परंपरा : गौराईची लोकतत्त्व रूपे

परंपरा : गौराईची लोकतत्त्व रूपे
Published on
Updated on

डॉ. तारा भवाळकर

गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमध्ये नाही. गौरी ही यक्षकुळामधील आहे. ती कुबेर कुळातली आहे. 'धनदा' म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपाने 'सर्जक-पोषक-रक्षक' अशी तिन्ही रूपे आपण 'स्त्री'देवतेमध्ये पाहतो.

भाद्रपद महिना सुरू झालेला आहे. गणेश उत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराई येणे ही प्रथा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये आणि विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आहे. गौराईची प्रथा जेवढी महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमध्ये नाही. गौरी येतात म्हणजे काय होते? आपल्याकडचे सगळे सण हे निसर्गचक्राशी बांधलेले आहेत. भाद्रपद महिना हा पावसाळा संपत असताना आलेला महिना आहे. यावेळी सृष्टीमध्ये एक प्रकारची सुबत्ता, समाधान आलेले असते. माणसांची अन्‍न आणि पाण्याची चिंता मिटलेली असते. माणसाला ज्यामध्ये आनंद वाटतो, त्याला त्याने देव म्हटले आहे. एक आनंद देणारे; समाधान, सुख देणारे देव आहेत आणि दुसरे उपद्रव देणारे देव. गणपतीमध्येसुद्धा असेच प्रकार आपल्याला दिसतात. गणपती हा सुरुवातीला विघ्नकर्ता आणि नंतर तो विघ्नहर्ता झालेला आहे. तसेच गौरीचे झाले आहे.

गौरी म्हणजे आपल्याला परिचित असणारी बाहुलीसारखी, पूर्णपणे साजशृंगार केलेली अशी मूर्ती आणि तिला आपण गौरी म्हणतो. तिला कपडे घातले जातात; सुंदर साड्या नेसवल्या जातात; दागिने घातले जातात; मुखवटे ठेवले जातात. गौरी ज्यावेळी आपल्याकडे येतात, त्यावेळी त्यांना आपण बाहेरपासून घरापर्यंत 'या' म्हणून आमंत्रण देतो. विशेषत: महिलांचा हा महत्त्वाचा उत्सव आहे. कारण स्त्री आणि भूमी यांना आपल्या परंपरेने परस्पर रूपात पाहिलेले आहे. या दोघी सृजक म्हणजे निर्माण करणार्‍या आहेत. भूमीमुळे आपल्या पोटापाण्याची, तर स्त्रीमुळे वंशसातत्याची चिंता मिटते. त्यामुळे सृष्टीचे आणि मानवी जीवनाचे चक्र अव्याहतपणे सुरू असते. गौरी ही भूमातेचे प्रतीक आहे. आपण त्यांना लक्ष्मी म्हणतो. काही ठिकाणी तिला महालक्ष्मी म्हणतात. महाराष्ट्रात बहुजन समाजामध्ये 'गौराई' असे म्हटले जाते.

ही गौरी म्हणजे शिवशंकराची पत्नी, गणपतीची आई म्हटले जाते. ज्यावेळेला श्रीगणेश आपल्याकडे येतो, त्याच्यापाठोपाठ गौरीही येते. तिला हिमगौर, महालक्ष्मी असे म्हटले जाते. ही महालक्ष्मी आपल्याला दोन प्रकारच्या दिसतात. त्यांचे मुखवटेही निरनिराळ्या प्रकारचे असतात. काही ठिकाणी पितळेच्या, तर उच्चभ्रू घराण्यामध्ये चांदीच्या असतात. सर्वसामान्यांच्या घरामध्ये कुंभाराने बनविलेल्या मातीच्या गौरी असतात. काही ठिकाणी तांब्या-पितळेच्या असतात. त्याच्यावर मानवाकृती डोळे वगैरे चित्रित केलेले असतात.

स्त्रीच्या चेहर्‍याचा आभास निर्माण केलेला असतो. मानवाच्या आकाराचा एक साचा करून त्याच्यावर तिला बसविण्यात येते. लक्ष्मी म्हणजे काय! सोने-नाणे हे नंतर आलेले आहे. मुळामध्ये लक्ष्मी म्हणजे भू-लक्ष्मी. कारण जमिनीतून आपल्याला उपजीविकेच्या सर्व गोष्टी मिळत असतात. संपत्तीचे मूळ कारण भूमीच आहे. भूमीतून आलेली फुले, फळे, पाने यातून व्यापार होतात.

