

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि परभणी येथील दोन सभांनी मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसवर घणाघात, एनडीएने दहा वर्षांत केलेली कामगिरी आणि पुढील 25 वर्षांचे नियोजन या मुद्द्यांवर इतर सभांप्रमाणे ते बोललेच; पण मराठवाड्याच्या स्थानिक मुद्द्यांनाही हात घालून त्यांनी या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासाची हमी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही शेती, पाणी यासारख्या क्षेत्रात मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मागे आहे, हेही या भाषणातून अधोरेखित झाले. गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरात सभा घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाला ऐकण्याची संधी मराठवाड्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने मिळाली. परभणी आणि हिंगोलीत महायुतीचे उमेदवार आहेत, तर नांदेडमध्ये भाजप निवडणुकीच्या रिंगणात आहे. म्हणजेच एक सभा भाजप आणि एक सहयोगी पक्षाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांनी घेतली.
छत्रपती संभाजीनगरात महायुतीने, तर जालना आणि बीडमध्ये महाविकास आघाडीने उमेदवाराच्या घोषणेला विलंब लावला. बीडमधून महाआघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच दावा होता, परंतु संभाजीनगरात शिंदे गट आणि भाजप अशा दोघांचाही दावा होता. अखेर संदीपान भुमरे यांना उमेदवारी देऊन महायुतीने या वादावर पडदा टाकला.
संभाजीनगर
पैठणचे आमदार आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आता दिल्लीत जाण्यास उत्सुक आहेत, हे गेल्या काही महिन्यांत त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट झाले होते. आता त्यांना जिल्ह्यातील नेटवर्क सक्रिय करावे लागणार आहे. गंगापूर, वैजापूर, संभाजीनगर मध्य, पूर्व आणि पश्चिम या विधानसभा मतदार संघांत महायुतीचे आमदार आहेत. त्यांच्या मदतीची गरज भुमरे यांना लागेल. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सलग पाच वर्षे मतदार संघाशी संपर्क ठेवला आहे. शिवसेनेचा 'निष्ठावान' गट त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खैरे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु, त्यांची समजूत काढण्यात वरिष्ठांना यश आले आहे. त्यामुळे संभाजीनगरात चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि 'एमआयएम'चे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्यावेळी 'वंचित'ने 'एमआयएम'ला पाठिंबा दिला होता.
जालना
जालना मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे अशी थेट लढत होणार आहे. सलग पाच लोकसभा निवडणुका जिंकत आलेले दानवे यांच्यासमोर यावेळी सत्ताविरोधी लाटेचे (अॅन्टीइन्कम्बन्सी) आव्हान आहे. या मतदार संघातील जालना शहर वगळता बादनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे पाचही विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे आहेत. येथील आमदारांचे पाठबळ दानवे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, डॉ. काळे यांनी निवडणुकीची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू केलेली असल्यामुळे त्यांना गावोगावी पोहोचण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेटवर्क त्यांना सक्रिय करावे लागेल. शिवाय, डॉ. काळे हे संभाजीनगरातील फुलंब्री मतदार संघाचे माजी आमदार आहेत. मतदार संघातील उर्वरित विधानसभा मतदारसंघ त्यांना पिंजून काढावे लागतील.
परभणी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय (बंडू) जाधव यांना पक्षाने तिसर्यांदा उमेदवारी दिली आहे. 1999 पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. या मतदार संघातील दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, एक शिवसेना ठाकरे गटाकडे, एक रासपकडे, एक काँग्रेसकडे, तर एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय समसमान बळ आहे. त्यामुळे चांगलीच चुरस पाहावयास मिळणार आहे. महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे गंगाखेडचे आमदार आहेत. या ठिकाणी 'वंचित'ने उमेदवार दिलेला नाही. मात्र, बहुजन मुक्ती आघाडीचे विनोद अंभोरे रिंगणात आहेत. गेल्यावेळी संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांचा सुमारे 42 हजार मतांनी पराभव केला होता आणि वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती. विटेकर यांनी सध्या जानकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. यावेळी आलमगीर हे बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नांदेड
या मतदार संघात भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण अशी थेट लढत होत आहे. सहापैकी भाजपकडे दोन, काँग्रेसकडे दोन आणि शिंदे गटाकडे एक विधानसभा मतदारसंघ आहे. भोकर मतदारसंघ अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त आहे. चिखलीकर यांना आमदारांच्या नेटवर्कचा लाभ मिळेल. शिवाय, या जागेसाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे सर्व स्टार प्रचारक परिश्रम घेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन मतदार संघात प्रचारदौरे करीत आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काही ठिकाणी भाजपवर नाराजीही आहे. शिवाय, मराठा आरक्षणाचा मुद्दाही भाजपला बॅकफूटवर नेऊ शकतो. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे तुलनेने नवखे उमेदवार आहेत. निवडणुकीपूर्वी संपूर्ण मतदार संघात पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
हिंगोली
शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनाच या मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज होता. वास्तवात, त्यांच्याऐवजी शिंदे सेनेकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने नागेश आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बी. डी. चव्हाण, तर बसपकडून गजानन डाळ नशीब आजमावत आहेत. या मतदार संघात शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशीच लढत रंगण्याची चिन्हे आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे आहेत. या लोकसभा मतदार संघातील चार विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे, तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे (शरद पवार गट) प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. या मतदार संघात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
लातूर
मराठवाड्यातील लातूर हा एकमेव राखीव मतदारसंघ. महायुती विरुद्ध महाआघाडी असा थेट संघर्ष या मतदार संघात दिसून येतो. महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे यांना, तर महाआघाडीकडून काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपला एक, काँग्रेसला दोन, राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक, तर शेकापला एक जागा मिळाली होती. तरीही गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळाले. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या राम गारकर यांना एक लाख 12 हजार मते मिळाली होती, परंतु श्रुंगारे यांचे मताधिक्य दोन लाख 89 हजार मतांचे होते. त्यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामंत यांचा पराभव केला होता. पक्षांच्या फाटाफुटीनंतर बदललेल्या चित्राचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, याबद्दल उत्सुकता आहे.
धाराशिव
या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मतदानाला वेळ असल्यामुळे (7 मे) अद्याप प्रचाराची रणधुमाळी इतर जिल्ह्यांसारखी रंगलेली नाही. तरीही उद्धव ठाकरे यांच्या सभेने वातावरणनिर्मिती केली आहे. ऐनवेळी आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. गेल्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह यांचा निंबाळकर यांनी सुमारे सव्वा लाख मतांनी पराभव केला होता. लातूर जिल्ह्यातील एक, सोलापूर जिल्ह्यातील एक आणि धाराशिव जिल्ह्यातील चार असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदार संघात आहेत. यापैकी भाजपकडे दोन, शिवसेनेकडे दोन, शिवसेना ठाकरे गट एक आणि एक अपक्ष असे आमदारांचे प्राबल्य आहे.
बीड
शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी उमेदवारी जाहीर केली होती आणि प्रचारही सुरू केला होता. आता त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होऊ घातली आहे. विधानसभा मतदार संघांत महायुतीचे प्राबल्य आहे. सहापैकी दोन मतदारसंघ भाजपकडे, तीन राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट), तर एक राष्ट्रवादीकडे (शरद पवार गट) आहे. मेटे यांच्या माघारीमुळे या मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू हिंगे पुन्हा मैदानात आहेत. गेल्यावेळी त्यांनी 92 हजार मते मिळवून चुरस निर्माण केली होती.