

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मी काही आमदारांसोबत मुंबईतून बाहेर गेलो असलो तरी पक्षाच्या विरोधात काहीच केले नाही. काही बोललोही नाही. मग मला गटनेतेपदावरून का काढलात? असा सवाल बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांचे मन वळविण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरत येथे त्यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांत झालेल्या चर्चेनंतर नार्वेकर यांनी आपल्या मोबाईलवरून शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. दोघांत सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यावेळी शिंदे यांनी आपल्याला गटनेतेपदावरून दूर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मी पक्षविरोधी कोणतेच कृत्य केलेले नाही. पक्षाच्या हिताला बाधा येईल असे कोणतेही वक्तव्य केले नाही.
मग माझ्यावर कारवाई का झाली? असा सवाल त्यांनी केला. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊत यांच्याबद्दल संताप व्यक्त केला. संजय राऊत एकीकडे माझी नाराजी दूर केली जाईल, असे म्हणतात. दुसरीकडे मी आमदारांचे अपहरण केले, त्यांचा खून होऊ शकतो, इतके टोकाचे बोलतात, हे योग्य नाही, असे ते म्हणाल्याचे समजते. मला मंत्रिपदाची अजिबात लालसा नाही.
मात्र, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली, हे अनेक शिवसैनिकांना रुचलेले नाही. निदान आता अडीच वर्षांनंतर तरी शिवसेनेने महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी, असे शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.