त्यातून भांडवल उभे राहते. बाकी संपत्ती कितीही वाढली आणि शोध कितीही लागला, तरी भूमीमधून निर्माण होणारी उत्पादनेच आपल्या लक्ष्मीचे मूळ रूप आहेत. तिचे मानवी प्रतीक म्हणून आपण गौराई आणतो.

गौरी दोन प्रकारच्या असतात. काही ठिकाणी एक असते. कोकणामधील बहुजन समाजामध्ये खूप मोठी उंच अशी मूर्ती बनविलेली असते. महाराष्ट्रामध्ये मानवी रूपात केलेल्या सजविलेल्या साच्यात तिला बसविलेली असते. पहिला दिवस तिच्या येण्याचा असतो. त्या ज्या दिवशी घरी येतात, त्या दिवशी माहेरवाशिणी घरी आल्या, असे समजले जाते. यावेळी बायकांमध्ये फार उत्साह असतो. सासरहून येणार्‍या माहेरवाशिणींचे जसे कोडकौतुक होते, तसे गौराईचे केले जाते. तुळशीच्याजवळ रांगोळी काढलेली असते. तिथे तिची पाऊले चित्रित करतात. त्याच्या पाठीमागे हळद-कुंकवाचे हाताचे ठसे उमटवतात.

घरात येताना 'लक्ष्मी आली, सोन्याची पाऊले..!' असे म्हटले जाते. नंतर तिची पूजा केली जाते, ओटी भरली जाते. त्या दिवशी तिला बर्‍याच ठिकाणी भाजी-भाकरीचा, दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी तिची आरती केली जाते आणि मग प्रसाद वाटला जातो. बायकांना बोलावले जाते, जागरण घातले जाते. बायका खेळ खेळत असतात. निरनिराळी गाणी म्हटली जातात. म्हणजे पंचमीच्या वेळेला बायका झिम्मा-फुगडी खेळतात, तसेच गौराईच्यावेळी करतात. माणसाचे जे जे म्हणून उपचार आहेत, ते ते देवावर आरोपित केलेले पाहायला मिळते.

दुसर्‍या दिवशी गौराईला जेवण घातले जाते. तो महत्त्वाचा दिवस गौरी-जेवणाचा असतो. त्या दिवशी तिला निरनिराळे नैवेद्य दाखविले जातात. गोडधोड जेवण केले जाते. सुवासिनी बोलावल्या जातात. प्रामुख्याने माहेरवाशिणींना जेवायला बोलावले जाते. जेवणाचे नैवेद्यसुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे असतात. महाराष्ट्रामध्ये सामान्यपणे आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो, कोकणामध्ये घावण केले जाते. कर्नाटक, गोव्यामध्ये भाताचे निरनिराळे प्रकार केले जातात. आपल्याकडची सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय-कायस्थ-प्रभू यांच्यामध्ये तर तिला मद्याचा नैवेद्य दाखविला जातो. आता चांदीच्या पेल्यामध्ये रेडवाईन ठेवलेली असते. काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्य असतो. कोकणच्या पट्ट्यावर बर्‍याच ठिकाणी माशांचा नैवेद्य असतो. जे मांसाहार करीत नाहीत, ते साधा नैवेद्य दाखवतात. लोकभाषेत गोडे आणि खारे नैवेद्य असे म्हटले जाते. जसा माणूस तसा त्याचा देव, हे लोकपरंपरेतले सूत्र अतिशय महत्त्वाचे आहे.

गौरीचे प्रकार महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वेगवेगळे असतात. काही ठिकाणी मुखवटे नसतातच. कोकणामध्ये, गोव्यामध्ये महिला नदीवर जातात. त्या नदीवरचे वाळूचे खडे आणतात आणि ते खडेच गौर म्हणून पूजले जातात. गोव्यामधल्या काही ठिकाणी तेरड्याची फुले, रोपे कलशामध्ये ठेवून गौराई म्हणून पूजल्या जातात. तिसर्‍या दिवशी तिची बोळवण केली जाते. बरेच दिवस राहायला तिला परवानगी नाही. कारण तिच्या नवर्‍याने तिला राहायची परवानगी दिलेली नाही, अशा प्रकारची गाणीसुद्धा म्हटली जातात.

