

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे 4 वाजता एअर इंडिया 1 या विशेष विमानातून अमेरिकन राजधानीत उतरताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. पाऊस सुरू असतानाही मूळ भारतीयांसह अमेरिकन स्थानिक नागरिकांची मोठी झुंबड विमानतळावर उडाली होती. पंतप्रधानांचे विमान जसे बुधवारी विमानतळावर उतरले, तसा जयघोष सुरू झाला. मोदी स्वत: एका हातात छत्री घेऊन विमानातून उतरले.
मूळ भारतीय अमेरिकन नागरिकांच्या एका प्रतिनिधी मंडळाने मोदींचे स्वागत केले. भारताचे अमेरिकेतील दूत तरनजितसिंग संधू हेही यावेळी उपस्थित होते. कोरोनाचे भय झुगारून लोक मोदींशी हात मिळविण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून धडपडत होते. मोदींनीही त्यांना निराश केले नाही. नंतर एका हॉटेलात मोदींनी भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पंतप्रधानांनी ट्विट करून इतक्या उत्साहात स्वागत केल्याबद्दल भारतीय समुदायाचे आभार मानले आहेत.
प्रवासी भारतीय ही आमची मोठी शक्ती आहे, असेही मोदींनी यात म्हटले आहे. परदेश दौर्यांदरम्यान मूळ भारतीयांच्या जाहीर सभा घेणे हे मोदींचे वैशिष्ट्य राहिले आहे; पण कोरोनामुळे यावेळी तसे घडण्याची शक्यता कमीच आहे. भारतीय अमेरिकन नागरिकांमध्ये मोदी प्रचंड लोकप्रिय आहेत.
मोदी हे उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधन योशिहिदे सुगा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत, तर शुक्रवारी (ता. 24 सप्टेंबर) मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असणार आहे, तर 25 सप्टेंबर रोजी मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलणार आहेत.
अमेरिकेत लोकसंख्येच्या तुलनेत 1.2 टक्के भारतीय आहेत आणि अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षपदापासून (कमला हॅरिस) ते अनेक महत्त्वपूर्ण सार्वजनिक पदांवर तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात अत्यंत मानाच्या पदांवर असलेल्या भारतीयांचे प्रमाणही येथे मोठे आहे.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या टॉपच्या कंपन्यांच्या सीईओंसोबतही बैठक केली. यावेळी क्वॉलकॉमचे सीईओ क्रिस्टियानो आर. अमोन यांचाही समावेश होता. क्वॉलकॉम सेमीकंडक्टर्स, सॉफ्टवेअर आणि वायरलेस तंत्रज्ञान पुरविणारी कंपनी आहे.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास जॉईंट बेस अँड्र्यूज विमानतळावर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला होता. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विटवरून ही माहिती दिली.
भारतीयांनी आपल्या सभ्य-सुसंस्कृत आचरणाच्या बळावर जगभरात भारताची एक आदर्श ओळख निर्माण केली आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत.
वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : लष्करी सामर्थ्यात आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने भारताकडून एकूण 30 अमेरिकन प्रिडेटर ड्रोनची खरेदी केली जाणार आहेत. सौदा होणार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने शिक्कामोर्तब झाले आहे. तो तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा आहे.
बायडेन प्रशासनाने भारताला 30 प्रिडेटर ड्रोन देण्यास आधीच मंजुरी दिलेली आहे. नौसेना, लष्कर आणि वायुसेनेच्या वाट्याला प्रत्येकी 10 ड्रोन येतील. हे प्रिडेटर ड्रोन गायडेड बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी युक्त असतील. गोपनीय मोहीम, टेहळणी, ऐनवेळी विमानांना मदत पुरविणे, बचावकार्यासह अनेक कामे या ड्रोनमुळे सोपी होतील.
प्रिडेटर ड्रोनमध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक सुविधा आहेत. क्षेपणास्त्रांचा हवेतून जमिनीवर मारा करण्यात ते सक्षम आहे. सेंसर आणि लेझरच्या इशार्यावर बॉम्ब वाहून नेण्याची तसेच ते लक्ष्यावर टाकण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. जवळपास 50 हजार फुटांपर्यंत उडण्याची आणि 27 तास सलग उड्डाणाची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.
पंतप्रधान मोदी यांची वॉशिंग्टनला लढाऊ ड्रोन उत्पादक 'जनरल टॉमिक्स कंपनी'च्या प्रमुखांसह अन्य नावाजलेल्या अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांशी यासंदर्भात भेट नियोजित होती. क्वॉलकॉम, सेमी-कंडक्टर, ब्लॅकरॉक, फर्स्ट सोलर आणि डोब या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मोदी यांची चर्चा झाली.
'क्वॉड' समूहाच्या (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जपान) सहकार्याने 2022 पर्यंत आम्ही भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे 100 कोटी डोस बनविणार आहोत. जगभरात जेथे गरज आहे तेथे या डोसचा पुरवठा केला जाईल. सोबतच फायझर कंपनीकडून 50 कोटी डोस खरेदी करून अमेरिकेतर्फे स्वतंत्रपणे ते गरीब देशांना मोफत पुरविले जातील, अशी घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोनावरील 'ग्लोबल समिट'मध्ये केली.
सध्या कोरोना विषाणूच्या संपूर्ण पराभवाहून मोठे आव्हान मानवतेसमोर नाही. त्याचा मुकाबला करण्यासाठी भागीदार देश, औषध कंपन्या, अन्य उत्पादकांसह सुरक्षित आणि परिणामकारक लसी तयार करण्याची क्षमता विकसित करण्यावर अमेरिकेचा सर्वाधिक भर आहे. भारताचे मोठे सहकार्य यात आहे, असेही बायडेन यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत लस उत्पादन वाढण्यासाठी अमेरिका आर्थिक सहकार्य करत आहे. आफ्रिकेतील गरीब देशांसाठी जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे 50 कोटी डोसही अमेरिकेकडून दिले जातील. जगाला 1.1 अब्ज लसी विनामूल्य देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करू. शंभर देशांना आम्ही 16 कोटी डोस दिलेले आहेत, असे ते म्हणाले.
कोरोनाचे संकट जगावर अद्याप कायम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लस उत्पादनासाठी आवश्यक तो कच्चा माल पुरविण्यात कोणत्याही देशाने आडकाठी आणू नये, अशी अपेक्षावजा सूचनाही त्यांनी नामोल्लेख न करता अमेरिकेला उद्देशून केली. बायडेन यांनी 'व्हॅक्सिन डोनेशन' 'डबल' (लसदान दुप्पट) केल्याबद्दल अमेरिकेच्या औदार्याचे कौतुकही मोदींनी केले.