

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात शंभर कामांसाठी 474 कोटी 13 लाखांची तरतूद केली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली 51 कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
सोलापूरातील नियोजन भवन येथील सभागृहात शनिवारी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडाबाबत पालकमंत्री भरणे यांनी आढावा घेतला.यावेळी त्यांनी अधिकार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, आषाढी यात्रेनिमित्त लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे येतात. त्या सर्व भाविकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने काम केले पाहिजे. या विकास कामात काही अडचणी असतील तर संबंधित विभाग प्रमुख यांनी थेट संपर्क साधावा. त्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. पोलीस विभागाने आषाढी यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंढरपूर शहरात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असेही त्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार पंढरपूर शहरात 13 ठिकाणी 1472 इतकी सुलभ शौचालये बांधून वापरण्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. तर दहा ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व कामासाठी 67 कोटी 60 कोटींचा निधी मंजूर आहे. पुरुष शौचालय 752 व स्त्री शौचालय 720 असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिली.