पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा वज्रलेप निघू लागला!

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा वज्रलेप निघू लागला!
Published on
Updated on

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून दोन वर्षांपूर्वी वज्रलेप करण्यात आला होता. हा लेप टिकण्याची मर्यादा आठ वर्षांची असल्याचे सांगण्यात आले होते; पण कोरोना काळात मंदिर दर्शनासाठी बंद असतानाही अवघ्या दोन वर्षांतच वज्रलेप निघू लागला आहे. यामुळे भाविकांतून नाराजीचा सूर असून, मंदिर प्रशासनाची चिंता वाढली आहे. याबाबत मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाकडे विचारणा केली आहे.

याबाबत माहिती अशी की, विठ्ठलाची वालुकाष्म दगडापासून बनवलेली मूर्ती आहे. या मूर्तीवर पूर्वी होणार्‍या पंचामृताच्या अभिषेकाने मूर्तीची झीज होत होती. त्यामुळे हा अभिषेक बंद करण्यात आला. तरीही मूर्तीची झीज होत असल्याने त्यावर आतापर्यंत चारवेळा वज्रलेप केले. रुक्मिणी मातेची मूर्ती गंडकी पाषाण म्हणजेच शाळीग्राम दगडाची असून, ती गुळगुळीत आहे. मात्र, या मूर्तीच्या पायाची झिज होत
असल्याने पायावर वज्रलेप केला जातो.

दरम्यान, कोरोना काळात श्रींच्या पायावरील दर्शन बंद होते. याच कालावधीत 23 व 24 जुलै 2020 या कालावधीत पुरातत्व विभागाने श्री विठ्ठल मूर्तीवर व रुक्मिणी मातेच्या पायावर सिलीकॉनचे लेप दिले होते. वज्रलेप लावल्यानंतर तो पुढील आठ वर्षे तसाच टिकून राहील, असे सांगण्यात आले होते. कोरोना कहर संपला आणि श्रींचे पदस्पर्श दर्शन

2 एप्रिल 2022 पासून सुरू झाले. पदस्पर्श दर्शन सुरु झाल्यावर वज्रलेपाची झीज झाल्याचे आणि तो निघू लागल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. वज्रलेप निघू लागल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच भाविकांतून नाराजीचा सूर पसरला आहे.

वास्तविक कोरोना काळात मंदिर दर्शनाकरीता बंद होते. असे असताना वज्रलेप निघेपर्यंत मंदिर समितीने दुर्लक्ष असल्याची टीका होऊ लागली आहे.

याबाबत मंदिर समितीने पुरातत्व खात्याला कळविले असून, वज्रलेपाचे कशामुळे तुकडे पडले? हे पुरातत्व विभागाला शोधावे लागणार आहे. मूर्तीची झीज रोखण्याचे आव्हान पुरातत्व विभागासमोर आहे. एका बाजूला शासनाकडून विठ्ठल मंदिराला 74 कोटी रुपये खर्च करून पुरातन रुप देण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. असे असताना तत्पूर्वीच मंदिरातील मूर्तींचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत.

दोन वर्षे कोरोनामुळे श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होते. गेल्या दोन एप्रिलपासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. हे दर्शन सुरू केल्यानंतर रुक्मिणीमातेच्या मूर्तीच्या पायावरील वज्रलेपाची झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला आहे. मंदिर समितीची बैठक घेण्यात येईल. यात पुरातत्त्व विभागाच्या मदतीने मूर्तीची होणारी झीज थांबवून मूर्तीचेे संवर्धन करण्यात येईल.

– गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष मंदिर समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news