नील पवार यांना 2016 मध्ये कॉनोथीले ओगलेई आंबोलीमध्ये आढळला. राजेश सानप यांनी त्याचे परीक्षण केले. त्यांचे संशोधन आर्थ्रोपोडा सिलेक्ट या शोध पत्रिकेमध्ये मंगळवारी (दि. 29) रोजी प्रकाशित झाले आहे.
ट्रॅपडोर कोळी हे जमिनीमध्ये बीळ बनविण्यासाठी ओळखले जातात. बिळाच्या दारावर दगड, पालापाचोळा टाकून ते लपविले जाते. दाराबाहेर कोळी आपले जाळे पसरून ठेवतो.