‘परिपूर्ण आरोग्यासाठी…’ विषयावर डॉ. सुपे यांचे शनिवारी व्याख्यान

‘परिपूर्ण आरोग्यासाठी…’ विषयावर डॉ. सुपे यांचे शनिवारी व्याख्यान
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 'डॉक्टर्स डे'निमित्त 'परिपूर्ण आरोग्यासाठी…' या विषयावर शनिवार, दि. 1 जुलै रोजी ख्यातनाम डॉ. अविनाश सुपे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी 5 वाजता होणार्‍या या कार्यक्रमात डॉ.सुपे मार्गदर्शन करणार आहेत. गेली 19 वर्षे ही आरोग्य व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे. यंदाचे व्याख्यानमालेचे 20 वे वर्ष आहे.

बदलती जीवनशैली, धावपळीचे व धकाधकीचे जीवन, ताणतणाव, असंतुलित आहार, वाढती व्यसनाधिनता, मोबाईलचा तसेच ऑनलाईन प्रणालीचा अतिरिक्त वापर यामुळे शारीरिक, मानसिक तसेच हृदयविकारासह रक्तदाब , मधुमेह , पोटविकार, कॅन्सर, निद्रानाश यासह विविध व्याधी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या व्याख्यानात लोकांना निरोगी राहण्याविषयीचे डॉ. अविनाश सुपे करणार आहेत.

या व्याख्यानमालेत आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांनी व्याख्याने दिली आहेत. त्यामध्ये डॉ. प्रमोद जोग (पुणे), योगी डॉ. संप्रसाद विनोद, डॉ. के. एच. संचेती, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. प्रेमानंद रामाणी, डॉ. सलीम लाड, डॉ. सतीश गुप्ता, डॉ. मनू कोठारी, डॉ. मिलिंद मोडक, डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. आसगावकर, डॉ. भोरास्कर, डॉ. लिली जोशी, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. मदन फडणीस, डॉ. अनंतभूषण रानडे, डॉ. शेखर भोजराज आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांची व्याख्याने झाली. तसेच आरोग्य शिबिरे व ध्यानमय योगासन शिबिर सुरू आहेत. गतवर्षी डॉ. मोहित गुप्ता यांच्या 'मन, हृदय व शरीर कसे निरोगी ठेवाल?' या व्याख्यानास उदंड प्रतिसाद लाभला होता.

या व्याख्यानात 'परिपूर्ण आरोग्यासाठी…' या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीतून डॉ. सुपे मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचे ते निरसन करणार आहेत. प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.

सलग 3 दिवस शस्त्रक्रिया

1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटातील जखमींचे प्राण वाचविण्यासाठी डॉ. अविनाश सुपे यांनी सलग तीन दिवस न थकता शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या या सेवेबद्दल तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

डॉ. अविनाश सुपे यांचा परिचय

डॉ. अविनाश सुपे यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय येथे माजी संचालक व अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे. सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज येथे ते सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात आजीवन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एशिया पॅसिफिक हेपेटो बिलिअरी असोसिशनचे सेक्रेटरी, कोव्हिड काळात मृत्यू दर विश्लेषण कमिटीचे राज्याचे प्रमुख, जीआय सर्जरी बोर्ड, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचे चेअरमन आदी जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या आहेत.

डॉ. सुपे यांना वैद्यकीय क्षेत्रात भारतातील सर्वोच्च डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारासह 52 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. दक्षिण युरोप, अमेरिका, जपान, थायलंड, इराण आदींसह 32 देशांत 450 पेक्षा जास्त सादरीकरणे त्यांनी केली आहेत. 2020 मध्ये मुंबई भूषण, 2019 मध्ये महाराष्ट्र भूषण व चेंबूर भूषण या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. आरोग्यविषयक पुस्तकांमध्ये 'आरोग्यसंपदा', 'राहा फिट', 'सर्जनशील' ही त्यांनी लिहिलेली पुस्तके गाजली आहेत.

126 पेक्षा जास्त वेळा स्वेच्छा रक्तदान केल्यामुळे त्यांना भारत सरकारने सेन्चुरियन डोनर पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी आतापर्यंत दक्षिण युरोप, अमेरिका, जपान, थायलंड, इराण यासह 32 हून अधिक देशांत जाऊन विविध डॉक्टर्स, वैद्यकीय संस्थांनाही सल्ला दिला आहे. भूतानमध्ये मेडिकल एज्युकेशन बोर्डवर सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. नामांकित वृत्तपत्रांमध्ये ते सातत्याने स्तंभ लेखन करतात. ट्रेकिंगची आवड असल्याने त्यांनी आजतागायत एव्हरेस्ट बेस कॅम्प, कैलास मानसरोवर, अंटार्क्टिका या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. उत्कृष्ट छायाचित्रकार, लेखक, संवेदनशील वैद्यकीय शिक्षक, प्रभावी वक्ता, निसर्गप्रेमी, शास्त्रीय संगीताची विशेष आवड असणारा अशी त्यांची ओळख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news