

शासनाने आता लोकांच्या मदतीसाठी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे; पण आता हे पंचनामेच वादात सापडले आहेत.
2019 चा महापूर… त्यानंतर कोरोना महामारीचे संकट आणि यंदा पुन्हा भयावह महापुराने जिल्हा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. लाखो शेतकरी, शेतमजूर आणि हजारो व्यावसायिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. हजारो घरांत महापुराचे पाणी शिरले, तर शेकडो घरांची पडझड झाली. बघता बघता कित्येक लोक बेघर झाले. शेती वाहून गेली. पिके मातीमोल झाली. नुकसानीचा आकडा दोन हजार कोटींपेक्षाही जास्त आहे. शासनाने आता लोकांच्या मदतीसाठी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे; पण आता हे पंचनामेच वादात सापडले आहेत.
सरकारी अधिकारी प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी नुकसानीची नोंद करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. शिरोळ तालुक्यात गुरुवारी शेतकर्यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामे केले जात असल्याचा आरोप करीत पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना माघारी पाठवले. अनेक ठिकाणी पंचनामा करणार्या अधिकारी व कर्मचार्यांच्या उद्धट वर्तनाचा पूरग्रस्तांना सामना करावा लागत आहे. आता खरे तर पंचनामा प्रक्रियेचाच 'पंचनामा' करण्याची गरज आहे. मदत राहू दे; पण पंचनामे आवरा, अशी म्हणण्याची वेळ पूरग्रस्तांवर आली आहे.
तीन वर्षांत दोनदा आलेल्या महापुरामुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यापारी, व्यवसायिकही हतबल झाले आहेत. महापूर ओसरला असला, तरी पूरग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रूंच्या धारा कायम आहेत. शासनाचे प्रतिनिधी म्हणून पंचनामे करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना मात्र याचे काहीही सोयरसूतक नाही. अरेरावीने संभाषणाला सुरुवात करतच पंचनामे सुरू असल्याचे अनेक ठिकाणी चित्र आहे. केएमसी कॉलेजसमोर भाविक विठोबा रस्त्यावर असलेल्या एका दुकानात शनिवारी पंचनामा करण्यासाठी कर्मचारी गेला.
पूरग्रस्ताने डोळ्यांत पाणी आणत आपले काय नुकसान झाले, हे सांगायला सुरुवात करताच अतिशय उद्धट भाषेत या कर्मचार्याने लबाड बोलायचं नाही, असे म्हणत दटावायला सुरुवात केली. शेजारच्या दुकानातील तरुणांनी पंचनामा करणार्या कर्मचार्याला याबाबत जाब विचारला, तरीही त्याच्या आवाजाची वरची पट्टी कायम होती. अखेर संबंधित दुकानदारानेच आमच्या दुकानात पाणी आले नाही. आमच्या दारातही पाणी आले नाही. आमचे नुकसानही झाले नाही. पंचनामा करू नका, असे उपरोधाने सुनावल्यावर हा उर्मट कर्मचारी निघून गेला.
शिरोळ तालुक्यातील 24 गावे पूर्णतः बुडीत धरणे गरजेचे होते; मात्र 12 गावे पूर्णतः धरली आहेत. शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा नदीला आलेल्या महापुरात 12 गावे पूर्णतः, तर 30 गावे अंशतः पूरग्रस्त ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक गावांतील पंचनामे शेतकरी बंद पाडत असल्याचे चित्र आहे. आणखी 12 गावे पूर्णतः बुडीतमध्ये यायला हवीत, असे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी शिरोळमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.
महापुरामुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठया व्यावसायिकांचे सुमारे 800 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील व्यापारी, व्यावसायिकांचे सुमारे 400 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सने घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत शहरातील साडेतीनशे व्यापार्यांनी चेंबर्सकडे नुकसानीचे फॉर्म भरून दिले आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सने नुकसानीची अंदाजे आकडेवारी याची प्राथमिक माहिती घेतली आहे. शासनाने सध्या 50 हजारांपासून दीड लाखापर्यंतची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. प्रत्यक्षात किती मिळणार, हे माहिती नाही; पण व्यापार्यांसाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी करणार असल्याचे व्यापार्यांकडून सांगण्यात आले.
महापुरामुळे इचलकरंजी शहरातील तब्बल 500 हून अधिक यंत्रमागधारकांना मोठा फटका बसला आहे. तब्बल 7 हजारांहून अधिक यंत्रमाग आठ दिवसांहून अधिक काळ पाण्यात होते. त्यामुळे यंत्रमाग गंजले आहेत. कापड, सूत अन्य अनुषंगिक कारखान्यांतील नुकसानही मोठे आहे. हा नुकसानीचा आकडा तब्बल 100 कोटींहून अधिक आहे. अद्यापही पंचनाम्यांचे काम सुरू झालेले नाही. नुकसानीमुळे यंत्रमागधारकांचे कंबरडे मोडले आहे.
शासन पातळीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा 400 ते 500 कोटींच्या घरात असला, तरी प्रत्यक्षात तो अंदाजे दोन हजार कोटींच्या वर गेला आहे. महापुरामुळे शेतकर्यांना तर देशोधडीला लावले असून शेतीला मोठा फटका बसला आहे.
कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील 58 हजार 290 हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. पिकाच्या क्षेत्रात भूस्सखलन, पीक वाहून जाणे, शेतांचे बांध कोसळणे यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील पिकांचे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. यात सुमारे 400 ते 500 कोटींचे नुकसान झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. इचलकरंजीतील यंत्रमागाला 100 कोटींचा फटका बसला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतीचे, व्यापार्यांचे, उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.