पशुधनाला ‘सुरक्षाकवच’ देताना

पशुधनाला ‘सुरक्षाकवच’ देताना
Published on
Updated on

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात लम्पिस्किन आजाराने थैमान घातले आहे. या आजाराला पायबंद घालण्यासाठी आणि पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जनावरांचे लसीकरण केले जात आहे. लम्पीच नव्हे तर अन्यही अनेक आजारांपासून बचावासाठी प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या पशुधनाचे लसीकरण करणे गरजेचे आहे.

लसीकरण न झाल्यामुळे किंवा ते योग्य वेळी करून न घेतल्यामुळे फर्‍या, घटसर्प इत्यादी रोग जनावरांमध्ये आढळून येतात. यासाठी गावपातळीवर जनावरे लसीकरण मोहीम राबविल्या जातात; मात्र मोहीम असो वा नसो, पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण प्रत्येक वर्षी वेळेवरच करायला हवे आणि लसीकरण करातांना खालील काळजी घ्यायला हवी.

* लसीकरण थंड वेळी म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे. भर दुपारी खूप उन्हात लसीकरण करू नये.

* लसीची अंतिम मुदत तपासून घ्यावी. औषधाच्या बाटलीवरून अंतिम मुदतीचा तपशिल आढळत नसल्यास त्यासंबंधी संबंधित पशुतज्ज्ञास विचारून खात्री करून घ्यावी.

* लसीकरण करण्यापूर्वी जनावरांना पशुतज्ज्ञांच्या शिफारसीनुसार जंतनिर्मूलनासाठीची ओषधे द्यावीत, त्यामुळे परोपजीवींमुळे जनावरांना येणारा ताण कमी होतो आणि लसीची परिणामकारकता वाढते.

* लसीकरणाची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. ज्या रोगासाठी लस द्यायची असते, ती लस तो रोग होण्यापूर्वीच देणे अपेक्षित असते. रोग झाल्यावर लस परिणामकारक ठरत नाही. म्हणून लसीकरण करण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाची मदत घ्यावी. पुरेशी माहिती नसताना लसीकरण करु नये. त्यामुळे जनावरात कायमस्वरूपी दोष निर्माण होणे किंवा जनावर निकामी होण्याची शक्यता असते.

* लसीकरण करायच्या आधी जनावराला नीट ताणविरहित करावे. खूप लांबचा प्रवास किंवा अधिक काम यामुळे ताण येऊ शकतो, म्हणून लसीकरण शक्यतो गोठ्यातच करावे.

* आजारी जनावराला लसीकरण करू नये. आजार कमी होण्यासाठी उपचार करून जनावर नीट झाल्यावरच लसीकरण करावे. गाभण असलेल्या जनावरांना गाभण काळाच्या शेवटच्या काळात लसीकरण करू नये.

* लसीकरण करण्याच्या आधी जनावराला पाणी पाजावे.
तसेच लसीकरण केल्यानंतर गुळाचे पाणी दुसर्‍या दिवशी एकदा पाजावे. लसीकरणानंतर जनावराला लगेच कामाला लावू नये.

* लसीकरणाच्या वेळा शक्यतो काटेकोरपणे पाळाव्यात. लसीकरण हे रोगाच्या प्रादुर्भावापूर्वी किमान एक ते दीड महिना आधी करणे गरजेचे असते; कारण रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरिता किमान एकवीस दिवसांचा कालावधी लागतो. आजारांच्या वेळेनुसार लसीकरणाची आखणी करता येते आणि एक कॅलेंडर तयार करता येते.

* लसीकरणाची नोेंद ठेवावी, त्यामुळे पुढील लसीकरण किंवा जंताचे औषध द्यायची वेळ नीट लक्षात राहू शकते.

* एका गावात किमान 80 टक्के लसीकरण पूर्ण झाले पाहिजे. तरच लसीकरणाचा मोहिमेचा उद्देश सफल होऊ शकतो.

* प्रत्येक रोगाकरिता वेगवेगळी लस असते, त्यामुळे एका प्रकारच्या लसीमुळे सर्व रोगांचा प्रतिबंध होतो असे नाही. काही लसींना दुसर्‍या मात्रेची गरज असते. त्यानुसार ती मात्रा वेळेवर देणे महत्त्वाचे
असते.
– जगदीश काळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news