आणखी एक प्रथा आपल्याकडे आहे. सामान्यपणे ज्येष्ठ मुलगा ज्या घरामध्ये असेल, त्या ठिकाणी गौर बसविली जाते आणि बाकीचे पाहुणे त्या घरामध्ये जातात. एका कहाणीमध्ये म्हटले आहे की, पहिल्या दिवशी येते ती कुमारिका असते. दुसर्‍या दिवशी सुफलनास योग्य अशी तरुणी होते आणि नंतर तिला सर्व घरभर फिरवले जाते. तिसर्‍या दिवशी ती वृद्धा होते. मानवी जीवनातील तिन्हीही अवस्था यातून प्रतिबिंबीत झालेल्या आहेत. गौरी घरात आली की, आमच्या घरात कुठे काय आहे, हे तिला दाखवले जाते. समज असा आहे की, त्या गौरी जिथे जिथे जातात, तिथले कोपरे समृद्ध होतात. तिची नजर जिथे पडेल, त्या ठिकाणीचा भाकरीचा भानोस भरलेला असतो! धान्याचे पोते भरलेले असते! जीवनातील सर्व गोष्टी तिला दाखविल्या जातात आणि मग तिला साच्यावर बसविले जाते. नैवेद्य, दुसर्‍या दिवशी जागरण असे केले जाते.

गौरी दोन का असतात, याच्याही काही समजुती आहेत. अभिजन परंपरेमध्ये असे म्हटले जाते की, गौरी या ज्येष्ठा आणि कनिष्ठा असतात. ज्येष्ठा म्हणजे थोरली आणि कनिष्ठा म्हणजे धाकटी. एक सोवळ्यातली आणि एक ओवळ्यातली असते. म्हणजे देवीची रूपेसुद्धा दोन प्रकारची असतात. एक शांत, समृद्ध अशी आनंद, सुख देणारी आणि दुसरी कनिष्ठा. ती उपद्रवकारक असते. आज आपण जरी मानत नसलो तरी गौरीचे उगम जे झाले, ते या दोन रूपांमध्ये आहेत.

म्हणजे आपल्याकडे बाळांना रोेगराई व्हायची आणि या सगळ्या रोगराई करणार्‍या देवता या स्त्रीदेवता आहेत. मरीआई, जानाई, जोखाई, गौराई आहे. कृष्णाला दूध पाजून मारण्याचा प्रयत्न करणारी पुतना हीसुद्धा देवताच आहे. बाळाला गोवर आला तरी कोणत्या तरी देवतेच्या कोपामुळेच आला, असे म्हटले जाते. डोळे आले तरी देवीच्या कोपामुळेच आले, असे समजले जाते.

मग त्या उपद्रवकारक देवींना नवस बोलले जाते. ते आजही काही ठिकाणी सुरू आहे. कोकणामध्ये हल्लीचे जे रोग आहेत, त्याचेही नवस बोलले जातात. म्हणजे डोळे आले असतील, तर 'मी तुला डोळा वाहीन.. कपडे वाहीन.. पाळणा वाहीन.. बाळाचे चप्पल वाहीन…' असे नवस बोलले जातात आणि त्याची पूर्तता नवसाच्या रूपाने केले जाते. माणसाच्या या ज्या श्रद्धा आहेत, त्या आदिम स्वरूपाच्या असतात. त्या माणसाच्या मनात खोलवर रुतून बसलेल्या आहेत. त्या श्रद्धेची प्रतीके म्हणून ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी येतात.

गौरी ही यक्षकुळामधील आहे. ती कुबेर कुळातली आहे. तिचे पहिले रूप यक्ष आहे. तिला धन देणारी म्हटले जाते. 'धनदा' म्हणूनही तिची उपासना केली जाते. 'हरिती' म्हटले जाते. अलक्ष्मी होती, तिला 'लक्ष्मी' करायचे यासाठी गौराईचा सण केला जातो. हा माणसाचा जन्मभराचा उत्सव आहे. सौंदर्याची उपासनासुद्धा आहे. गौरी आली की सजविणे, जेवण करणे असे प्रकार केले जातात. गौराईच्या रूपाने 'सर्जक-पोषक-रक्षक' अशी तिन्ही रूपेे आपण 'स्त्री' देवतेमध्ये पाहतो. यानिमित्ताने कुरूपा हे रूप बाजूला टाकून सुरूपा हे आपण पाहत असतो. म्हणून गौरी आली की म्हणतात, 'लक्ष्मी आली, सोन्याची पाऊले..!'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news