

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर परिसरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच दिसून आल्यानंतर आता इचलकरंजीजवळील रूई बंधार्यातही ऑक्सिजनसाठी माशांची तडफड सुरू आहे. ऑक्सिजन घेण्यासाठी मासे पाण्याच्या वर येत आहेत, तर काही ठिकाणी मासे मेल्यामुळे पाण्याला उग्र वास सुटला आहे. त्यामुळे या बंधार्यातून पिण्यासाठी पाणी उपसा होत असलेल्या दहा ते पंधरा गावांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे.
पंचगंगा नदीपात्रात प्रदूषित पाणी मिसळत असल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. याचा फटका नदीपात्रातील जलचरांनाही बसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी इचलकरंजी-शिरदवाडदरम्यानच्या पुलाजवळ मृत मासे आढळून आले होते. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही दखल घेतली नाही.
दरम्यान, सोमवारी पुन्हा रूई बंधार्याजवळ मोठ्या प्रमाणात मासे आढळून आले आहेत. मासे अगदी पाण्यावर ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत, तर मृत मासे बंधार्याला तटल्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे.
पंचगंगा नदीवरील रूई बंधार्यात मासे मोठ्या प्रमाणात पाण्यावर आल्याची माहिती परिसरात वार्यासारखी पसरली. त्यामुळे खवय्यांनी बंधार्यावर मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली होती. एरव्ही एका एका माशासाठी दिवसभर तिष्ठत राहावे लागणार्या मच्छीमारांना ही नामी संधी मिळाली.
पंचगंगा प्रदूषणाचा जाब विचारला, आंदोलन केले, अधिकार्यांसमोर मासे ठेवले की, आंदोलकांवर गुन्हे दाखल करता आणि ज्यांच्या हलगर्जीपणामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत, त्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर काय कारवाई करणार, असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदूषण नियंत्रण मंडळावर कारवाई करा, अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.
नदीत रासायनिक सांडपाणी मिसळत आहे. यामुळे पंचगंगेचे प्रदूषण वाढून मासे मृत होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीकाठावरील लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. हेच पाणी पीत असल्यामुळे हजारो लोक कॅन्सरसारख्या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. प्रदूषित पाण्याने साथीचे आजार नित्याचेच बनले आहेत. तरीही प्रदूषण करणार्यांवर नियंत्रण मंडळ जुजबी कारवाई करून त्यांना अभय देत आहे.
पंचगंगा नदीचे प्रदूषण तातडीने थांबवण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर दौर्यावर आलेल्या, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यांचा दौरा संपताच दोनच दिवसांनंतर मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले. हे सर्व गंभीर आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सागर शंभूशेटे, जनार्दन पाटील, भीमगोंडा पाटील, पापालाल शेख, इंद्रजित भारमल, शंकर कोरवी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी